दहा हजार पक्षी क्षमतेच्या शेडमध्ये पक्षांचे संगोपन
दहा हजार पक्षी क्षमतेच्या शेडमध्ये पक्षांचे संगोपन  
यशोगाथा

पोल्ट्री, नगदी पिके, जल व्यवस्थापनातून प्रयोगशीलता

Chandrakant Jadhav

करार शेतीद्वारे पोल्ट्री व्यवसाय, जोडीला केळी, कापूस, हळद व अलीकडेच शेडनेट शेती अशी पद्धती स्वीकारून जापोरा (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील पाटील बंधूंनी प्रगतशील व एकात्मीक शेतीचा नमुना पेश केला आहे. उपक्रमशीलता सिद्ध करीत विहीर, कूपनलिकेचे पुनर्भरण करून पाण्याचा चांगला स्त्रोतही निर्माण केला आहे.   धुळे जिल्ह्यात जापोरे (ता. शिरपूर) हे सुमारे दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. याच गावात योगेंद्र पाटील यांची शेती आहे. ते व्यवसायाने बीएएमएस डॉक्टर आहेत. जवळच होळनांथे येथे त्यांचा दवाखाना आहे. ते २०१४ पासून गावचे बिनविरोध सरपंचही आहेत. वीरेंद्र हे त्यांचे थोरले बंधू अध्यापक आहेत. दवाखाना व ग्रामपंचायतीच्या जबाबदाऱ्या सांभाळून योगेंद्र शेती पाहतात. मोठ्या भावाचीही शक्य ती मदत असते. शैलेंद्र हे सर्वात धाकटे बंधू नोकरी करतात. शेती व पोल्ट्री अशी पद्धती असल्याने व्यवस्थापकाची नेमणूक केली आहे. वडिलांची प्रेरणा पाटील बंधूंचे वडील भरत राजाराम पाटील इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. मांजरोद (ता. शिरपूर) येथील खासगी संस्थेच्या विद्यालयात ते कार्यरत होते. त्यांची वडिलोपार्जित १५ एकर शेती होती. अध्यापनाचे काम करीत असताना ते शेतीही करायचे. वडिलांची प्रेरणा पाटील बंधूंना मिळाली. दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर योगेंद्र हेच मुख्य शेतीची धुरा सांभाळतात. त्यांनी कुक्कुटपालन, पशुपालन यासंबंधीचे प्रशिक्षण शिबिरांमधून घेतले आहे. पाटील यांची शेती पद्धती कंत्राटी पोल्ट्री व्यवसाय अधिक नगदी पिके पोल्ट्री व्यवसाय दरवर्षी कुठल्यातरी पिकात फटका बसायचा. केळी आली तर कपाशीला हवे तसे दर नसायचे. मात्र बहुवीध पीक पद्धती असल्याने कुठेतरी तोटा भरून निघायचा. त्यामुळे शाश्‍वत उत्पन्न मिळावे म्हणून पूरक व्यवसायाचा विचार योगेंद्र यांनी केला. शोध घेत ते नाशिक, मालेगाव, नंदुरबार भागातील मित्रांपर्यंत पोचले. काही दिवस त्या भागात सतत फिरले. त्यातून करार शेतीतील पोल्ट्री व्यवसायाची माहिती मिळाली. व्यवसायातील धोके, बाजारपेठ, अर्थकारण यांची माहिती घेतली अभ्यासाअंती हा व्यवसाय किफायतशीर वाटला. पोल्ट्री उद्योगातील आघाडीच्या कंपनीशी संपर्क साधला. कंपनीच्या अटी, शर्ती व व्यवसायाची पद्धत पसंत पडली. आजचा पोल्ट्री व्यवसाय

  • सन २०१० पासून व्यवसायात सातत्य
  • शेड व अन्य बाबींसाठी सुमारे २० लाख रुपयांची गुंतवणूक. त्यासाठी कर्ज घेतले.
  • शेतात १२ हजार चौरस फूट आकारमानाचे शेड. जमिनीपासून तीन फूट उंच आहे. दहा फुटांच्या दणकट तारांच्या जाळ्या वरच्या पत्र्यापर्यंत. पूर्वेला मोठा दरवाजा. पश्‍चिमेला दोन मोठ्या खिडक्‍या.
  • शेडच्या आजूबाजूला तापमान नियंत्रित राहावे यासाठी ६० हून अधिक कडूनिंब, सप्तपर्णीचे वृक्ष
  • पक्षी व्यवस्थापन

  • शेडमध्ये १० हजार ब्रॉयलर पक्षी
  • सुमारे ४० ग्रॅम वजनाचा पक्षी (एक दिवसाचे पिल्लू) कंपनीकडून दिले जाते.
  • सुमारे ४५ दिवसांनी अडीच किलो वजनापर्यंत त्यास वाढवून हे पक्षी कंपनीस दिले जातात.
  • खाद्य, लसीकरण, वैद्यकीय सेवा ही सेवा व खर्च संबंधित कंपनी करते. त्यासाठी काही शुल्कही आकारले जाते.
  • पक्षांना पाण्यासाठी स्वयंचलित बेलड्रींकर व अन्नासाठी फीडर. पक्षांचे वजन वाढविण्यासाठी पूरक अन्नघटकांचे खाद्य हवे असेल तर त्यासाठी स्वतंत्र खर्च करावा लागतो.
  • प्रति वर्ष सुमारे पाच बॅचेस घेतल्या जातात.
  • साथीच्या रोगाची बाधा होऊन पक्षांचा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी पाटील यांना स्वीकारायची असते. मात्र मरतुकीचे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षा जास्त नसल्याचे योगेंद्र म्हणाले.
  • शेडमध्ये विजेची व्यवस्था. एकरा दिवे. वीज भारनियमन असले तर पर्यायी व्यवस्था म्हणून इन्व्हर्टर
  • चारही दिशांना चार सीसीटीव्ही कॅमेरे.
  • तीन कामयस्वरूपी मजूर, त्यांच्या निवासासाठी पक्की घरे शेतात बांधली आहेत.
  • अर्थकारण पक्षांना दिले जाणारे खाद्य व वजन या गुणोत्तरानुसार कंपनीकडून प्रति पक्षी दर दिला जातो. त्यानुसार प्रति पक्षी १५ रुपये किंवा त्याहून कमी या दरात नफा होतो. प्रति बॅच साधारण ५० हजार रुपयांच्या पुढे उत्पन्न मिळते. वर्षभरातील पाच बॅचेसमधून असे उत्पन्न मिळते. अर्थात त्यामागे मजुरी, लाईटबील, पाणी व अन्य खर्चही असतात. गेल्या सात वर्षांत व्यवसाय व नफ्याच्या प्रमाणात सासत्य ठेवल्याचे योगेंद्र सांगतात. पीक पद्धती

  • संपूर्ण ३० एकरांसाठी सूक्ष्मसिंचन
  • सुमारे १० एकर केळी, चार एकर पपई, पाच एकर कपाशी, पाच एकर सुबाभूळ, चार एकर ऊस
  • काही वेळेस पपईऐवजी हळद किंवा अन्य पीक, दोन एकरांत शेडनेट
  • जापोरे गावातील काही भागात कूपनलिकांना हवे तसे पाणी नाही. परंतु, अनेर नदीकडील भागात पाणी बऱ्यापैकी आहे. केळी, कपाशी, ऊस ही या भागातील प्रमुख पिके अाहेत. पाटीलदेखील हीच पिके घेत. मात्र पाण्याचे संकट अधून मधून उभे ठाकायचे. मग सुमारे १० वर्षांपूर्वी त्यांनी शेती सूक्ष्मसिंचनाखाली आणली. केळीची टिश्‍यू कल्चर रोपे ते लावतात. घडाचे सरासरी वजन २४ ते २७ किलोपर्यंत मिळते.
  • शेती नफ्यात आली तशी वाढविली. पूर्वी आजघडीला पंधरा एकरची शेती ३० एकरांपर्यंत नेली आहेत. - ज्या क्षेत्रात केळी घेतली त्यात किमान वर्षभर पुन्हा हे पीक नाही. पीकफेरपालट. बेवड म्हणून पपई
  • पाण्याचे स्त्रोत- विहीर व बोअर
  • दोन गायी, तीन म्हशी. मशागतीसाठी ट्रॅक्‍टर तर केळी, ऊस, पपईमधील आंतरमशागतीसाठी छोट्या ट्रॅक्‍टरचा उपयोग.
  •  विहीर व कूपनलिकेचे पुनर्भरण वडिलोपार्जीत विहिरीचे पुनर्भरण केले. तसेच २०१६ मध्ये उन्हाळ्यात कूपनलिकेचे पुनर्भरण केले. या भागातील हा पहिलाच प्रयोग आहे. या पुनर्भरणासाठी अनेर प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या वितरिकेत येणाऱ्या पाण्याचा उपयोग केला आहे. ही कूपनलिका सुमारे २०० फूट खोल आहे. दोन एकरांत शेडनेट एक वर्षापूर्वी शेडनेट उभारले असून त्यात हिरवी ढोबळी मिरची मल्चिंगवर घेतली आहे. त्यास ३० रुपयांपासून ४०, ५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. मालेगाव, नाशिक येथील व्यापारी खरेदी करतात. पुढील काळात रंगीत ढोबळी मिरची उत्पादनाचा मानस असून, त्यासाठी पाॅलिहाऊस उभारणार आहेत.   संपर्क- योगेंद्र पाटील - ९८२३९२८५७९  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

    Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

    Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

    Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

    Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

    SCROLL FOR NEXT