Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Kothali Gaon : नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी कोठली गावाने एकजुटीतून जलसंधारण केले. पाण्याचे शाश्‍वत स्रोत तयार केले. ग्रामस्थ व विशेषतः युवाशक्ती त्यासाठी झटली. आज बारमाही, बागायती भाजीपाला- फळे घेणारे गाव म्हणून कोठलीला नवा चेहरा मिळाला आहे.
Kothali Gaon
Kothali GaonAgrowon

Agriculture Village Success Story : नंदुरबार शहरापासून १३ किलोमीटरवर सुमारे साडेपाच हजार लोकसंख्येचे कोठली (ता. जि. नंदुरबार) गाव आहे. गावाचे शिवार सुमारे ८०० हेक्टर आहे. नदीचा स्रोत नसल्याने जेमतेम १८० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली होते. रंका नाल्याचा थोडाफार आधार होता. ज्वारी, मका, कापूस ही प्रमुख पिके होती. दुष्काळाचा फटका सतत बसायचा.

जानेवारीतच शिवार उजाड व्हायचे. पिण्याच्या पाण्याचे संकट उद्‍भवायचे. टँकर सुरू व्हायचे. हिवाळ्यातही पाणीपुरवठ्याची समस्या असायची. सन २०१८ मध्ये तर मोठ्या दुष्काळात हातची पिके शेतकऱ्यांना सोडावी लागली. मोठे नुकसान सोसावे लागले. पशुधन संकटात आले. मजुरांवर स्थलांतर करण्याची वेळ आली.

Kothali Gaon
Horticulture Cluster : देशात फलोत्पादन क्लस्टर विकास कार्यक्रमाला सुरवात

‘जल है तो कल है’ मंत्राने सुरुवात

‘जल है तो कल है’ हा मंत्र घेऊन गावातील उच्चशिक्षित व युवक एकत्र आले. त्यांनी कामास झपाटून सुरुवात केली. जलमित्र पथक स्थापन होऊन दीपक पटेल, सागर पाटील, प्रसाद पाटील आणि त्यांच्यासारख्या असंख्य युवकांनी लोकवर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली. गावातील ज्येष्ठांनीही युवकांचे मनोधैर्य उंचावत जलसंधारणाच्या प्रबोधनासाठी पुढाकार घेतला. पाहता पाहता ४० लाख रुपये निधी संकलित झाला.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यापर्यंत उपक्रमाची माहिती पोहोचली. त्यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन उपक्रमास दिले. त्यातून बारा लाख रुपये प्राप्त झाले. ‘नाम फाउंडेशन’ने नाला खोलीकरणासाठी यंत्रणा मोफत देण्यासह तांत्रिक मार्गदर्शनही केले.

लोकसहभाग व वर्गणीतून तब्बल १५ किलोमीटर अंतरातील रंका नाल्याचे ३० फूट खोल व ३० मीटर रुंदीकरण झाले. गावच्या शिवारातून नाला जातो. परंतु शिवारातील कुणाही शेतकऱ्याने कामास विरोध केला नाही. याच संघभावनेतून अन्य दोन नाल्यांचेही खोलीकरण झाले. मृत नाले जिवंत झाले. सन २०१८ नंतर पाऊसमान बरे होते. त्यामुळे कामांची फलश्रुती दिसून आली. विहिरींचे पुनर्भरण झाले. कोट्यवधी लिटर पाणी जमिनीत मुरले. गावातील सुमारे ५० टक्के क्षेत्र बागायती झाले. बारमाही भाजीपाला पीकपद्धती तयार होऊ लागली. कारले, टोमॅटो, मिरची, केळी, कलिंगड आदी पिकांत शेतकऱ्यांचा हातखंडा तयार होऊ लागला. मिरचीचे एकरी ३० टन, पपईचे २५ टनांपर्यंत, तर केळीचे प्रति रास २५ किलोपर्यंत उत्पादन शेतकरी घेऊ लागले.

कोठली गावच्या भाजीपाल्याचा डंका नंदुरबारसह अहमदाबाद, सुरत, बडोदा, मध्य प्रदेशातील बाजारपेठांमध्ये झाला आहे. गुजरातमधील मोठे खरेदीदार कोठलीच्या मिरची, कारल्याची थेट खरेदी करतात. काही खरेदीदारांनी शेतकऱ्यांसोबत करार केले आहेत. यात बियाणे, निविष्ठांचा पुरवठा खरेदीदारांकडून होतो. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना बाजारातील प्रचलित दरांपेक्षा दोन पैसे अधिक दिले जातात. गावातील काही शेतकऱ्यांची निर्यातक्षम मिरची आखाती देशांत जाऊ लागली आहे.

Kothali Gaon
Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

...असे झाले फायदे

गावातील स्थलांतर थांबले. यंदा नंदुरबार व कोठली भागात पाऊसमान कमी. मात्र जलसाठे टिकून असून भाजीपाला शेती चांगल्या प्रकारे फुलते आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली.

युवा प्रगतिशील शेतकरी सागर पाटील यांच्याकडून मिरची प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक. सोबत देवेंद्र पाटील, कल्पेश पाटील, चेतन पाटील, वैभव पाटील व मयूर पाटीलही या उद्योगात उतरले आहेत. एक कोटी ९८ लाख रुपयांची एकूण गुंतवणूक.

नरेंद्र पाटील व राहुल पाटील यांनी चारचाकी व ट्रॅक्टर घेतला. गणेश पाटील यांनीही केळीतील प्रगतीच्या बळावर १५ लाखांचा ट्रॅक्टर घेतला. मयूर व वैभव पाटील यांनी चार टन वाहतूक क्षमतेचे मालवाहू वाहन घेतले. अनेकांना पाल्यांना उच्चशिक्षणासाठी मुंबई, पुणे आदी महानगरात पाठविणे शक्य झाले.

काहींनी केले विहीर खोलीकरण. आधुनिक अवजारे, ठिबक, तुषार सिंचन संच घेतले. नव्या घरांचे केले बांधकाम.

सामना करूनच पुढे जावे लागेल

जलमित्र पथकातील मुख्य सदस्य सागर पाटील म्हणाले, की वातावरण बदल, दुष्काळ आदी आव्हानांचा सामना करूनच पुढे जावे लागेल. आपण जेवढ्या पाण्याचा उपयोग करतो, तेवढे ते जमिनीत जिरवितो का? हा प्रश्‍न प्रत्येकाने स्वतःला विचारून त्याचे उत्तर शोधले पाहिजे. कमी पाण्यात शिवारात हिरवाई कशी आणायची हे आम्ही ग्रामस्थ शिकलो. त्यासाठी गावची एकजूट महत्त्वाची ठरली आहे.

ग्रामस्थ करतात असे पाणी नियोजन

पाण्याची अधिक गरज असलेली पिके टाळतात. पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी शक्य त्या सर्व तंत्रज्ञानाचा अवलंब.

भाजीपाला पिकांसाठी पॉलि मल्चिंग, ठिबकचा वापर. पाट पद्धतीचा कुठेही वापर नाही

शाश्‍वत शेतीची दूरदृष्टी ठेवून अधिकाधिक पाणी जमिनीत कसे जिरेल याचा विचार ग्रामस्थांनी केला आहे.

प्रत्येक शेतकरी वैयक्तिक स्तरावरही जलसंधारणाचा विचार करतो. पिकाला पाण्याची गरज किती आहे याचा अभ्यास करतो.

हवामानसंबंधी ॲप्स वा यंत्रणांची मदत घेऊन सिंचन. त्यातून पाण्याचा अनावश्‍यक वापर खूप कमी झाला.

गावातील १० पेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे मोठ्या क्षमतेची शेततळी. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत पाणी कमी पडत नाही.

सागर पाटील ९८२३७६५२५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com