टोमॅटोच्या नव्या लागवडीच्या रोपांची पाहणी करताना संदीप पाटील
टोमॅटोच्या नव्या लागवडीच्या रोपांची पाहणी करताना संदीप पाटील  
यशोगाथा

बारमाही नगदी पीकपद्धतीने आर्थिक घडी केली सक्षम

शामराव गावडे

सांगली जिल्ह्यातील येलूर (ता. वाळवा) येथील संदीप धनाजीराव पाटील यांनी केवळ उसावर अवलंबून न राहाता बारमाही नगदी पीकपद्धतीची निवड केली. झेंडू, कारली, टोमॅटो आदी पिकांची लागवड रचना बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन केली आहे. आज याच पीकपद्धतीतून कुटुंबाची आर्थिक घडी बळकट करणे त्यांना शक्य झाले आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्याच्या हद्दीत पेठ नाक्‍यापासून पुढे दहा किलोमीटरवर येलूर फाटा लागतो. वारणेच्या पाण्याने समृद्ध झालेला हा भाग. उसाचे एकरी चांगले उत्पादन घेणारे अनेक शेतकरी या भागात आहेत. संदीप यांचे वडील लहानपणीच वारले. त्यानंतर शेतीची जबाबदारी आईसह त्यांच्यावर आली. पारंपरिक पद्धतीने ऊस शेती करताना आर्थिक प्राप्ती जेमतेमच होती. वेगवेगळ्या कारणांनुळे देणीही खूप झाली होती. उत्पन्नाचा मेळही जमत नव्हता. नगदी पिकांची लागवड महाविद्यालयात शिक्षण सुरू असतानाच संदीप शेतीतील कामेही करीत होते. परिसरात उसाबरोबर नगदी पिकेही घेतली जात होती. आपणही पारंपरिक पीकपद्धतीत बदल केला पाहिजे, असे संदीप यांनी ठरवले. कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून झेंडू पिकाकडे त्यांचे लक्ष गेले. या पिकाचा अभ्यास केला. मग जून महिन्यात लागवड करण्याचे नियोजन केले. पॉली मल्चिंग पेपरचा वापरही सुरू केला. जूनमधील लागवड फायदेशीर जूनची लागवड अधिक फायदेशीर ठरते. याचे कारण म्हणजे पिकाच्या कालावधीत गणपती उत्सव, दसरा, दिवाळी असे सण येतात. या वेळी फुलांचे दर चढे असतात. त्यामुळे चार रुपये जास्त मिळण्याची शक्यता वाढते, असा संदीप यांचा आजवरचा अनुभव आहे. आपण जशी बाग जोपासू तसा पिकाचा कालावधी जास्त मिळतो. नागअळी, करपा या किडी-रोगांपासून झेंडूला जपावे लागते. मुंबई येथे फुलांची विक्री होते. किलोला सरासरी ४० रुपये ते ६० रुपयांपर्यंत दराची ‘रेंज’ राहते. काही परिस्थितीत हाच दर ११० रुपयांपर्यंतही मिळाल्याचे ते सांगतात. कारले, टोमॅटो ठरले आश्वासक झेंडू निघाला की त्याच मल्चिंग पेपरचा दुहेरी वापर करीत कारले पिकाची लागवड केली जाते. संदीप यांच्या मते या पिकाची तशी कोणत्याही हंगामात लागवड करता येते. आठवड्यातून दोन वेळा तोडा केला जातो. टोमॅटोच्या लागवडीतही सातत्य आहे. उन्हाळा हंगामात उत्पादन सुरू होईल या दृष्टीने लागवड केल्यास चांगला दर मिळतो, असा त्यांचा आजवरचा अनुभव आहे. एकरी ३० ते ३५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. कारले व टोमॅटो यांची कोल्हापूर मार्केटला विक्री होते. थेट शेतातून मालाची उचल येलूर परिसरात भाजीपाला, फुले उत्पादक संघ आहेत. त्यांच्या गाड्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन माल घेऊन जातात. त्यानंतर तो ठरलेल्या व्यापाऱ्याकडे पाठवला जातो. मिळालेल्या दरातून वाहतूक भाडे वजा करून पैसे शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा केले जातात. त्यामुळे विक्रीसाठी शेतकऱ्याला आपल्या मालासोबत जावे लागत नाही. पीकपद्धतीचा अनुभव

  • एकूण क्षेत्र पाच एकर, खंडाने कसलेले दीड एकर
  • जमीन निचऱ्याची
  • सुमारे साडेतीन एकर क्षेत्र भाजीपाला पिकांसाठी, अन्य क्षेत्रात ऊस
  • संदीप सांगतात, की उसाचे उत्पादन प्रतिगुंठ्याला दीड ते दोन टनांपर्यंत मिळते. अठरा महिने ऊस जोपासायचा. पुढे वर्षभर टप्पे करून पैसे घ्यायचे हे आजच्या काळात परवडणारे ठरलेले नाही. म्हणूनच नगदी पिकांकडे मी वळलो. याही पिकांना दरांच्या चढउताराचा धोका आहे. त्यामुळे कोणत्याही एका पिकावर अवलंबून न राहता झेंडू, टोमॅटो, कारली अशा पिकांची विविधत ठेवण्यावर भर दिला. एखाद्या पिकाचा ‘प्लॉट’ नुकसानीत गेला तरी त्याची भरपाई दुसऱ्या पिकातून मिळू शकते. व्यवस्थापनात केले बदल विविध पिकांची विविधता जपताना स्वानुभवातून काही बाबींमध्ये बदल केला. संदीप म्हणतात, की झेंडूची झाडे ठराविक पातळीपर्यंत वाढल्यानंतर त्यांची शाखीय वाढ जास्त होते. मग झाडे पसरतात. यासाठी पूर्वीच्या काले पिकाच्या तारकाठीचा आधार घेऊन झाडांची बांधणी केली जाते. यामुळे झाडे नीट वाढतात. दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याचे प्रमाण जास्त असते. अशावेळी नुकसान होण्याची शक्‍यता असते. त्यासाठी झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी रस्सी बांधली जाते. रोप लावण करताना मल्चिंग पेपर अंथरण्यापूवी रोपाच्या दोन्ही बाजूंनी ठिबकच्या पाईप टाकण्याची काळजी घेतली जाते. त्यामुळे ड्रीपद्वारे दिलेली खते मुळांच्या दोन्ही बाजूंस पडतात. त्याचा परिणाम चांगला मिळतो असा आजवरचा अनुभव आहे. तंत्रज्ञानाचा वापर वीज भारनियमनाची समस्या आजही सुटलेली नाही. साहजिकच रात्रीच्या वेळीदेखील नदी, विहिरीवर हेलपाटे मारावे लागतात. रात्रभर जागे रहावे लागते. यासाठी संदीप यांनी मोबाईल आधारित विद्युतपंप चालू- बंद करण्याची यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे त्रास कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे भारनियमन होते त्या काळातच पिकांना पाणी देणे गरजेचे असते. एखाद्या वेळेला विद्युत पंपाचा घोटाळा होऊ शकतो. याला पर्याय म्हणून पर्यायी डिझेल इंजिनही विहिरीवर बसवले आहे. चार मजुरांना रोजगार संदीप सांगतात, की नगदी पिकांच्या लागवडीमुळे कुटुंबाची आर्थिक घडी बसली. चार मजुरांना कायमस्वरूपी काम मिळाले. इतर मजूर हंगामी असतात. शेतीतून साधली आर्थिक परिस्थिती संदीप यांनी शेतीतील उत्पन्नातूनच आर्थिक प्रगती साधली. घर बांधले, चारचाकी गाडी खरेदी केली. बहिणीचे व स्वतःचे लग्न यासाठी रक्कम खर्च केली. ठिबक पाइपलाइनची कामे पूर्ण केली. संदीप पाटील- ९७६६२२५२४६, ८९९९५८७७४४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

    Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

    Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

    Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

    Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

    SCROLL FOR NEXT