Red Alert : मागील तीन आठवड्यांमध्ये या जिल्ह्यात रेड अलर्ट, त्या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर कुठं येलो अलर्ट, असे अलर्ट हवामान विभागाकडून येतायेत. पण आमच्या जिल्ह्यात आज रेड अलर्ट दिला पण माझ्या गावात-परिसरात पावसाचा थेंबही नाही, मग हवामान विभागाने चुकीचा अंदाज दिला, असा निकाल देऊन आपण मोकळं होतो. कधीकधी तर ऊन पडल्यावर हवामान विभागाने रेड अलर्ट दिला की काय? असं आपण उपहासनं म्हणतो. मग खरचं हवामान विभागाने चुकीचे अलर्ट दिलेले असतात का? की आपल्यापर्यंत या अलर्टचा खरा अर्थ पोचत नाही? आपल्या जिल्ह्याचा पावसाचा अंदाज आपल्याला कुठे पाहायला मिळेल? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तर हवामान विभागाने आपल्या अंदाजात दिलेले असतात. त्यासाठी अंदाज समजून घेणे गरजेचे आहे. आपण हाच अंदाज समजून घेणार आहोत.
राज्यात बहुतांशी भागात मागील तीन आठवड्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. पण पावसाचं वितरण समान नाही. म्हणजेच जिल्ह्याच्या एका भागाला पाऊस झोडपून काढतो तर दुसऱ्या भागाला कोरडचं सोडतो. यामुळं शेतकऱ्यांपुढचे प्रश्न आणखी बिकट झाले. त्यातच हवामान विभागाच्या अंदाजावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसते. हवामान विभाग रोज जिल्हानिहाय अंदाज देत असतो. पण बहुतेक शेतकऱ्यांना हा अंदाज नीट समजत नाही. भाषा किचकट असते. त्यात माध्यमही अगदी त्रोटक, रंजक आणि महत्वाचं म्हणजे आपल्या सोयीनुसार उमजलं तेवढंच देतात. सोशल मिडियाचा तर विषयच वेगळा.
हवामान विभाग रोज जिल्हानिहाय वेगवेगळे अलर्ट देत असतो. हा नकाशा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल यात रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट आणि ग्रीन अलर्ट असतात. बरं हे अलर्ट कुणासाठी असतात? तर हे अलर्ट प्रामुख्याने प्रशासनासाठी असतात. म्हणजेच हवामान विभागाच्या अलर्टनुसार प्रशासन आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करतं. बरं हे अलर्ट फक्त पावसासाठीच दिले जात नाहीत. तर हे अलर्ट ऊन, थंडी, वादळ यासाठी दिलेले असतात. मग एक शेतकरी म्हणून या अलर्टचा आपल्याला काय फायदा हा प्रश्न आता तुमच्या मनात आला असलेच. त्याचीही चर्चा आपण करू. पण आधी या सर्व अलर्टचा अर्थ समजून घेऊ….
तर हवामान विभाग एखाद्या भागात संभाव्य म्हणजेच येणाऱ्या धोक्याची चेतावणी देण्यासाठी रेड अलर्ट देतात. म्हणजेच नकाशात लाल रंग दर्शविला जातो. त्या त्या भागातील प्रशासनाने हा अलर्ट लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करावी, असा त्यामागचा हेतू असतो. पावसाविषयी बोलायचं झालं तर, एखाद्या भागात अति जोरदार पाऊस पडून पूरस्थितीची शक्यता असल्यास हवामान विभाग रेड अलर्ट देऊन चेतावणी देते. त्यामुळे स्थानिक प्रशासन तेजावणी समजते. तसेच त्या भागातील नागरिक, शेतकरी आणि इतर घटकांनाही सजग राहण्यासाठी मदत होते. पण इथे एक प्रश्न राहतोच. तो म्हणजेच, हवामान विभागाने रेड अलर्ट दिला. पण बऱ्याच भागात अतिरदार, जोरदार पाऊस तर सोडा चक्क ऊन पडतं. मग असं का होतं? याच कारण म्हणजे आपण केवळ नकाशा पाहतो. मग याचा सविस्तर अर्थ कसा समजून घ्यायचा? तर हवामान विभागाने आपल्या प्रेस नोटमध्ये सुरुवातीलाच जिल्हानिहाय याची माहिती दिली असते. आपण नकाशा पाहिला तर आज पुणे, सातारा, रत्नागिरी, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला. पण पुणे शहरात मात्र खूपच कमी पाऊस पडला. रेड अलर्ट नुसार मुसळधार पाऊस पडायला हवा होता. मग अंदाज चुकला का? असं म्हणता येईल का? तर असं म्हणता येणार नाही. कारण हवामान विभागाने आपल्या अंदाजात पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही भागांमध्ये अतिजोरदार पावसाची जास्त शक्यता असल्याचे म्हटले आहे. पण रेड अलर्ट देताना फक्त देवढ्या भागापुरता देता येत नाही. एखाद्या भागाती पाऊस, पुराचा दुसऱ्या भागातही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्व जिल्ह्याला हा अलर्ट दिलेला असतो.
हे अलर्ट देताना हवामान विभाग जे काही शास्त्रीय शब्द वापरते त्याचे अर्थही दिलेले असते. त्यात वेगवेगळ्या अलर्टचे अर्थ काय आहेत? पावसाची घनता म्हणजेच आपल्या जिल्ह्यातील किती हवामान केंद्रांवर पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यासाठी कोणत्या संज्ञा म्हणजेच शास्त्रीय शब्द वापरले जातात, याची माहिती सविस्तर दिलेली असते. तसेच किती मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे, याची माहितीही दिलेली असते. कोणता शब्द वापरला म्हणजे किती पाऊस पडू शकतो हेही दिलेलं असतं. आपण संपूर्ण अंदाज पाहीला तर तुम्हीही समजून घेऊ शकता. तुम्हाला हवामान तज्ज्ञाची गरज नाही.
ऑरेंज अलर्ट हा येणाऱ्या पावसासाठी किंवा धोक्यासाठी सतर्क असावे यासाठी दिला जातो. पावसाचा ऑरेंज अलर्ट म्हणजेच अलर्ट दिलेल्या भागातील प्रशासन, शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क असावे. आज कोकण, कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, गोंदीया आणि भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिल्याचं नकाशात दिसतं. आपण अंदाज पाहिला तर हवामान विभागानं काही भागात ढगांच्या गडगडाट आणि विजांसह काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला. पण या भागात आपत्ती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. पण प्रशासन आणि शेतकऱ्यांनी सतर्क असावे यासाठी ऑरेंज अलर्ट दिला.
पाऊस किंवा एखाद्या आपत्तीची केवळ माहिती म्हणजेच प्रशासन आणि शेतकऱ्यांचं लक्ष असावं यासाठी हवामान विभाग येलो अलर्ट देते. म्हणजेच नकाशात पिवळा रंग दिलेला असतो. हवामान विभागाने आज मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला. नकाशात जिल्ह्यांची नावंही दिलेली असतात. नाशिक जिल्ह्यालाही येलो अलर्ट आहे. पण नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही भागात ढगांचा गडगडाट आणि विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. पण आपत्ती येण्याची शक्यता नाही. पावसाकडे केवळ लक्ष असू द्यावं, यासाठी येलो अलर्ट दिला.
नकाशात अनेक जिल्ह्यांना ग्रीन म्हणजेच हिरव्या रंगाने दर्शविले असते. मग या जिल्ह्यांमध्ये पाऊसच पडत नाही? तर असं नाही. एखाद्या जिल्ह्यात आपत्तीची शक्यता नाही आणि प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची गरजही नाही, त्यावेळी ग्रीन अलर्ट दिलेला असतो. पण पाऊस पडणार की नाही हे सविस्तर अंदाजात दिलेले असते.
आता हे सर्व पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हलका पाऊस, मध्यम पाऊस, जोरदार पाऊस, अतिजोरदार पाऊस म्हणजे नेमका किती पाऊस? किती सेंटीमीटर पाऊस? तर याची माहिती अंदाजाच्या शेवटी दिलेले असते. तसचं किती मंडळांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचीही सविस्तर माहिती दिलेली असते.
हवामान विभागाच्या मुंबई केंद्रावरून राज्याचा अंदाज दिलेला असतो. आपल्याला IMD Mumbai या व्हेबसाईटवर ( https://mausam.imd.gov.in/mumbai/mcdata/district.pdf) Forecast या पर्यायावर गेल्यास जिल्हानिहाय अंदाज बघता येतो. IMD Nagpur च्या वेबसाईटवर (https://imdnagpur.gov.in/pages/dfw.php) विदर्भाचा अंदाज दिलेला असतो. वेबसाईटवर जिल्हानिहाय अंदाज येतो. अंदाज रोज दुपारी दिलेले असतात. तर IMD Mausam या वेबसाईटवर https://mausam.imd.gov.in/responsive/all_india_forcast_bulletin.php देशातील पावसाचा अदाज देलेला असतो. देशाची सविस्तर माहिती तुम्हाला यातून मिळते. या सर्व वेबासईटच्या लिंक दिलेल्या आहेत. त्या काॅपी करून ठेवा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.