Agriculture Spraying Machine : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथील योगेश गावंडे यांनी तरुण वयातच कृषी उद्योजक म्हणून आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. छ. संभाजीनगर येथून त्यांनी ‘बीई मेकॅनिकल’ची पदवी घेतली. कुटुंबाची सहा एकर शेती असून, वडील राजेंद्र शेतीची सर्व जबाबदारी सांभाळतात. हंगामानुसार कपाशी, तूर, सोयाबीन तसेच मोसंबीसारखं मराठवाड्यातील महत्त्वाचं फळपीक ते घेतात.
...असा झाला यंत्राचा जन्म
अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना योगेश यांच्या चुलत भावाला कीडनाशक फवारणी करताना विषबाधा झाली. तेव्हा अभियांत्रिकी विषयातील ज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना सुरक्षितरीत्या फवारणी करता येईल अशा यंत्राची निर्मिती करावी,
असा सल्ला योगेश यांना वडिलांनी दिला. दरम्यान, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ‘प्रोजेक्ट’ ते उद्दिष्ट होते. योगेशसह तीन विद्यार्थ्यांनी फवारणी यंत्र विकसित करून ते त्या अंतर्गत सादर केले. त्याला प्रथम पारितोषिक मिळाले.
व्यावसायिक निर्मितीचे कार्य
आज फवारणी यंत्रांची निर्मिती हाच योगेश यांच्या ‘करिअर’चा मंत्र झाला आहे. सुरुवातीला आईकडून काही पैसे घेउन योगेश यांनी प्राथमिक पातळीवरचे फवारणी यंत्र बनविले. त्यानंतर संशोधन आणि विकास ही प्रक्रिया सुरूच राहिली. पहिल्या यंत्रातील त्रुटी दूर करून फवारणीचे काम अधिकाधिक सुलभ कसे करता या दृष्टीने पुढील सुधारित यंत्र तयार केले जायचे.
दरम्यान, मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सने या स्टार्ट अपसाठी निधी देऊ केला. मिलिंद कंक, प्रसाद कोकीळ, सुनील रायठठा, आशिष गर्दे, रितेश मिश्रा तसेच अन्य काही संस्थांची मदत झाली. त्यामुळे कंपनी स्थापन करून आजमितीला व्यावसायिक पातळीवर पाच प्रकारची यंत्रे तयार करणे शक्य झाले. सन २०१९ पासून विक्रीस सुरुवात झाली आहे. दरम्यान, कोविडसारखं संकट समोर आलं. मात्र योगेश यांनी हुशारीने त्यातही संधी शोधत महानगरपालिका, विविध दवाखाने यांना निर्जंतुकीकरणासाठी यंत्रांचा पुरवठा केला.
...अशी आहेत फवारणी यंत्रे
मानवचलित यंत्र : हे यंत्र चालविण्यासाठी मानवी ऊर्जा गरजेची असते. त्यास २४ लिटरची टाकी दिलेली आहे. किंमत १० हजार रुपये आहे.
बॅटरी चलित यंत्र : मानवी शक्तीऐवजी या यंत्राला बॅटरी व मोटरची ऊर्जा दिली आहे. किंमत १२ हजार रुपये आहे.
टू इन वन यंत्र : यात मानवी ऊर्जा व बॅटरी असे दोन्ही पर्याय आहेत. काही वेळा काही क्षेत्र फवारून बॅटरी संपली, तर शेत अर्धवट ठेवून माघारी येण्यास लागू नये अशी सुविधा केली आहे. याची किंमत१४ हजार रुपये आहे.
इंजिनचलित पंप : यात दोन एचपी इंजिनाची ताकद यंत्राला दिली आहे. त्यामुळे ते चालवणे अधिक सोपे केले आहे. आंब्यासारख्या उंच झाडांवर फवारणी करणे त्यामुळे शक्य झाले आहे. त्याची किंमत ३० हजार रुपये आहे.
सौरऊर्जेवरील यंत्र : याला सौरऊर्जेचे बळ दिले आहे. एखाद्यावेळी काही एकर क्षेत्र फवारून झाल्यानंतर किंवा तीन तासांनी बॅटरी संपू शकते. मात्र सौरऊर्जेवरील हे यंत्र पाच तास सुरू राहते.
यंत्राची ‘मॉडेल’निहाय वैशिष्ट्ये
बहुतेक सर्व यंत्रे एका चाकावर चालणारी आहेत.
मानवचलित यंत्राला इंधनाची गरज नाही.
सुमारे ४० मिनिटांमध्ये एक एकर फवारणी शक्य होते. आडव्या व उभ्या असा दोन्ही पद्धतींनी फवारणी करता येते. म्हणजेच पाच ते सहा फूट उंच असलेल्या पिकांसह उंच मांडव असलेल्या वेलवर्गीय पिकांत वापर करता येतो.
फवारणी होऊ शकतात अशी पिके उदा. कापूस, सोयाबीन, हळद, आले, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, भेंडी, आंबा.
बूमला चार ते सहा नोझल्स दिलेली आहेत. शक्यतो चार नोझल्सचा वापर सुचविण्यात आला आहे. गरजेनुसार उंची वाढविता येते. पंप पाठीवर घेण्याची गरज नाही. दाब जरुरीएवढा भरपूर असल्याने फवारणी व्यवस्थित, सोपी, गतिशीलतेने व कमी श्रमात करता येते. महिलांनाही यंत्रांचा सहज वापर करता येतो.
दापोली येथील कृषी विद्यापीठातून या यंत्राच्या चाचण्या घेतल्या असून, त्याचे प्रमाणपत्र घेतले आहे. अलीकडेच या यंत्रांना पेटंट मिळाल्याचे योगेश सांगतात.
विक्री व बाजारपेठ
सन २०१९ पासून आजमितीस चार हजारांहून अधिक यंत्रांची विक्री झाली आहे. महाराष्ट्रासह सुमारे २२ राज्यांपर्यंत या यंत्रांचा प्रसार झाल्याचे योगेश सांगतात. केनियातही ते यंत्र पोहोचले आहे. वितरकही नेमले आहेत. अलीकडेच एका कंपनीने ‘नॅनो’ उत्पादनांच्या फवारणीसाठी एक हजाराहून अधिक यंत्रे खरेदी केली आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ‘ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शानांमधूनही यंत्रे सादर केली आहेत.
योगेश गावंडे ७३५०८९९८०१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.