कोरडवाहू शेतीसाठी बीबीएफ तंत्रज्ञान फायदेशीर
कोरडवाहू शेतीसाठी बीबीएफ तंत्रज्ञान फायदेशीर 
टेक्नोवन

कोरडवाहू शेतीसाठी बीबीएफ तंत्रज्ञान फायदेशीर

सुनील चव्हाण

भारत हा कृषिप्रधान देश असला ती प्रामुख्याने कोरडवाहू शेती आहे. ही शेती प्रगत करण्यासाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) यंत्र आणि त्याद्वारे पेरणी महत्त्वाची ठरू शकते. अतिवृष्टी किंवा कोरडा दुष्काळ यामुळे कोरडवाहू शेतीमध्ये पिकाच्या उत्पादनात मोठी घट होते. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवणे, तसेच अधिक पावसामध्ये अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे या दोन्ही गोष्टीसाठी रुंद वरंबा सरी लागवड पद्धत फायदेशीर ठरते. रुंद वरंबा सरी पेरणी यंत्र रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पेरणी यंत्र हे ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्र आहे. रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते. उदा. वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या ३ ते ४ ओळी ३० सें.मी. किंवा ४५ सें.मी. अंतरावर ३ ओळी घेता येतात. फाळामध्ये तयार होणाऱ्या सऱ्यांची रुंदी ३० ते ४५ सें.मी. गरजेनुसार ठेवता येते. या पद्धतीमुळे सर्वसाधारणपणे २० ते २७ टक्क्यांपर्यंत जलसंधारण, तर २५ टक्के उत्पादनात वाढ दिसून आली आहे. बीबीएफ पेरणीचे फायदे

  • बीबीएफ पेरणी यंत्राच्या साहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्यास मुलस्थानी जलसंधारण होते. पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो.
  • या पेरणीमध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंबही करता येते.
  • बीबीएफ पद्धतीने निविष्ठा खर्चात (बियाणे, खते इ.) २० ते २५ टक्के बचत होते.
  • खत व बियाणे एकाच वेळी पेरल्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होतो.
  • उत्पादनामध्ये २५ ते ३० टक्के वाढ होते.
  • वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्याने पर्जन्यमान खंडाच्या कालावधीत सुद्धा पाण्याचा ताण तीव्रता कमी होते.
  • जास्त पर्जन्यमान झाल्यास या पद्धतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते.
  • पिकास मुबलक हवा, सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होते. पीक कीड रोगास बळी पडत नाही.
  • उभ्या पिकामध्‍ये आंतरमशागत, ट्रॅक्‍टर किंवा मनुष्‍यचलित फवारणी यंत्राद्वारे कीटकनाशक फवारणे शक्‍य होते.
  • या पद्धतीचा अवलंब केल्‍याने जमिनीची धूप कमी होते. सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास रोखला जातो. पर्यायाने जमिनीची जलधारणा क्षमता वाढते.
  • या पद्धतीमुळे जमिनीची सच्‍छिद्रता वाढून जमीन भुसभुशीत होते. परिणामी पिकाची वाढ उत्‍तम होते.
  • ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्राचे पेरणीचे फण काढून तेथे व्ही आकाराची पास बसविता येते. त्याद्वारे तण नियंत्रण आणि आंतरमशागत करता येते. तसेच सरीमध्ये रिजर ठेवून आंतरमशागत होते.
  • बीबीएफ पेरणी यंत्राचे प्रकार ः

  • क्रिडा (CRIDA- Central Research Institute for dry land Agriculture ) हैदराबाद विकसित चार फणी बीबीएफ पेरणी यंत्र.
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी विकसित पाच फणी बीबीएफ पेरणी यंत्र. या यंत्रामध्ये बियाणे खत पेरणीसह फवारणी आणि रासणी करता येते.
  • ट्रॅक्टरचलित बीबीएफ पेरणी यंत्राच्या साहाय्याने सोयाबीन, मका, हरभरा, तूर, भुईमूग, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, कापूस इ. पिकांची टोकण पद्धतीने वरंब्यावर पेरणी करता येते. प्रत्येक पिकांकरिता वेगवेगळ्या बीजाच्या चकत्या असून, त्या सहजपणे बदलता येतात.
  • शेतकरी अनुभव ः मी जून २०२१ मध्ये ६ एकर क्षेत्रावर बीबीएफ यंत्राने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीनची पेरणी केली. या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु माझ्या शेतातून जास्तीचे पाणी सरीद्वारे वाहून गेल्यामुळे पिकाची वाढ चांगली झाली. मला एकरी ९.५० क्विंटल उत्पादन मिळाले. तेच ज्या शेतकऱ्यांनी प्रचलित पद्धतीने सोयाबीन पेरले होते. त्यांना एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन मिळाले. तसेच बियाणे खते व मजुरीमध्ये बचत झाल्यामुळे २ ते ३ हजार रु. इतकी उत्पादन खर्चातही बचत झाली. - कैलास भिमराव ताटे, (रेलगांव, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद.) जून महिन्यात ०.७० आर क्षेत्रावर बीबीएफ यंत्राने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीनची पेरणी केली. या यंत्राने पेरताना सोयाबीन बियाणे समान अंतरावर आणि खोलीवर पडतो. म्हणून बियाणे, खतांमध्ये बचत झाली. जास्त पाऊस झाल्यानंतरही लगेच निचरा झाला. झाडांना सूर्यप्रकाश व हवा चांगली मिळाली. बीबीएफ वर पेरणी केल्यामुळे मला ०.७० आर क्षेत्रामधून १४ क्विंटल उत्पादन मिळाले. पूर्वी पारंपरिक पद्धतीने केलेल्या सोयाबीन पेरणीतून केवळ एकरी ४ ते ४.५० क्विंटल उत्पादन मिळत असे. - बबन त्रिंबक फोके, (वरूड काजी, ता. जि. औरंगाबाद) मी जून महिन्यात ०.५० आर क्षेत्रावर बीबीएफ यंत्राच्या साहाय्याने सोयाबीनच्या ‘जेएस ३३५’ या जातीची पेरणी केली. त्यातून मला ८ क्विंटल उत्पादन मिळाले. पूर्वी एकरी ४ क्विंटल उत्पादन मिळत होते. ही पेरणीची पद्धत निश्चितच फायद्याची आहे. - सौ. विजयाबाई जयंत देशमुख, (जावतपूर, ता. जि. औरंगाबाद.) (लेखक औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी आणि कृषी पदव्युत्तर पदवीधारक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

    Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

    Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

    Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    SCROLL FOR NEXT