Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon: मॉन्सून हंगामात देशात ९४ टक्के पाऊस; ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊस राहणार

देशात मॉन्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर दरम्यान दीर्घकालीन सरासरीच्या ९४.४ टक्के पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केलं आहे.

Dhananjay Sanap

देशात मॉन्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर दरम्यान दीर्घकालीन सरासरीच्या ९४.४ टक्के पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केलं आहे. हवामान विभागाने देशात यंदा दीर्घकालीन सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. देशभरात सप्टेंबर महिन्यात १६७.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सप्टेंबरमध्ये तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे सप्टेंबरमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या ११३ टक्के पाऊस झाला.

ऑक्टोबर महिन्यात दीर्घकालीन सरासरीच्या ८५ ते ११५ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवला आहे. शनिवारी (ता.३०) ऑनलाइन पत्रकार परिषदेत ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज महापात्रा यांनी जाहीर केला. जून आणि जुलै महिन्यात सरासरीच्या १० टक्के अधिक राहिला. तर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या १७ टक्के पावसाची तूट नोंद झाल्याची माहिती महापात्रा यांनी दिली. 

ऑक्टोबर महिन्यात देशातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये दक्षिण द्वीपकल्प, उत्तर-पूर्व भारत, आणि उत्तर आणि पूर्व भारतातील काही भागात पावसाची शक्यता आहे. मध्य भारतात मात्र पावसाचं प्रमाण अत्यल्प राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर ऑक्टोबर डिसेंबर दरम्यान दीर्घकालीन सरासरीच्या ८८ ते ११२ टक्के राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. याकाळात पूर्वोत्तर, पूर्व मध्य आणि मध्य भारतात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  

महापात्रा म्हणाले, देशात मॉन्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या ९४.४ टक्के पाऊस झाला. यंदा जुलैच्या मध्यात एल निनो सक्रिय झाला. परंतु आयओडी (इंडियन ओशन डायपोल) पॉझिटिव्ह राहिल्यामुळे एल निनोचा मॉन्सूनवर परिणाम झाला नाही. तसेच मॉन्सून हंगामात ५ वेळा कमी दाब क्षेत्रांची निर्मिती झाली. त्यामुळे मॉन्सूनवर एल निनोचा फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे सरासरीच्या ९४.४ टक्के पाऊस झाला. एल निनो २०२४ च्या मार्चपर्यन्त सक्रिय राहील, अशी माहितीही महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. एल निनो मार्च २०२४ पर्यंत सक्रिय राहील. त्यामुळे तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. तर आयओडी फेब्रुवारीपर्यंत सकारात्मक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, यंदाच्या हंगामात मॉन्सूनचे केरळमधील आगमन ८ जूनपर्यंत लांबले. तळ कोकणात ११ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्यातील प्रगतीसाठी वाट पाहावी लागली. २३ जून रोजी राज्यातील पुढील वाटचाल सुरू केलेल्या वाऱ्यांनी दोनच दिवसांत (२५ जून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर नियमित सर्वसाधारण वेळेच्या ६ दिवस आधीच म्हणजेच २ जुलै रोजी मॉन्सून संपूर्ण देशभरात पोचला होता. मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळपत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यंदाही तब्बल आठ दिवसाने उशिराने (ता. २५) मॉन्सूनने राजस्थानातून माघारीस सुरूवात केली आहे. २ जूलै रोजी संपूर्ण देशात पोचलेल्या मॉन्सूनने २ महिने आणि २३ दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला. 

२५ सप्टेंबरपासून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला. परंतु त्यानंतर मॉन्सून परतीला अडथळा निर्माण झाला. आता पुन्हा एकदा मॉन्सूननं परतीचा प्रवास सुरू केल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं आहे. पुढील दोन-तीन दिवसांत मॉन्सून आणखी काही भागांतून माघार घेण्यास पोषक स्थिती असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT