Monsoon Update
Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सूनच्या पूर्वतयारीस सुरुवात

 डॉ. रामचंद्र साबळे 

डॉ. रामचंद्र साबळे

Weather Update In Maharashtra : महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल, उत्तर भारतात १००२ ते १००४ हेप्टापास्कल, तर अरबी समुद्रावर १००८ हेप्टापास्कल आणि हिंदी महासागरावरही १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब स्‍थिर झाला आहे. मंगळवारी (ता. ९) बंगालचे उपसागरातील पाण्याचे तापमान ३१ अंश सेल्‍सिअसपर्यंत वाढेल.

त्यानंतर तेथे चक्रीय वादळाची निर्मिती होईल. सोमवारपासून (ता. ८) बंगालचे उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती होण्यास सुरुवात होईल. या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता बुधवारी (ता. १०) वाढेल. गुरुवारी (ता. ११) बंगालच्या उपसागराच्या भागावर चक्रीय वादळाची सुरुवात होईल. हे चक्रीय वादळ रविवारी (ता. १४) ब्रह्मदेशाच्या दिशेने जाईल.

अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्‍सिअस, हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्‍सिअस, तसेच बंगालच्या उपसागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१.४ अंश सेल्‍सिअस राहील.

यालाच ‘इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह’ (आयओडी) असे म्हटले जाते. तसेच प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्‍सिअस राहील.

या एकंदरीत स्थितीवरून एल-निनो तटस्‍थ असल्याचे दिसून येत आहे. हे सर्व हवामान घटक वेळेवर मॉन्सून दाखल होण्यासाठी अनुकूल बनले आहेत.

राज्यातील काही जिल्ह्यांत आज (ता.८) पूर्वमोसमी पावसाची स्‍थिती कायम राहील. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात आज (ता. ८) पावसात उघडीप राहण्याची शक्‍यता आहे.

या पुढील काळात पावसात उघडीप राहण्याची शक्यता असून, तापमानात वाढ, हवेतील सापेक्ष आर्द्रतेत घट शक्य आहे. त्याचप्रमाणे बाष्पीभवनाचा वेग वाढेल आणि पिकांची पाण्याची गरज वाढेल. महाराष्ट्रातील काही भागांत अतिउष्ण हवामानाची शक्यता राहील.

मॉन्सून स्थितीबाबत यापुढेही सविस्तर माहिती देण्यात येईल. त्यानुसार शेतीकामांचे नियोजन करणे गरजेचे आहे. एकूणच अस्थिर हवामान स्थितीचा हा हंगाम असल्याने हवामानात स्थिरता येण्यास काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. हवामान बदलाच्या कारणाने हवामान स्थितीत बदल होत आहेत. बदलत्या हवामानानुसार पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे राहील.

कोकण

आज, उद्या आणि परवा (ता.८, ९, १०) ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत २३ ते ४८ मि.मी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्‍नागिरी जिल्ह्यांत ३४ अंश सेल्‍सिअस, पालघर जिल्ह्यात ३५ अंश सेल्‍सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यात ३६ अंश सेल्‍सिअस राहील.

सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्‍सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८६ टक्‍के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५४ टक्‍के, तर उर्वरित रत्‍नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४० ते ४७ टक्‍के राहील.

वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग व रत्‍नागिरी जिल्ह्यांत ८ ते १० किमी, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ताशी ६ ते ७ किमी, पालघर जिल्ह्यात ३ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र

कमाल तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ३६ ते ३७ अंश सेल्‍सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३८ अंश सेल्‍सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्‍सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६४ टक्‍के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २५ टक्‍के राहील. वाऱ्याचा ताशी वेग धुळे जिल्ह्यात १८ कि.मी., नाशिक जिल्ह्यात ११ कि.मी., तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ताशी १४ ते १६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत नैॡत्‍येकडून, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.

मराठवाडा

सर्वच जिल्ह्यांत आज (ता.८) पावसाची शक्‍यता नाही. उस्‍मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. तर लातूर जिल्ह्यात आग्नेयेकडून व औरंगाबाद जिल्ह्यात नैॡत्येकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग बीड जिल्ह्यात १५ किमी, तर जालना जिल्ह्यात ८ ते ११ किमी राहील. कमाल तापमान उस्‍मानाबाद व बीड जिल्ह्यांत ३७ अंश सेल्‍सिअस, तर उर्वरित जिल्ह्यांत ३६ अंश सेल्‍सिअस राहील.

किमान तापमान सर्व जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्‍सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४३ टक्‍के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २७ टक्‍के राहील. दुपारी हवामान कोरडे राहील.

पश्‍चिम विदर्भ

सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्‍सिअस, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ४० टक्‍के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २१ टक्‍के इतकी कमी राहील.

वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग बुलडाणा जिल्ह्यात १७ कि.मी, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत १० ते १३ कि.मी. आणि अमरावती जिल्ह्यात ८ कि.मी. राहील. हवामान दुपारी कोरडे राहील.

मध्य विदर्भ

सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्‍सिअस, तर किमान तापमान २६ अंश सेल्‍सिअस राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात वायव्येकडून, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत नैर्ऋत्‍येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ३८ टक्‍के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २२ टक्‍के इतकी कमी राहील. त्‍यामुळे हवामान अत्‍यंत कोरडे राहील.

पूर्व विदर्भ

कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात ४१ अंश सेल्‍सिअसपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्‍सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २५ अंश सेल्‍सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २८ अंश सेल्‍सिअस राहील.

वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आग्नेयेकडून, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ कि.मी. राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४५ टक्‍के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २३ टक्‍के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

आज, उद्या आणि परवा (ता.८, ९ व १०) कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत २३ ते ४२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याची ताशी वेग नगर व सोलापूर जिल्ह्यांत १६ ते १७ किमी व उर्वरित जिल्ह्यांत ८ ते १२ किमी राहील.

कमाल तापमान सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ४५ टक्के राहील.

कृषी सल्‍ला

- जमिनीची उन्हाळी नांगरट करून घ्यावी.

- शेताची बांधबंदिस्‍ती करावी.

- नवीन फळबाग लागवडीसाठी फळपिकांच्या निवडीनुसार योग्य अंतरावर खड्डे काढावेत. खड्डे शेणखत, माती आणि रासायनिक खतांच्या मात्रांनी भरून घ्यावेत.

- उन्हाळी मूग पिकाच्या पक्‍व शेंगाची काढणी करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT