Farmer Loan Waive Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदानापासून दोन लाख शेतकरी अजूनही वंचित आहेत. तब्बल ७४० कोटी रुपयांच्या वितरणाला अद्याप वित्त विभागाने मान्यता दिली नसल्याने अजूनही प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार होते.
मात्र, कोरोना महामारीमुळे प्रोत्साहन अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली नव्हती. दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी आर्थिक तरतुदीची घोषणा केली होती. त्यानंतर तीन टप्प्यांत ही रक्कम वाटप करण्यात आली होती. मात्र अजूनही राज्यातील दोन लाख शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.
राज्यातील १२ लाख ७९ हजार ९०४ शेतकरी खाती पात्र ठरविण्यात आली होती. यापैकी दोन लाख शेतकऱ्यांना अजूनही ७४० कोटी रुपयांची प्रोत्साहन अनुदानाची रक्कम अद्याप वितरित झालेली नाही.
या रकमेचा प्रस्ताव मंजुरीसाठी सहकार विभागाने पाठविला आहे. मात्र अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. परिणामी २०१९ पासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
फेब्रुवारीत एक हजार कोटी वितरित
राज्य सरकारने ४७०० कोटी रुपयांची पुरवणी मागणीत तरतूद केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २३५० कोटी त्यानंतर अनुक्रमे ६५०, ७०० आणि फेब्रुवारी महिन्यात एक हजार कोटी रुपये वितरित केली होती. अजूनही पात्र शेतकऱ्यांना ७५० कोटी रुपये वितरित करणे बाकी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.