Agro-processing complex for processing cereals and pulses
अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये रोजगार आणि उत्पन्न निर्मितीची प्रचंड क्षमता आहे.अन्नप्रक्रियेसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विविध संस्थांनी क्लीनर, डीस्टोनर, मॅग्नेटिक सेपरेटर, पीठ गिरणी, मिनी राइस मिल, पॅकेजिंग यंत्रणा विकसित केल्या आहेत.
तृणधान्ये आणि कडधान्ये यांच्या व्यवस्थापनासाठी अन्नधान्याच्या प्राथमिक प्रक्रियेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्राथमिक पातळीची अन्नप्रक्रिया करण्यासाठी फार उच्च तांत्रिक कौशल्याची आवश्यकता नसते. हे काम उत्पादन क्षेत्राच्या आसपास केले जाऊ शकते.
तृणधान्ये आणि कडधान्याची शेतानजीक प्राथमिक आणि दुय्यम अन्नप्रक्रियेसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विविध संस्थांनी तंत्रज्ञान आणि यंत्रे विकसित केली आहेत. यामध्ये क्लीनर, डीस्टोनर, मॅग्नेटिक सेपरेटर, पीठ गिरणी, मिनी राइस मिल, पॅकेजिंग यंत्रणा उपलब्ध आहेत. या यंत्रांची क्षमता १०० ते १००० किलो प्रती तास आहे. अन्नधान्यापासून बनवलेली पारंपारिक उत्पादने जसे की, विविध प्रकारचे पीठ, डाळी, मल्टीग्रेन आटा, बेसन, रवा, मुरमुरे, नमकीन, वडी, पापड, सत्तू, संपूर्ण भाजलेले धान्य, तृणधान्यांचे फ्लेक्स, पॉप्ड उत्पादने, इत्यादी थोड्या तांत्रिक प्रशिक्षणाने सहजतेने तयार करता येतात. या उत्पादनांची बाजारातील मागणी बघता शेतीपूरक अन्न प्रक्रिया उद्योगाची उद्योजकीय क्षमता लक्षात येते. विविध धान्ये एकत्र करून दळलेल्या मल्टीग्रेन पिठाचे फायदे ग्राहकांना माहीत आहेत. या प्रक्रियेचे शास्त्रीय प्रमाणीकरण आणि योग्य विक्री करून या पारंपरिक ज्ञानाचे एका व्यवसायात रूपांतर करता येते.कडधान्यांपासून डाळी बनवण्याच्या प्रक्रियेत प्रामुख्याने पूर्व उपचार, धान्याची साले काढणे आणि उरलेल्या धान्याचे दोन भागांमध्ये विभाजन करणे या कामांचा समावेश होतो. भारतात सरासरी १० ते २० टन प्रती दिवस इतकी प्रक्रिया क्षमता असलेल्या डाळ गिरण्या आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली आणि देशातील विविध संस्थांनी कमी क्षमतेच्या डाळ गिरणीची निर्मिती केली आहे. शेतीपूरक अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अनुरूप असलेल्या या डाळ गिरण्यांची क्षमता ५० ते २०० किलो ग्रॅम प्रति तास आहे.वेगवेगळ्या कडधान्यांपासून डाळी बनवण्यासाठी पूर्व उपचाराच्या आधारे ओली आणि कोरडी अशा दोन पद्धती अवलंबल्या जातात. धान्याचे साल काढण्यासाठी साधारणपणे १० टक्के ओलाव्याची आवश्यकता असते. डाळी बनवण्याच्या पारंपरिक पद्धतीने ८२ ते ८५ टक्के संभाव्य उत्पन्नाच्या तुलनेत ६५ ते ७२ टक्के इतके कमी उत्पादन मिळते. १२ ते २० टक्के उत्पादन तुटलेली डाळ आणि पावडरच्या स्वरूपात मिळते. कृषी प्रक्रिया संकुलाची उभारणी
शेतकऱ्यांना तृणधान्ये, कडधान्ये आणि तेलबिया यासह टिकाऊ अन्नधान्यांवर प्राथमिक आणि दुय्यम अन्नप्रक्रिया करण्यास सक्षम बनवण्यासाठी कृषी प्रक्रिया संकुल हा एक व्यावसायिक उपक्रम आहे. अन्नधान्यावर प्रक्रिया करून बनवलेली उत्पादने ही अन्न साखळीत मध्यम स्वरूपाची (जी जशीच्या तशी खाता येत नाहीत) मानली जातात. त्यांची साठवणूक क्षमता जास्त असल्यामुळे हाताळणी, वाहतूक, आणि विपणनासाठी पुरेसा वेळ मिळतो. साधारणपणे कृषी प्रक्रिया संकुलामध्ये अन्नधान्याची स्वच्छता, प्रतवारी करणारी यंत्रे; पीठ आणि मसाले दळण्याची सुविधा; तांदूळ निर्मिती आणि पॉलिश यंत्रणा; तेल आणि डाळ गिरणी यासारख्या यंत्रांची उपलब्धता आहे. कृषी प्रक्रिया संकुलाची रचना ही त्या भागातील कच्च्या शेतीमालाची उपलब्धता आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांसाठी बाजारपेठेतील मागणी या बाबींचा विचार करून केली जाते. कमीत कमी गुंतवणूक, प्रशिक्षणाची अल्प गरज आणि गुणवत्ता नियंत्रणास सोपे असल्याने तृणधान्ये आणि कडधान्यांवर प्रक्रिया करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ऑनलाइन साक्षरतेच्या युगात, ऑनलाइन पोर्टलद्वारे प्रक्रिया केलेल्या विविध पारंपरिक तसेच नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या विक्रीसाठी मोठ्या संधी आहेत. कृषी पर्यटनाचा भाग म्हणून शेतकरी बाजार, रस्त्याच्या कडेला विक्री केंद्र आणि बाजारपेठा नव्याने उभारल्या जात आहेत. त्यामुळे शेतीपूरक अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना मिळत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या लुधियाना येथील केंद्रीय काढणीपश्चात अभियांत्रिकी आणि संशोधन संस्थेमध्ये ( सिफेट) कृषी प्रक्रिया संकुलाच्या स्थापनेसाठी मार्गदर्शन केले जाते. संस्थेने केलेल्या संशोधनानुसार एका कृषी प्रक्रिया संकुलाच्या स्थापनेतून उद्योजकाला अंदाजे ५.२५ लाख प्रति वर्ष आर्थिक परतावा मिळतो. या उपक्रमातून वर्षाकाठी सुमारे २४० दिवसांच्या कालावधीसाठी १० व्यक्तींना रोजगार उपलब्ध होतो. या संकुलामुळे गाव परिसरामध्ये प्रक्रिया उद्योगाची उभारणी करता येते.आपल्या देशातील अन्नप्रक्रियेचे प्रमाण (३ ते ५ टक्के) हे विकसित देशांपेक्षा (५० ते ६० टक्के) अत्यंत नगण्य आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकार विविध योजनांद्वारे पूरक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस योजना (PMFME), एक-जिल्हा एक-उत्पादन उपक्रम (ODOP) सारख्या नावीन्यपूर्ण योजना फायदेशीर आहेत. कृषी यांत्रिकीकरणात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे एक उप-अभियान चालवले जाते. यामध्ये काढणीपश्चात अन्नप्रक्रिया करणाऱ्या यंत्रावर संशोधन आणि निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे. राष्ट्रीय कृषी इन्फ्रा फायनान्सिंग फॅसिलिटी आणि तत्सम योजनेअंतर्गत शेतमालाचे वर्गीकरण आणि प्रतवारी युनिट, प्राथमिक प्रक्रिया संकुल, ई-मार्केटिंग प्लॅटफॉर्मसह पुरवठा साखळी सेवा, सामुदायिक शेती अंतर्गत सोयीसुविधा, कस्टम हायरिंग सेंटर आणि कृषी प्रक्रिया संकुल इत्यादींच्या स्थापनेसाठी आर्थिक साहाय्य मिळू शकते. भारतीय कृषी संशोधन परिषदेने आपल्या विविध संस्था आणि योजनांद्वारे भागधारकांसाठी विविध प्रक्रिया उपकरणे आणि योग्य मोजमापांची साधने विकसित करून उल्लेखनीय कार्य केले आहे.परिषदेतील विविध संस्थांनी विकसित केलेले अन्नधान्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान, पारंपारिक उत्पादनांसाठी अन्नप्रक्रिया मापदंडांचे मानकीकरण, लहान प्रमाणात साठवणुकीची साधने आणि पद्धती या शेतकरी, कुटीर उद्योजक, स्वयं-सहायता गट, शेतकरी उत्पादक संघटना(एफ.पी.ओ.) यांच्यासाठी उपयुक्त आहेत. हे तंत्रज्ञान परिषदेच्या विविध संस्थांमध्ये उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान हस्तांतरण, प्रशिक्षण, आणि उद्योजक-विकास कार्यक्रम इत्यादींद्वारे सहजपणे मिळू शकते. चांगल्या दर्जाच्या यंत्रसामग्रीची निर्मिती आणि प्रक्रियेच्या विविध टप्प्यानंतर उत्पादनाची गुणवत्ता राखण्यासाठी तांत्रिक साहाय्य देखील मिळते. - डॉ. संदीप दवंगे ८१३०२०८८४७
( केंद्रीय काढणीपश्चात अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था(सिफेट), लुधियाना, पंजाब)