Chana Cultivation
Chana Cultivation Agrowon
टेक्नोवन

Chana Cultivation : हरभरा लागवडीचे सुधारित तंत्र

टीम ॲग्रोवन

डॉ. शरद जाधव, डॉ. पंकज मडावी, डॉ. विशाल वैरागर,

रब्बी हंगामातील (Rabbi Season) हरभरा हे कडधान्य पीक शेती आणि मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे. आहारामध्ये प्रथिनांची पूर्तता करणारे पीक फेरपालटामध्येही महत्त्वाचे ठरते. हरभरा दाण्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण १९ टक्के असते. हरभऱ्याचे कोवळे शेंडे भाजी म्हणून वापरतात. या कोवळ्या पानात मॅलिक व ऑक्झलीक आम्ल (Malic and Oxalic Acid) असते. गेल्या दोन अडीच दशकामध्ये हरभरा लागवडीखालील (Chana Sowing Region) क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. २०२०- २१ मध्ये महाराष्ट्रामध्ये या पिकाचे क्षेत्र २५.९४ लाख हेक्टर, उत्पादन २८.७३ लाख टन तर उत्पादकता ११०५ किलो प्रति हेक्‍टर होती. प्रगतिशील शेतकऱ्यांनी नवीन सुधारित वाणांचे उत्पादन हेक्‍टरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत घेतल्याचा अनुभव आहे.

उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे मुद्दे

- योग्य जमिनीची निवड आणि पूर्वमशागत.

-अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर.

- वेळेवर पेरणी, पेरणीचे योग्य अंतर, प्रति हेक्‍टरी योग्य रोपांची संख्या.

- बीज प्रक्रिया आणि जिवाणू संवर्धकांचा वापर.

- तणनियंत्रण, पाण्याचे योग्य नियोजन.

- पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेस संरक्षित पाणी देणे.

- रोग आणि किडीं पासून पिकाचे संरक्षण

जमीन

- मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक.

-जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.

-हलकी अथवा भरड, पाणथळ, चोपण, किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये.

हवामान

-हरभऱ्यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक.

-विशेषतः पीक २० दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान १० ते १५ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २५ ते ३०अंश सेल्सिअस असेल तर पिकाची वाढ चांगली होते. भरपूर फांद्या फुले आणि घाटे लागतात. असे तापमानमहाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते.

पूर्वमशागत

-हरभऱ्याची मुळे खोल जातात, त्यामुळे जमीन भुसभुशीत असावी. खरीप पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल नांगरट करून, त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.

-खरिपात शेणखत किंवा कंपोस्ट खत दिले असल्यास वेगळे देण्याची गरज नाही. मात्र खरिपात सेंद्रिय खत दिले नसल्यास हेक्‍टरी ५ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत नांगरणीपूर्वी शेतात पसरावे.

-कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी.

पेरणीची वेळ

१) जिरायत पेरणीची वेळ- २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर. मात्र या वर्षी पाऊस उशिरापर्यंत सुरू असल्याने हा कालावधी पुढे जाऊ शकतो. सामान्यतः सिंचनाची सोय नसलेल्या ठिकाणी हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे २५ सप्टेंबरनंतर जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी केली जाते. करावी.

२) बागायत पेरणीची वेळ - २० ऑक्टोंबर ते १० नोव्हेंबर. पेरणीची वेळ लांबल्यास किंवा डिसेंबर नंतर पेरणी केल्यास उत्पादन कमी मिळते. जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशिरा आणि कमी होते.पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले घाटे कमी लागतात. हरभरा हे रब्बी हंगामाचे पीक असल्याने

कोरडी व थंड हवा त्याला चांगली मानवते.

३) काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करावी.

पेरणीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण

अ) पेरणी : सामान्यतः देशी हरभऱ्याची पेरणी पाभरीने किंवा तिफणीने करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दोन ओळीतील अंतर ३० सेंटिमीटर व दोन रोपांतील अंतर १० सेंटीमीटर अंतरावर टोकण होईल असे ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र विकसित केले आहे. त्याचा वापर करावा. या पद्धतीने पेरणी केल्यास विजय हरभऱ्याचे हेक्‍टरी ६५ ते ७० किलो, तर विशाल, दिग्विजय, विराट किंवा पीकेव्ही-२ या वाणांचे हेक्‍टरी १०० किलो बियाणे लागते. काबुली हरभऱ्यासाठी दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी.व दोन रोपांतील अंतर १० सें.मी.ठेऊन पेरणी करावी. पीकेव्ही-४ आणि कृपा जास्त टपोऱ्या काबुली वाणांकरिता १२५-१३० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे.

ब) सरी वरंब्यावर लागवड : भारी जमिनीत ९० सेंटिमीटर रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूला १० सेंटिमीटर अंतरावर एक -एक बियाणे टोकावे.

बीज प्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ६ ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. यानंतर १० किलो बियाण्यास रायझोबियम व पी.एस.बी. या जिवाणू संवर्धकाचे प्रत्येकी २५० ग्रॅम वजनाचे एका पाकिटातील संवर्धक गुळाच्या थंड द्रावणात एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ मिसळून चोळावे. असे बियाणे तासभर सावलीत सुकवावे आणि मग पेरणी करावी. यामुळे पिकाचे रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होते तसेच मुळावरील नत्राच्या ग्रंथी वाढतात आणि पिकाची वाढ चांगली होते.

सुधारित वाण

सुधारित वाण --- कालावधी (दिवस ) --- उत्पादन (क्विं/हे) --- वैशिष्ट्ये

विजय --- अ) जिरायत ः ८५ ते ९० दिवस, ब) बागायत ः १०५ ते ११० दिवस --- अ) प्रायोगिक १४ ते १५, सरासरी १४, ब) प्रायोगिक ३५ ते ४०, सरासरी १४, क) उशिरा पेरणी ः प्रायोगिक १६ ते १८, सरासरी १६ --- अधिक उत्पादन क्षमता, मर रोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्याकरिता प्रसारित

विशाल --- ११० ते ११५ --- अ) जिरायत : प्रायोगिक १४ ते १५, सरासरी १३ ब) बागायत ः प्रायोगिक ३० ते ३५, सरासरी २० --- आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादन, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.

दिग्विजय --- जिरायत : ९० ते ९५, बागायत : १०५ ते ११० --- अ) जिरायत : प्रायोगिक १४ ते १५, सरासरी १४, ब) बागायत ः

प्रायोगिक ३५ ते ४०, सरासरी २३ क) उशिरा पेरणी ः प्रायोगिक २० ते २२, सरासरी २१ --- पिवळसर तांबूस, टपोरे दाणे मररोग

प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.

विराट --- ११० ते ११५ --- अ) जिरायत : प्रायोगिक १० ते १२, सरासरी ११, ब) बागायत ः प्रायोगिक ३० ते ३२, सरासरी १९ ---

काबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.

कृपा --- १०५ ते ११० --- प्रायोगिक ३० ते ३२, सरासरी १८ --- जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, सफेद पांढऱ्या रंगाचे दाणे सर्वाधिक बाजारभाव, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आणि कर्नाटक राज्यांसाठी प्रसारित (१०० दाण्यांचे वजन ५९.४ ग्रॅम )

साकी ९५९६ --- १०५ ते ११० --- सरासरी १८ ते २० --- मररोग प्रतिकारक्षम, बागायत क्षेत्रासाठी योग्य.

पीकेव्ही-२ --- १०० ते १०५ --- सरासरी १२ ते १५ --- अधिक टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, मररोग प्रतिकारक्षम.

पीकेव्ही-४ --- १०० ते ११० --- सरासरी १२ ते १५ --- जास्त टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, मररोग प्रतिकारक्षम.

बीडीएनजी ७९७ (आकाश) --- १०५ ते ११० --- सरासरी १५ ते १६ --- मध्यम टपोरे दाणे, अवर्षण प्रतिकारक्षम तसेच मर रोग प्रतिकारक्षम.

फुले विक्रम --- १०५ ते ११० --- अ) जिरायत : प्रायोगिक १६ ते १८, सरासरी १६, ब) बागायत ः प्रायोगिक ३५ ते ४०, सरासरी २२ क) उशिरा पेरणी ः प्रायोगिक २० ते २२, सरासरी २१ --- वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने (कंबाईन हार्वेस्टरने) काढणीस उपयुक्त वाण, मध्यम आकाराचे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मर रोग प्रतिकारक, जिरायत, बागायत, तसेच उशिरा पेरणीस योग्य. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, द.राजस्थान , उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागाकरिता प्रसारित.

जाकी ९२१८ --- १०५ ते ११० दिवस --- बागायत ः प्रायोगिक ३० ते ३२, सरासरी १८ ते २० --- टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य, महाराष्ट्राकरिता प्रसारित.

पीडीकेव्ही कांचन --- १०५ ते ११० --- बागायत ः प्रायोगिक ३० ते ३२, सरासरी १८ ते २० --- टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम., जिरायत तसेच बागायत पेरणीस विदर्भ विभागासाठी प्रसारित.

फुले विक्रांत --- १०५ ते ११० --- बागायत ः प्रायोगिक ३५ ते ४२, सरासरी २० --- पिवळसर तांबूस, मध्यम आकाराचे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम, बागायत पेरणीकरिता योग्य, ,महाराष्ट्र, गुजरात, प. मध्यप्रदेश, दक्षिण राजस्थान राज्यासाठी प्रसारित.

खत मात्रा

सुधारित हरभरा वाण संतुलित खत मात्रा आणि पाण्याला चांगला प्रतिसाद देतात.

अ) सेंद्रिय खते : चांगले कुजलेले ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट प्रती हेक्टर शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे.

ब) रासायनिक खते : हरभऱ्याला हेक्‍टरी २५ किलो नत्र,५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश खताची

आवश्यक. यासाठी हेक्‍टरी १२५ किलो डायअमोनिअम फॉस्फेट (डीएपी) आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी बियाण्यालगत पडेल या पद्धतीने दुचाडी पाभरीने पेरून द्यावे. खत विस्कटून टाकू नये.

पीक फुलोऱ्यात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास युरिया (२ टक्के) ची पहिली फवारणी करावी. त्यानंतर १० ते १५ दिवसांनी दुसरी फवारणी पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करावी. यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.

आंतर मशागत

पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासूनच तणविरहित ठेवावे. पीक २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्‍यतो वाफशावर करावी. कोळपणीमुळे तणांचा बंदोबस्त होऊन जमिनीत हवा चांगली खेळती राहते. पिकाची वाढ चांगली होते. कोळपणीनंतर एक खुरपणी करावी. कोरडवाहू क्षेत्रांमध्ये कोळपणीमुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते.

तणनियंत्रणासाठी तणनाशक वापरायचे असल्यास, पेरणीनंतर लगेच परंतु पीक उगवणीपूर्वी वाफशावर पेंडीमेथीलीन हे तणनाशक २.५ लिटर प्रति हेक्‍टर प्रमाणे ५०० लिटर पाण्यातून फवारावे. फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.

पाणी व्यवस्थापन

हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ सेंटीमीटर पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर ७ ते ८ सेंटीमीटर देणे गरजेचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या आतच पिकास पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी, अन्यथा मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.

अ) जिरायत क्षेत्रासाठी ः जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर

हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.

ब) बागायती क्षेत्रासाठी ः बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सरीतील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

तसेच लांबी सुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, त्यामुळे पिकाला प्रमाणशीर पाणी देणे सोयीचे होते.

क) भारी जमीन ः भारी जमिनीकरता पाण्याच्या दोन पाळ्या पुरेशा होतात

पहिले पाणी- ३० ते ३५ दिवसांनी द्यावे.

दुसरे पाणी - ६५ ते ७० दिवसांनी द्यावे.

ड) मध्यम जमीन (तीन पाळ्या द्याव्यात.)

पहिले पाणी-२० ते २५ दिवसांनी द्यावे.

दुसरे पाणी- ४५ ते ५० दिवसांनी द्यावे.

तिसरे पाणी- ६५ ते ७० दिवसांनी द्यावे.

तुषार सिंचन पद्धतीने पाणी देण्याचे फायदे

-या पद्धतीमुळे गरजेइतकेच पाणी देता येते. अति पाण्यामुळे पीक उभळण्याचा धोका टळतो. या पद्धतीमध्ये सुधारित वाणांचे उत्पादन वाढते.

- पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत तुषार सिंचनाने पाणी दिल्यास जमीन नेहमी भुसभुशीत राहते. कोणतीही मशागत सोपी होते.

-सारा, सरी वरंबा पाडण्याची गरज राहत नाही. त्यावरील खर्च वाचतो.

- पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पद्धतीत कमी होतो. असलेली तणे काढणे अतिशय सुलभ जाते.

- मुळकुज रोग प्रादुर्भाव कमी होतो किंवा होत नाही.

- जमिनीत नेहमीच वाफसा स्थिती राहत असल्यामुळे पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात. पिकाची अन्नद्रव्य शोषणक्षमता वाढते.

आंतरपीक

हरभरा पिकात मोहरी,करडई ,ज्वारी ,ऊस या पिकांचे आंतरपीक घेता येते

आंतर पिकाचा प्रकार ओळींचे प्रमाण

हरभरा +मोहरी २:१

हरभरा +करडई २:१

हरभरा+ रब्बी ज्वारी ६:२

उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर १० सेंटिमीटर अंतरावर हरभऱ्याची एक ओळ

टोकण केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते. त्याचबरोबर हरभऱ्याचा बेवड उसाला उपयुक्त

ठरून उसाच्या उत्पादनात वाढ होते.

डॉ. शरद गोविंदराव जाधव, ९९७०९९६८९०

(विषय विशेषज्ञ -कृषी विद्या, कृषी विद्यान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT