Monsoon Update Agrowon
हवामान

IMD Rain Prediction : जूनमध्ये कमी पावसाचे संकेत

Monsoon Update : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (जून ते सप्टेंबर) देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच ९६ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी (ता. २६) जाहीर केला.

Team Agrowon

Latest Monsoon Update : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (जून ते सप्टेंबर) देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच ९६ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी (ता. २६) जाहीर केला. या अंदाजात चार टक्क्यांची कमी- अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे.

पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असलेल्या भागात (मॉन्सून कोअर झोन) यंदा सरासरीइतक्या (९४ ते १०६) टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात देशात यंदा सरासरी पावसाचा अंदाज असला, तरी महाराष्ट्रात मात्र कमी पावसाचे संकेत आहेत.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत हवामान शास्त्र विभागाच्या वातावरणीय देखरेख आणि संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी. एस. पै यांनी मॉन्सून पावसाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर केला.

हवामान विभागाने ११ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात देशभरात ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. १९७१ ते २०२० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८७ सेंटिमीटर म्हणजेच ८६८.६ मिलिमीटर आहे. तर सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

सुधारित अंदाजानुसार मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (४३ टक्के), तर दुष्काळाची शक्यता २० टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. यंदा मॉन्सून हंगामात देशात पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता आहे.

प्रमुख विभागनिहाय पावसाचे वितरण लक्षात घेता वायव्य भारतात यंदा कमी पावसाची शक्यता अधिक आहे. याशिवाय मध्य भारताचा पश्‍चिम भाग, दक्षिण द्वीपकल्पाचा उत्तरेकडील भाग आणि हिमालय पर्वताच्या पायथ्याकडील भागात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.

तर दक्षिण द्वीपकल्पाच्या बहुतांशी भाग, मध्य भारताचा पूर्व भाग, ईशान्य भारतातील राज्ये आणि देशाच्या अति उत्तरेकडे असलेल्या भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.

हवामान विभागनिहाय पावसाचा अंदाज :

विभाग---अंदाज

वायव्य भारत---९२ टक्के

मध्य भारत--- ९४ ते१०६ टक्के

दक्षिण भारत---९४ ते१०६ टक्के

ईशान्य भारत---९४ ते १०६ टक्के

‘अल निनो’ मारक, ‘आयओडी’ तारक

विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागाचे तापमान सर्वसाधारण स्थितीत आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मॉन्सून हंगामात अल-निनो स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत.

अल-निनो मॉन्सूनच्या पावसाला मारक समजला जातो. यातच विषुववृत्ताजवळील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी – इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसाधारण स्थितीत आहे. मॉन्सून हंगामातही ही स्थिती धन (पॉझिटिव्ह) होण्याची शक्यता आहे. धन ‘आयओडी’ भारतातील पावसासाठी पोषक ठरतो.

जून महिन्यात पावसाची दडी

जून महिन्यात देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा (९२ टक्के) अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वायव्य, दक्षिण भारत वगळता देशाच्या बहुतांशी भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.

जून महिन्यात मॉन्सूनच्या आगमनाचा कालावधी असल्याने हवामानात वेगाने बदल होत असतात. त्याचा पावसाच्या वितरणावर परिणाम होतो. यातच जून महिन्यात देशाच्या बहुतांशी भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात यंदा कमी पावसाचे संकेत

मॉन्सून हंगामात देशात यंदा सरासरी पावसाचा अंदाज असला, तरी महाराष्ट्रात मात्र कमी पावसाचे संकेत आहेत. यात उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे. जून महिन्यातही राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे

मॉन्सून हंगामादरम्यान ‘अल-निनो’ स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. तर हिंद महासागरातील ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) धन (पॉझिटिव्ह) राहण्याचे संकेत आहेत. अल - निनोमुळे मॉन्सूनच्या पावसावर बाधक परिणाम होणार असला, तरी धन ‘आयओडी’मुळे भरपाई होणार असल्याने देशात सरासरी पावसाची शक्यता आहे. यातच जून महिन्यात कमी पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी पुरेशा पावसाशिवाय पेरणी करू नये.
- डॉ. डी. एस. पै, प्रमुख, वातावरणीय देखरेख आणि संशोधन केंद्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT