डॉ. सचिन नलावडे
Agriculture Technology in Threshing : कापणीनंतर पिकापासून स्वच्छ धान्य मिळवण्यासाठी हाताने झोडणे, काठीने बडवणे किंवा जनावरांच्या पायाखाली तुडवणे या सारख्या पारंपरिक पद्धती अवलंबल्या जातात. भात, गहू, हरभरा आणि सोयाबीन या सारख्या पिकांची मळणी मोठा दगड किंवा लाकडी ओंडक्यावर आपटून केली जाते. आजकाल मळणीसाठी यंत्रांचा (थ्रेशरचा) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामध्ये काड किंवा पेंढ्यासह कापणी केलेले पीक मळणी यंत्रात टाकतात.
ज्वारी, बाजरी, मका या सारख्या पिकांमध्ये कणसे वेगळी काढून त्यांची मळणी केली जाते. कापणीच्या वेळी पिकामध्ये आवश्यक असणारी आर्द्रता हा घटक मळणीच्या प्रक्रियेमध्ये अडचणीचा ठरू शकतो. पिकांतील आर्द्रता कमी करण्यासाठी कणसे उन्हात चांगली वाळवून घ्यावी लागतात. नंतर बैलाने ओढल्या जाणाऱ्या रुळाने तुडवून धान्य वेगळे केले जात होते. धान्यातील अन्य काडीकचरा काढून टाकण्यासाठी (उफणणी) थोड्या उंचावरून वाऱ्यावर सोडले जात असे.
या सर्व कामांसाठी पारंपरिक पद्धतीमध्ये खळे तयार केले जात होते. खळ्यासाठी शेतातच गोल आकारातील जमीन बडवून कडक केली जायची. ती जागा शेणाने सारवून घेतली जायची. मध्यावर मोठा खांब (मेढ) रोवली जायची. या खांबाभोवती बैल फिरवून मळणी केली जात असे. २०-२५ वर्षांपूर्वीपर्यंत सर्रास दिसणारे गोलाकार खळे आता इतिहासजमा होत आहे. बहुतांश कामांसाठी बैलाची जागा आता ट्रॅक्टर घेत आहे. पारंपरिक मळणीच्या पद्धतीऐवजी विविध प्रकारच्या मळणी यंत्रांना प्राधान्य दिले जात आहे.
बहूपीक मळणी यंत्र
(मल्टी क्रॉप थ्रेशर)
भारतामध्ये प्रामुख्याने वापरली जाणारी मळणी यंत्रे ही डिझेल इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटरवर चालणारी आहेत. या मळणी यंत्रांना आवश्यक असणारी शक्ती २ ते ४० अश्वशक्ती डिझेल इंजिन, ट्रॅक्टर किंवा इलेक्ट्रिक मोटरद्वारे पुरविली जाते. पुली शाफ्ट इंजिनला जोडले जातात. एकापेक्षा अधिक पिकांच्या मळणीसाठी विशेष रचना करण्यात आली असल्याने याला ‘मल्टी क्रॉप थ्रेशर’ किंवा ‘युनिव्हर्सल थ्रेशर’ असेही म्हटले जाते.
‘युनिव्हर्सल थ्रेशर’ मधील घटक
कोणत्याही प्रकारची पिकांची मळणी करण्याच्या उद्देशाने या यंत्राच्या मुख्य ड्रममध्ये बसवलेली अवतल जाळी बदलण्याची सोय असते. या अवतल जाळीचे २ मिमी ते २० मिमी पर्यंत अनेक प्रकार उपलब्ध आहेत. लहान आकाराच्या धान्यांसाठी लहान आकाराच्या जाळीचा वापर केला जातो. उदा. भात (तांदूळ), मका, सूर्यफूल, बाजरी, ज्वारी, रागी, सोयाबीन, लाल मूग, बंगाल मूग, काळे मूग, धणे इ. आकाराने मोठ्या असलेल्या बियांच्या काढणीसाठी मोठ्या आकाराची अवतल जाळी बसवता येते. उदा. दक्षिण अमेरिकन पिंटो बीन, राजमा इ.
सर्व प्रकारचे धान्य पिकांच्या संपूर्ण स्वच्छतेसाठी त्यात २ दोन पंखे (ब्लोअर) आणि एक फॉरवर्ड ब्लोअरची सोय केलेली आहे. राजगिऱ्यासारख्या हलक्या धान्यांसाठी गती कमी अधिक करण्यायोग्य पंखा (व्हेरिएबल स्पीड ब्लोअर) आणि अतिरिक्त ब्लोअर जोडणी उपलब्ध केली जाते.
काढणी व मळणीदरम्यान आलेले बारीक खडे साफ करण्यासाठी गुरुत्वाकर्षणावर आधारित सायक्लोन बसवलेले आहे
मळणी यंत्रात बीटर ड्रम स्टडच्या आकारासह पूर्णपणे समायोजन करण्याजोगे आहेत. ओलसर पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लेडच्या पर्यायांसह वेगवेगळ्या आकाराचे आणि लांबीचे हातोडी सारखे बीटर बसवता येतात.
कचरा काढण्यासाठी सर्व मळणी यंत्रामध्ये विशेष चाळणी बसवली असते.
या मळणी दरम्यान खोडाचे भाग, काड किंवा
पीक अवशेषांची जनावरांना खाण्यायोग्य
आकाराची कुट्टी बनवली जाते. उदा. गहू,
सोयाबीन, हरभरा, वाटाणे, ज्वारी आणि भात यासारख्या प्रमुख पिकांची मळणी केल्यानंतर मिळणारा हा २ ते ३ सेंमी लांबीचा भुस्सा पशुखाद्य म्हणून आशियायी आणि आफ्रिकन देशांमध्ये प्रामुख्याने वापरला जातो.
हे यंत्र डाळी आणि तेलबियांसाठी देखील योग्य आहे.
मळणी यंत्र खरेदी करताना...
आपण कोणत्या पिकांसाठी वापरणार आहे?
त्याला लागणारी शक्ती किती आणि कोणत्या स्रोतांपासून मिळणार आहे?
यंत्र वापरण्याचा खर्च किती येतो?
निर्मितीसाठी वापरलेले साहित्य व घटक उच्च
दर्जाचे आहेत का? त्यांचे आयुष्यमान किती
आणि कोणता भाग साधारण किती कालावधीनंतर बदलावा लागू शकतो, याची माहिती घ्यावी.
यंत्राचा देखभाल खर्च किती येतो?
देखभालीसाठी आवश्यक ते सर्व सुट्टे भाग
जवळच्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत का?
ज्या यंत्राचे वितरक आणि दुरुस्ती कर्मशाळा जवळपास असेल अशाच कंपनीला प्राधान्य द्यावे.
ओलपॅड थ्रेशर
गहू पिकाची मळणी करण्यासाठी ‘ओलपॅड थ्रेशर’चा वापर केला जातो. मळणीच्या जमिनीवर गोलाकार स्वरूपात पसरलेल्या वाळलेल्या पिकावर बैलांची जोडीद्वारे ते
खेचले जाते. त्यात ४५ सेंमी व्यास आणि ३ मिमी जाड अशा सुमारे २० गोलाकार खोबणीदार डिस्क असतात त्यांची
रचना १५ सेमी अंतरावरील तीन ओळींमध्ये केलेली असते. बैल चालविण्यासाठी नियंत्रकाला किंवा माणसाला बसण्यासाठी फ्रेमवर सीट दिली जाते. पेंढ्याचे अधिक प्रभावी कटिंग करण्यासाठी सर्व डिस्क स्टॅगर्ड बसवल्या जातात. एका गाव किंवा खळ्यापासून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी ३ किंवा ४ चाके असतात. या थ्रेशरद्वारे मळणी करणे स्वस्त व कार्यक्षम आहे. मात्र याची उत्पादन क्षमता यांत्रिक थ्रेशरच्या तुलनेत कमी असते. हे यंत्र गहू, बार्ली, हरभरा इ. मळणीसाठी वापरले जाऊ शकते.
विद्यूत ऊर्जा किंवा ट्रॅक्टर पीटीओ चलित भात मळणी यंत्र
इलेक्ट्रिक मोटार चलित / ट्रॅक्टर चलित मोठ्या भात मळणी यंत्रांमध्ये संपूर्ण रोप ओंब्या आणि पेंढा भरण्यासाठी पट्टा असतो. त्यावर पेंढ्या ठेवण्याची व्यवस्था केली जाते. मळणी सिलिंडरवर लोखंडी तारांचे लूप बसवलेले असून, ते पेंढ्यातील धान्यावर आदळतात. त्यामुळे धान्य वेगळे होते. मळणी केलेली साळनंतर अवतल जाळीतून खाली पडते. त्या सोबत पडलेला मोठा कचरा वेगळा करण्यासाठी हलणारी चाळणी असते. तिथे हवेच्या साहाय्याने हलका भुस्सा उडवला जातो. भाताच्या मळणीसाठी यंत्रातील मळणी ड्रमचा वेग ५०० ते ६५० फेरे प्रति मिनिट इतका ठेवल्यास मळणीची कार्यक्षमता वाढते. धान्यांची तुटफूट कमी होते.
भात मळणी यंत्र
भाताच्या मळणीसाठी पॅडलने चालणाऱ्या मळणी यंत्राचा वापर केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने लाकडी पट्ट्यांवर तारेच्या लूपची मालिका जोडलेली असते. त्यांनी पॅडलच्या फिरवण्यातून निर्माण झालेली शक्ती
प्रसारित करण्यासाठी गियर ड्राइव्ह यंत्रणा जोडलेली असते. सिलिंडर उच्च वेगाने परिवलन गतीमध्ये असताना त्याच्या दातांवर भाताची पेंढी धरली जाते. त्यामुळे दाणे एकत्र ओढले जाऊन आतील दातांच्या हातोड्यासारख्या क्रियेने वेगळे केले जाते. मळणी लावलेल्या लूप आणि अवतल जाळीमधील आघात आणि घासण्याच्या क्रियेमुळे भात मळणी केली जाते. पंख्याच्या मदतीने धान्य स्वच्छ केले जाते. साफ केलेले धान्य थ्रेशरच्या तळाशी असलेल्या धान्याच्या आउटलेटमधून खाली जाते.
डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९,
(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.