Summer Season Agrowon
हवामान

Summer Season : असह्य उन्हाळा करुया सुसह्य

Article by Vijay Sukalkar : उष्णतेच्या लाटेत सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे, अन्यथा उष्माघातासारख्या घटना वाढून त्यात जीवित हानी होऊ शकते.

Team Agrowon

Management of Summer Season : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) यंदाच्या उन्हाळ्याचा (एप्रिल ते जून) हवामान अंदाज जाहीर केला असून त्यात पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत तीव्र उष्ण लाटा येण्याची शक्यता वर्तविली आहे. देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने उन्हाळा अधिक तापदायक ठरेल, असे आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केले आहे.

तीव्र उन्हाळ्याच्या पुढील तीन महिन्यांत देशात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम राहणार आहे. त्यामुळे तीव्र हवामान घटनांना तोंड देण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबर जनजागृती आवश्यक असल्याचे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे. राज्याचा विचार करता कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातही उष्ण लाटांच्या झळा बसणार आहेत.

राज्यात तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर गेला असला तरी प्रत्यक्ष तापमानात चढ-उतार होत असतो. राज्यावर पश्चिमेकडून वारे वाहत राहिले तर तापमानवाढ मर्यादित राहते. अशा प्रकारचे वारे समुद्रावरून बाष्प आणतात आणि अधूनमधून वळवाच्या सरीही पडतात. ज्यामुळे तापमान तात्पुरते खाली येते. वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा उत्तरेकडची असली तर तापमानात लक्षणीय वाढ होते.

हे वारे कोरडे असतात. त्यामुळे रखरखीत उन्हाळा भासू लागतो. असे शुष्क गरम वारे सतत वाहत राहिले आणि दुपारचे तापमान सामान्यापेक्षा चार ते पाच अंश सेल्सिअसने वाढले तर त्याला उष्णतेची लाट आली असे म्हणतात. उष्णतेच्या लाटेत वैयक्तिक नागरिकांपासून ते शासन-प्रशासन अशी सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे, अन्यथा उष्माघातासारख्या घटना वाढून त्यात जीवित हानी होऊ शकते.

मागील दोन दशकांपासून देशात दुष्काळ, अवकाळी पाऊस, ढगफुटी, महापूर, गारपीट, विजा कोसळणे तसेच उष्ण लाटा अशा विपरीत हवामानाचे प्रमाण वाढत चालले आहे. अशावेळी त्यात होणारी जीवित वित्त हानी टाळण्यासाठी आपल्याकडे फारसे प्रयत्न मात्र होताना दिसत नाहीत. राज्यात कमी पाऊसमानामुळे दुष्काळाच्या झळा वाढणार असल्याचे चित्र पावसाळ्यानंतरच स्पष्ट झाले होते.

परंतु शासन प्रशासनाने तेव्हा ही बाब गंभीरतेने घेतली नाही. त्यामुळे राज्यातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातील पाणीटंचाई गंभीर वळणावर येऊन ठेपली आहे. पाण्यासाठी दाही दिशा भटकंती सुरू आहे. चारा-पाणीटंचाईमुळे पशुधनाचेही हाल वाढत आहेत. दुष्काळ, पाणीटंचाई म्हटले की शासन-प्रशासनाला टॅंकर आणि चारा छावण्या आठवतात. परंतु ह्या तात्पुरत्या उपाययोजना आहेत, याचा त्यांना विसरच पडलेला दिसतो.

राज्यातील पाणीटंचाई दूर करायची असेल तर पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांवर होणारे अतिक्रमण थांबवावे लागेल. गाव-शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या नद्या प्रदूषित होणार नाहीत, तलाव बुजणार नाहीत, आटणार नाहीत, ही काळजी घ्यावी लागेल. शिवाय पिण्याचे पाणी पुरवठा करताना त्यातील गळती थांबवावी लागेल.

महाराष्ट्रासारख्या दुष्काळ प्रवण राज्यात आता वर्षभर हिरव्या-कोरड्या चाऱ्याचे नियोजन शेतकरी आणि शासन यांनी मिळून करायला पाहिजे. शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर झाला पाहिजे. उद्योगानेही पाण्याचा काटेकोर वापर तसेच ते रि-सायकल करून वापरण्यावर भर द्यायला हवा.

पाणी पुरवठ्यातील गळती पूर्णपणे थांबविली पाहिजे. हे सर्व करीत असताना उष्णतेच्या लाटेच्या काळात मनुष्य-प्राण्यांची देखील काळजी घ्यावी लागेल. उष्णतेच्या लाटेत शेतकरी, शेतमजुरांनी भर दुपारी (एक ते तीन) उघड्यावर कष्टाचे कोणतेही काम करू नये. नागरिकांनी सुद्धा या काळात गरज असेल तरच उन्हापासून संरक्षणाचे उपाय योजूनच बाहेर पडावे.

उष्माघात टाळण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना तसेच झाल्यानंतरच्या प्राथमिक उपाययोजना शहर-जिल्हा प्रशासनाने लोकांपर्यंत पोहोचवायला हव्यात. जिल्हा-तालुका ग्रामीण रुग्णालयांत उष्णाघातांवरील अद्ययावत उपचार तत्काळ रुग्णांना मिळायला हवेत. अशा उपायांनी तापदायक उन्हाळा सुसह्य होण्यास हातभार लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT