Mango Crop Agrowon
संपादकीय

Kesar Mango : मोहित करणारा मोहर

Team Agrowon

Mango Crop Management : केसरला सध्या आलेला मोहर टिकला तर फेब्रुवारीमध्येच हापूसबरोबर केसरची गोडी ग्राहकांना चाखता येणार आहे. लवकर आलेल्या फळांना आकर्षक दर मिळून आंबा उत्पादकांचाही फायदाच होईल.

ऑक्टोबरच्या मध्यावर आपण आहोत. हा काळ म्हणजे खरे तर हापूसला मोहर येण्याचा! ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कोकणात हापूस मोहरतो. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये त्याची फळे बाजारात येतात. मराठवाड्यासह राज्यभरातील केसर आंबा बागा सर्वसामान्यपणे डिसेंबर-जानेवारीमध्ये मोहरतात.

काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर मोहर फेब्रुवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत लांबतो. केसर आंबा एप्रिलशेवटी किंवा मेच्या सुरुवातीला बाजारात येतो. म्हणून तर आंबा हंगामाची सुरुवात हापूसने तर शेवट केसरने होतो, असे म्हटले जाते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे केसरला दोन-तीन टप्प्यांत मोहर येत आहे. असे टप्प्याटप्प्याने येणाऱ्या मोहराचे व्यवस्थापन आंबा उत्पादकांना कठीण जातेय. गेल्या वर्षी केसरला नोव्हेंबरमध्येच मोहर आला होता. यावर्षी मात्र ऑक्टोबर प्रारंभीच अनेक केसर बागा पाच ते २० टक्क्यांपर्यंत मोहरल्या आहेत.

हा मोहर सर्वांना मोहित तर करीतच आहे. परंतु त्याचबरोबर उत्पादक ते तज्ज्ञ अशा सर्वांना आश्चर्यचकीतही करतोय. पुढील प्रतिकूल परिस्थिती पाहता हा टिकेल की नाही, याबाबत साशंकताही व्यक्त केली जातेय.

पाऊस सर्वसामान्य आणि पॅटर्ननुसार बरसला तर केसरला जूनमध्ये एकदा नवती येते. ती नवती परिपक्व होऊन ऑगस्टशेवटी किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात परत नवती येते. यावर्षी मात्र जूनची नवती आली. परंतु ऑगस्टमधील प्रदीर्घ खंडाने नवती आलीच नाही.

त्यामुळे काडी अतिपरिपक्व होऊन त्यात मोहरासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन मोहर आला तसेच काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून झालेल्या फटकाऱ्याने आता फार उशिराने नवती येत आहे. त्याला मोहरही उशिराचं येईल. बरेच शेतकरी आता नियमित आणि लवकर मोहर येण्यासाठी पॅक्लोब्युट्राझोलचा वापरही करीत आहेत.

महाकेसर आंबा बागायतदार संघातील शेतकरी असा प्रयोग मागील काही वर्षांपासून करीत असून त्याचे त्यांना चांगले परिणाम पण दिसताहेत. पॅक्लोब्युट्राझोलमुळे आंब्याला फार तर एक महिना आधी म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत मोहर येतो. त्यामुळे सध्या ऑक्टोबर सुरुवातीलाच आलेला मोहर हा हवामान बदलाचाच परिणाम म्हणावा लागेल.

त्यातच आता ऑक्टोबर हिट वाढतच जात आहे. त्यात पुन्हा खूप थंडी पडली तर या मोहराची लहान लहान फळे गळू पडतात. शिवाय सध्या वादळे निर्माण होऊन अवकाळी पावसाचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच फळांचे नुकसान होऊ शकते.

पुढे नैसर्गिक परिस्थिती कशीही असली तरी आंबा उत्पादकांनी लवकर आलेला मोहर टिकविण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवल्यामुळे हो मोहर टिकविणे तज्ज्ञांपुढे देखील आव्हान आहे.

परंतु अनुभवातून तज्ज्ञांनी योग्य ते मार्गदर्शन आंबा उत्पादकांना करावे. आंबा उत्पादकांनी सुद्धा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच बाग तसेच मोहर व्यवस्थापन करावे.

हा मोहर टिकला तर त्याची फळे लवकरच म्हणजे हापूसबरोबर फेब्रुवारीमध्येच बाजारात येतील. ग्राहकांना हापूसबरोबर केसरची गोडी चाखता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे लवकर आलेल्या केसरला प्रिमीयम दर मिळून उत्पादकांचाच फायदा होईल.
मनाला मोहित करतो,
दाट आंब्याचा मोहर...
सुगंध त्याचा दरवळतो,
रानात कोसो दूर...
एका कवीने आंबा मोहराचे असे सुंदर वर्णन केले आहे. असे असले तरी सध्या लवकर आलेला मोहर टिकला तरच त्याचा सुगंध उत्पादकांपासून ते ग्राहकांपर्यंत दरवळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT