Rainfall Prediction: महाराष्ट्रावर आजपासून बुधवारपर्यंत (ता.२० ते २३) १००२ ते १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यानुसार महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मध्य भाग ते दक्षिण भागात पावसाचे प्रमाण साधारणच राहणे शक्य आहे. गुरुवार ते शनिवार (ता.२४ ते २६) या कालावधीत महाराष्ट्राच्या उत्तर भागावर हवेचे दाब १००० हेप्टापास्कल व मध्य भागावर १००२ हेप्टापास्कल इतके कमी होताच पावसाचे प्रमाण वाढणे शक्य आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही राहील.
या आठवड्यात वाऱ्याच्या दिशेत बदल होत असून, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्याचा परिणाम पावसाच्या वितरणावरही होईल. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. हवामान बदलाच्या प्रभावाने दिशा बदल होऊन पावसाच्या वितरणावर परिणाम होत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांतील पावसाच्या वितरणावर परिणाम झाला आहे.
जुलै महिना हा जास्त पावसाचा महिना असूनही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली व यवतमाळ या जिल्ह्यांत केवळ सरासरी, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा फार कमी पाऊस झाल्याचे चित्र आहे.
कोकण
दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आज (ता. २२) ४० ते ४५ मि.मी., तर रायगड जिल्ह्यात २६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मात्र ठाणे व पालघर जिल्ह्यांत आज (ता.२२) १५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ कि.मी. राहील. कमाल तापमान रत्नागिरी जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस आणि पालघर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तसेच ठाणे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ९१ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ८७ ते ८९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व पालघर जिल्ह्यांत ६६ टक्के, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ७२ ते ७६ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
आज (ता.२२) नाशिक जिल्ह्यात १० मि.मी., तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून, तर जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर नंदुरबार जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व जळगाव जिल्ह्यांत ७६ ते ७९ टक्के, तर नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ८५ ते ८७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता धुळे व जळगाव जिल्ह्यांत ४४ ते ४९ टक्के, तर नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ५३ ते ५८ टक्के इतकी कमी राहील.
मराठवाडा
आज (ता.२२) परभणी जिल्ह्यात १४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मात्र उर्वरित धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत केवळ ३ ते ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. यामागील कारण म्हणजे वाऱ्याच्या दिशेत बदल होणारे आहेत. मराठवाड्यातील या बहुतांशी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहत असून, केवळ परभणी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहणार आहे. हे सर्व हवामान बदलाने घडत आहे.
वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ताशी १६ कि.मी. राहील. परभणी जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ६ कि.मी., उर्वरित लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत ताशी वेग १२ ते १३ कि.मी. राहील. कमाल तापमान लातूर व परभणी जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर धाराशिव व बीड जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर लातूर, परभणी व जालना जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
आज (ता.२२) बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १ मि.मी. इतक्या पावसाची शक्यता आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अमरावती जिल्ह्यात ताशी १० कि.मी., तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ताशी वेग १५ कि.मी. राहील. कमाल तापमान बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ५० टक्के राहील.
मध्य विदर्भ
आज (ता.२२) यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी., तर यवतमाळ जिल्ह्यात ताशी ११ कि.मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा जिल्ह्यात ७६ टक्के, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ८१ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील.
पूर्व विदर्भ
आज (ता.२२) चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ४ ते ५ मि.मी., तर गडचिरोली जिल्ह्यात ९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा गडचिरोली जिल्ह्यात नैॡत्येकडून, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग केवळ ३ ते ४ कि.मी. राहील. कमाल तापमान गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ५६ टक्के इतकी कमी राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज (ता.२२) कोल्हापूर, पुणे व सातारा जिल्ह्यांत १६ ते २० मि.मी. पावसाची शक्यता आहे. तर सांगली, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत ६ ते ८ मि.मी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांत नैॡत्येकडून, तर सांगली, सातारा, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत पश्चिमेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ताशी ८ कि.मी., अहिल्यानगर जिल्ह्यात ताशी ११ कि.मी., तर सांगली व सोलापूर जिल्ह्यांत १२ ते १३ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २७ ते २९ अंश सेल्सिअस, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील.
सातारा जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर, सांगली, सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर सोलापूर व पुणे जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ९३ टक्के, तर उर्वरित सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ८७ ते ८९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५१ ते ६७ टक्के राहील.
कृषी सल्ला
उगवण न झालेल्या ठिकाणी बियाणे टोकावे. दाट उगवण झाली असल्यास विरळणी करावी.
वेलवर्गीय पिके वेल टाकू लागल्यावर मंडप उभारून आधार द्यावा.
भात पुर्नलागवडीनंतर पहिल्या ३० दिवसांपर्यंत शेतात पाण्याची पातळी २.५ ते ५ सेंमी ठेवावी.
खरीप पिके ३ आठवड्यांची होताच, कोळपणी आणि खुरपणी करून तण नियंत्रण करावे.
नवीन लागवड केलेल्या कलमांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.