Agriculture Success Story Agrowon
यशोगाथा

Integrated Farming : खडसे बंधूंची आदर्श एकात्मिक शेती

 गोपाल हागे

Agriculture Success Story : नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, शेतमालाला न मिळणारा पुरेसा भाव आदी विविध कारणांमुळे शेतकऱ्यांपुढील अडचणी सातत्याने वाढल्या आहेत. केवळ पिकांच्या उत्पन्नावर अवलंबून न राहाता शेतकरी उत्पन्नाच्या नवनवीन वाटाही शोधत आहेत. वाशीम जिल्ह्यातील शेलूखडसे (ता. रिसोड) येथील नितीन व अंकुश या खडसे बंधूंनी केवळ शेती उत्पन्नावर अवलंबून न राहता छोटे-छोटे पूरक व्यवसाय सुरु केले आहेत. त्यातून शाश्‍वत उत्पन्न मिळत असून शेतीवरील भार कमी करण्यात त्यांना यश मिळवले आहे.

एकात्मिक शेतीचे मॉडेल

खडसे कुटुंबाची सुमारे २५ एकर शेती असून ती गावाला लागूनच आहे. शेतातच कुटुंबाचे पक्के बांधकाम केलेले घर आहे. आई-वडील व दोन्ही भावांचे कुटुंब येथे एकत्रित पद्धतीने राहते. घराला लागूनच शेती आणि पूरक व्यवसाय असे एकात्मिक शेतीचे मॉडेल उभारले आहे. खरिपात सोयाबीन, तूर तर रब्बीमध्ये गहू, हरभरा अशी पिके ते घेतात. हंगामी सिंचनाची सुविधा आहे.

एक विहीर असून शेतापासून जवळ असलेल्या तलावावरून पाइपलाइन करून शेतापर्यंत पाणी आणले आहे. शेताजवळच परसबागेतील कुक्कुटपालन, शेळीपालन व घरगुती स्तरावरील दुग्धोत्पादन आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्वांना शेती व पूरक व्यवसायांवर घरून लक्ष ठेवणे सोपे होते. करडा (जि.वाशीम) येथील कृषी विज्ञान केंद्राकडून (केव्हीके) खडसे बंधूंना सातत्याने मार्गदर्शन मिळते. त्यातून सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब ते आपल्या शेतीत करतात.

परसबागेतील कुक्कुटपालन फायदेशीर

खडसे यांनी केव्हीकेकडून कावेरी जातीच्या कोंबड्या आणल्या आहेत. या कोंबड्यांचे प्रामुख्याने अंडी उत्पादनासाठी पालन केले आहे. सध्या १०० पर्यंत त्यांची संख्या आहे. प्रति कोंबडी वर्षाला सरासरी २०० ते २२० पर्यंत अंडी देते. जागेवरच मार्केट तयार केले असल्याने ग्राहक घरी येऊन खरेदी करतात. रिसोडमध्येही ती पोच केली जातात. प्रति अंड्याला १५ रुपये दर मिळतो.

मांसल व अंडी या दोन्ही पद्धतीतून वर्षाला सव्वा ते दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. शंभर बाय १०० फूट आकाराच्या जागेत कुंपण करून त्यात कोंबड्यांचे पालन केले आहे. त्यामध्ये लेंडीखत किंवा शेणखत पसरवले जाते. त्या ढिगाऱ्यावर सातत्याने त्यांचा वावर असल्याने शेणखत बारीक होण्यास मदत होते. कोंबड्यांद्वारे छोटे कीटकही नियंत्रित केले जात असल्याने गोठ्यातील जनावरांचा त्रास कमी होतो.

शेळीपालन

चार अधिक एक (शेळी व बोकड) असे युनिट सुरू केले आहे. गावरान तसेच ‘बिटल क्रॉस हे ब्रीड आहे. आजमितीला शेळ्यांची संख्या १२ पर्यंत पोचली आहे. सध्याच्या वजनाप्रमाणे युनिटची किंमत दोन लाख १८ हजार ४०० रुपयांवर पोचली आहे. तीस ते ३५ किलोपर्यंत वजन झाल्यानंतर शेळ्यांची विक्री केली जाते. त्यास प्रति नग १० हजार ते ११ हजार रुपये दर मिळतो. ग्राहक घरीच येऊन खरेदी करतात. या व्यवसायातूनही वर्षाला दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

दुग्धोत्पादन

एक गीर गाय व एक मुऱ्हा म्हैस अशी सध्या दोन दुधाळ जनावरे आहेत. सद्यःस्थितीत सहा लिटर दूध मिळते आहे. कुटुंबाची दुधाची गरज त्यातून पूर्ण होते. विविध पूरक व्यवसाय केल्यामुळे पोल्ट्री, लेंडी व शेणखत उपलब्ध होते. शेतीसाठी त्याचा वापर होतो.

चारा पिकांची लागवड व शेती

वर्षभर सकस व हिरवा चारा मिळण्याच्या उद्देशाने शेतात विविध चारा पिकांची लागवड केली आहे. यात मेथीघास, नेपियर, शेवरी, तुती, सुबाभूळ, हादगा, शेवगा आदींचा समावेश आहे. याद्वारे जनावरांना प्रथिनयुक्त चाऱ्याची उपलब्धता झाली आहे. खाद्याचे व्यवस्थित नियोजन केल्याने जनावरांचे आरोग्य सुदृढ राहत असून शेळ्यांची प्रजनन शक्तीही वाढण्यास मदत झाल्याचे नितीन सांगतात.

पूरक व्यवसायांमध्ये सुमारे चार वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. लसीकरण तसेच प्राथमिक उपचार दोघे भाऊच करतात. नितीन सांगतात की त्यातून वर्षभरातील दैनंदिन खर्चासाठी रक्कम तयार होते. तर पिकांच्या उत्पन्नातून मिळणारे उत्पन्न नफा किंवा अन्य कामांसाठी भांडवल म्हणून उपयोगात आणता येते. शेतीबद्दल बोलायचे तर खरिपात सोयाबीनचे एकरी ६ ते ८ क्विंटल, तुरीचे चार ते पाच क्विंटल, गव्हाचे १५ ते १८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. काही क्षेत्रात हळदीची लागवड केली जाते. यावर्षी बेणे तयार केले जाणार आहे.

कुटुंबाची साथ

नितीन, त्यांची पत्नी मंदा, मुलगा सोहम, भाऊ अंकुश, त्यांची पत्नी प्रियांका व वडील प्रल्हादराव, आई संजीवनी असे खडसे यांचे एकत्रित कुटुंब आहे. पूरक व्यवसायांमध्ये घरातील महिला सदस्य व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भार उचलतात. त्यामुळे कामाचा ताण हलका झाला आहे. करडा केव्हीकेचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, पशुविज्ञान शाखेचे प्रमुख मयूर देशमुख व अन्य शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन त्यांना मिळते.

एकात्मिक शेतीबाबत मार्गदर्शन

केव्हीके, करडा येथील प्रमुख डॉ.आर. एल. काळे म्हणाले की शेतीत परसबागेतील कुक्कुटपालन, शेळीपालन आणि दुग्धव्यवसाय यांचा समावेश करून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाते. यासाठी केव्हाकेमार्फंत शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येते. आमचे तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक ते तांत्रिक साहाय्य पुरवतात. आर्थिक नियोजन, कमी खर्चात जास्त नफा कसा मिळवायचा, बाजारपेठा आदीबाबतही माहिती देण्यात येते. केव्हीकेच्या पुढाकाराने जिल्हयात एकात्मिक शेती पद्धतीची मॉडेल्स तयार होत आहेत.

नितीन खडसे ९६८९०६७५५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Retreat Monsoon : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार

Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Animal Vaccination : पशुसंवर्धन विभागामार्फत रेबीज रोगप्रतिबंधात्मक लसीकरण

Farmer Incentive Scheme : कर्जमुक्ती प्रोत्‍साहन योजनेचा ४२४ शेतकऱ्यांना लाभ

Paddy Farming : चांगल्या पावसामुळे भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT