Processing Industry Agrowon
यशोगाथा

Processing Industry : तीस वर्षांहून अधिक जपलेली प्रक्रिया उद्योगाची परंपरा

Khoya Production : कोल्हापूर जिल्ह्यातील वाघवे (ता. पन्हाळा) येथील बोरगे कुटुंबाने तीस वर्षांहून अधिक काळ दर्जेदार दुग्धप्रक्रिया उत्पादने तयार करण्याची परंपरा जपली आहे. खवा व पेढा ही त्यांची ‘स्पेशालिटी’ राहिली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Pedha Production : कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गरम्य पन्हाळ्याच्या कुशीत वाघवे गाव वसले आहे. येथील अल्पभूधारक शेतकरी किरण बोरगे यांची दीड एकर बागायती शेती असून, ती खंडाने करावयास दिली आहे. किरण यांचे वडील गणपती १९८७ च्या काळात खवा व्यावसायिकाकडे नोकरी करायचे. त्यामुळे खवा निर्मितीची कला त्यांनी चांगल्या प्रकारे शिकून घेतली होती. या रूपाने घरात दुग्धप्रक्रियेच्या परंपरेस सुरुवात झाली. सन १९८७ च्या सुमारास किरण यांनीही वडिलांकडून हे तंत्र शिकून घेत खवा निर्मितीला सुरवात केली.

कोल्हापूर हे दुधाचे माहेरघर आहे. पन्हाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय चालतो. त्याचाच फायदा बोरगे कुटुंबाने करून घेतला. त्यांनी आपल्या गावातील दुग्धोत्पादकांकडून दूध घेत व्यावसायिक स्तरावर खवा निर्मिती व विक्रीस सुरुवात केली. सहाशे लिटर दुधावर प्रक्रिया होऊन १०० ते १५० किलोपर्यंत खवा निर्मितीची क्षमता कुटुंबाने गाठली. कुटुंबातील सर्व सदस्य या उत्पादन निर्मितीत असायचे.

या खव्याचे ग्राहक कोल्हापुरातील व्यापारी होते. ते या खव्यापासून मिठाई व पेढे तयार करून विकायचे. सन २००६ पर्यंत बोरगे कुटुंबाने केवळ खवा निर्मितीवरच भर दिला. उद्योग म्हटले की चढ-उतार, नफा तोटा या बाबी सुरूच असतात. बोरगे यांनाही व्यवसायात तोटा सहन करावा लागला. पण कुटुंब खंबीर होतं. अधिक जोमाने काम करून व्यवसायातील वाटचाल कुटुंबाने सुरूच ठेवली.

पेढ्यांमध्ये बनविली ओळख

आता एक पाऊल पुढे टाकून खव्याबरोबर पेढेही तयार करायला सुरुवात झाली. गुणवत्ता सर्वोत्तम ठेवल्याने स्थानिक व आसपासच्या गावांमधूनही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. बोरगे यांचे पेढेही लोकप्रिय होऊ लागले. किरण यांना पत्नी गीतांजली यांचीही समर्थ साथ होतीच.

पण या प्रवासात बीएस्सी पदवीधर असलेला त्यांचा तरुण मुलगा ओंकार यानेही लक्ष देण्यास सुरुवात केली. त्याने व्यवसाय पुढे नेण्याच्या उद्देशाने उपपदार्थ निर्मितीचे रीतसर प्रशिक्षण घेतले. मागील चार ते पाच वर्षांपासून उद्योगाची मुख्य धुरा तोच सांभाळतो आहे.

घरातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी वाटून घेतली आहे. सन २०२१ पर्यंत घरातूनच व्यवसाय सुरू होता. त्यानंतर मात्र घरापासून काही अंतरावर पदार्थांची निर्मिती सुरू केली. आता उत्पादनांच्या यादीत श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, दही, तूप, चक्का, वेगवेगळ्या ‘फ्लेवर’मध्ये बासुंदी, गुलाबजाम असे विविध पदार्थ समाविष्ट झाले.

उद्योगाचा विस्तार

आज सुमारे सात गुंठे क्षेत्रात प्रकल्प थाटला आहे. घरचे सर्व सदस्य निर्मितीत गुंतलेले असतातच. त्याशिवाय तीन कामगारांनाही रोजगार दिला आहे. निर्मितीपासून ते पॅकिंगपर्यंत त्यांची मदत घेतली जाते. दररोज सुमारे पाचशे ते साडेपाचशे लिटरपर्यंत दुधाचे संकलन होते. जवळपास सर्व दूध म्हशीचेच असते.

सकाळी सहा वाजताच या दुधावरील प्रक्रिया कामांना सुरवात होते. निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर स्वच्छतेला महत्त्व दिले जाते. जी चव किंवा स्वाद पूर्वीपासून जपला आहे तोच आजही तसाच ठेवण्याचा प्रयत्न बोरगे यांनी केला आहे. उत्पादनाची प्रत्येक बॅच बारकाईने तपासली जातो.

रोजची मागणी ओळखून त्यानुसार पदार्थांच्या निर्मितीस प्राधान्य देऊन दुपारी चार वाजेपर्यंत ते पुढे पाठवण्यासाठी सज्ज केले जातात. खवा निर्मितीसाठी लाकडी भट्टी तसेच सिलिंडर गॅस आधारित यंत्र, क्रीम सेपरेटर, पेढा निर्मिती यंत्र, शीतकरण, पॅकिंगसाठी यंत्रे अशी सर्व सामग्री उभी केली आहे. येत्या काळात चक्का निर्मितीसाठी तसेच अन्य यंत्रेही उभारली जाणार आहेत.

घरगुती चवीमुळे लोकप्रियता

बोरगे यांचे सर्व पदार्थ ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. त्याचे कारण म्हणजे ते तयार करताना अनेक बाबी कटाक्षाने पाळल्या जातात. सातच्या दरम्यान फॅट असलेल्या क्रीमयुक्त दुधाचा वापर केला जातो. घरगुती पद्धतीने बनविले जाते त्याच पद्धतीने तयार केलेले कणीदार तूप ही या कुटुंबाची खासियत आहे.

घरच्या आणि बोरगे यांच्याकडील तुपात काहीच फरक जाणवत नसल्याचे ग्राहक सांगतात. त्यामुळेचअनेक वर्षांपासून बोरगे यांचे ग्राहक टिकून आहेत. पेढे व खवा ही तर या कुटुंबाची स्पेशालिटी झाली आहे. दररोज सुमारे शंभर किलो पेढे तर साठ ते सत्तर किलो खवा तयार केला जातो. जोतिबा, कोतोलीसह कोल्हापूर शहरात त्यांची विक्री केली जाते.

स्व ब्रॅण्डने विक्री

मिठाई तसेच हॉटेल व्यावसायिक, बेकरी उद्योग यांना उत्पादनांचा पुरवठा होतोच. याशिवाय गावातच बोरगे डेअरी या नावाने ‘आउटलेट’ ही सुरू केले आहे. प्रति किलो बासुंदी २८०, पेढे ५००, आम्रखंड २००, म्हशीचे तूप ७०० रुपये, गुलाबजाम ३५० रुपये असे दर आहेत. विविध कार्यक्रमांसाठी पदार्थांची मोठी ऑर्डरही मिळते. त्या वेळी दरांमध्ये सवलत दिली जाते. सणांसाठीही विशेष नियोजन केले जाते. एकूण उलाढालीतून या उद्योगातून १५ ते २० टक्के नफा मिळतो.

शेतकऱ्यांशी जोडलेले नाते

व्यवसायात टिकायचं तर आपल्यासोबत दररोज काम करणाऱ्यांबरोबर केवळ व्यावसायिक संबंध ठेऊन चालत नाही. तर त्यांच्यासोबत जिव्हाळा निर्माण करावा लागतो. बोरगे कुटुंबाने अनेक वर्षांपासून याच पद्धतीने सत्तरहून अधिक दूध उत्पादकांशी नाते जोडले आहे. अन्य दूध संघांप्रमाणे त्यांना दुधाचा दर दिला जातो.

दर दहा दिवसांनी त्यांच्या बॅक खात्यावर पेमेंट वर्ग केले जाते. याशिवाय दूध उत्पादकाला त्याच्या अडचणीच्या वेळी आर्थिक मदतही केली जाते. दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सहलीचे आयोजनही केले जाते. त्याचा खर्च बोरगे कुटुंबीय उचलतात. उत्तम नेटवर्क, गुणवत्ता, सेवा अशा या विविध गुणांमुळेच तीस वर्षांहून अधिक काळ प्रक्रिया उद्योगात टिकून राहण्यात बोरगे कुटुंब यशस्वी झाले आहे.

ओंकार बोरगे ८८८८१६६२४२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

Rabi Crop Demonstration : तेलबिया उत्पादनाचे रब्बीत १७,८०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Distillery Project : आसवनी प्रकल्पांच्या पाण्याचे वर्गीकरण वादात

Malegaon Sugar Factory : ‘माळेगाव’चे १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट

Quality Control Department Issue : ‘गुणनियंत्रण’च्या बदल्यांसाठी समुपदेशन हाच एकमेव पर्याय

SCROLL FOR NEXT