Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Maharashtra Rape Issues : राज्यात अलीकडे बलात्काराच्या घटनांत वाढ झाली आहे. बलात्कार; व्यभिचार यासारख्या गंभीर विषयाची चर्चा करताना त्यांच्या मुळाचा शोध घेण्याऐवजी; अशा प्रकरणांना भलतेच वळण दिले जात आहे.
Rape Issue
Rape IssueAgrowon
Published on
Updated on

Rape Root Causes : बदलापूरच्या शाळेतील चिमुकल्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या अक्षय शिंदेला पोलिसांनी गोळ्या घालून मारले; ज्यांनी कुणी हे घडवून आणले त्यांना न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याची गरज वाटली नाही. या प्रतापाने चिडलेल्या लोकभावना शांत होतीलही. मग काय अशा घटनेतील प्रत्येक आरोपीचे मुडदे पाडणार? या कृत्याचे उदात्तीकरण होऊ शकत नाही. बलात्कार; व्यभिचार यांसारख्या गंभीर विषयाची चर्चा करताना त्यांच्या मुळाचा शोध घेण्याऐवजी; बलात्काऱ्याला फाशी द्या, समाजाच्या स्वाधीन करा, आणखी कठोर कायदे करा, इत्यादी संतप्त भावना व्यक्त करून दबाव निर्माण केला की ‘हम करे सो कायदा’वाली हुकूमशाही प्रस्थापित होऊ शकते. कायद्याच्या राज्यात असे चालत नाही. बलात्काऱ्याचे मुडदे पाडल्याने किंवा कठोर कायदे केल्याने बलात्कार थांबत नाहीत. उलट कठोर कायद्याचा आधार घेऊन; यंत्रणा नकोशा झालेल्या लोकांचे जीवन उद्ध्वस्त करू शकते. कठोर कायद्यांचा वापर कसा केला जातो, हे पदोपदी निदर्शनास येते.

निर्वंश होण्याचा धोका पत्करूनही कौरवांनी भर राजदरबारात द्रौपदीला; खुद्द आपल्या भावजयीच्या वस्त्राला हात घातला. मरण निश्‍चित आहे हे दिसत असूनही व्यभिचार थांबत नाहीत; विकृत नराधम बलात्कार करून खून करतात. अशी कृत्ये ठरवून केली जातात की त्याला मानवी मेंदूतील निसर्गाने निर्मिलेली रचना जबाबदार आहे? निसर्गाने पुरुष आणि स्त्री यांना मुक्त समागमाचे दिलेले स्वातंत्र्य बंदिस्त केल्याने तर असे घडत नसेल? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. स्त्री आणि पुरुष यांच्यातील भिन्नलिंगी आकर्षण हा मानवी मेंदूत निसर्गक्रमाने उत्क्रांत झालेला प्रोग्राम असतो. निसर्गासाठी नैतिक, अनैतिक असे काही नसते. मानवी मेंदूचा प्रोग्राम त्यांना सांगतो; मुक्त समागमाच्या माध्यमातून लैंगिकतेचे शमन करा, तर संस्कार, संस्कृती आणि नियम सांगतात; लैंगिकतेचे दमन करा. समागमाच्या मुक्त लैंगिक शमनाला बांध घालून लैंगिक बंधन स्वीकारायला मेंदू नकार देतो. संस्कारापेक्षा मेंदूतील रसायनांचा माणसांच्या वर्तणुकीवर अधिक प्रभाव असतो.

Rape Issue
Kolkata Doctor Rape Murder Case : एक डॉक्टर की मौत

तीन लाख वर्षांपूर्वी माणूस अस्तित्वात आला; सत्तर हजार वर्षांपूर्वी त्याचा मेंदू विकसित झाला. तेव्हापासून माणसाच्या पूर्वजांत स्त्री-पुरुषातील लैंगिक संबंध मुक्त होते. हा विषय पाप-पुण्य इत्यादी संस्काराशी जोडला जात नसे. साठ हजार वर्षांपासून स्त्री-पुरुषांची वाटचाल मुक्त लैंगिक संबंध ठेवत झाली. जेमतेम दहा हजार वर्षांपूर्वी शेतीच्या मालकीचा आणि वारसाचा प्रश्‍न सोडविण्याच्या गरजेतून कुटुंब व्यवस्था बळकट होत गेली. लढण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक होते. स्त्री अनेक मुलांना जन्म देऊ शकते, हे लक्षात आल्यामुळे स्त्रियांवरील मालकी ठरवली जाऊ लागली. स्त्री आणि जमीन हे दोन घटक सृजनाचे काम करतात. स्त्री मुलांना जन्माला घालून गुणाकार करते तर शेतकरी शेतीत एक दाण्याचे हजार दाणे निर्माण करून गुणाकार करतात. बहुतेक लढाया आणि संघर्ष स्त्रीला बंदिस्त करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना लुटण्यासाठी झाल्या. मानवाने निसर्गविपरीत तयार केलेली कोणतीही व्यवस्था; भलेही ती माणसाला नैतिक वाटत असेल ती मानवाच्या मेंदूच्या मूळ रचनेत हस्तक्षेप करून त्याच्या स्वातंत्र्याचा संकोच करते. जातीय अस्मितावादी, धार्मिक मुखंड आणि कायदे करणारे सरकार या संस्था त्यांच्या स्वतःच्या मान्यता आणि अधिकार बळकट करण्यासाठी माणसावर निर्बंध घालतात.

मानवाने तयार केलेल्या व्यवस्था मेंदूची रचना सहजासहजी स्वीकारत नाही. माणसामध्ये कामभावना जागृत करणारे ‘टेस्टॉस्टेरॉन’ हे रसायन स्त्रियांपेक्षा वीस ते चाळीस पट अधिक असते. त्यामुळे पुरुषाची लैंगिक भूक तातडीची असते; आणि तो कोणत्याही मोसमात समागमाला तत्पर असतो. स्त्री सर्जक असल्यामुळे ती बाळाला जन्म देते. एकदा गर्भ राहिला की ती नऊ महिने बाळ पोटात वाढवते. त्याला पोसण्यासाठी काही कालावधी लागतो. शिवाय बाळंतपणानंतर स्त्री बीज तयार होण्यासाठी काही काळ जावा लागतो. दुसरी बाब म्हणजे स्त्रीला उत्तेजित होण्यासाठी टेस्टॉस्टेरॉन सोबतच इस्ट्रोजन आणि ऑक्सीटोसिन या अतिरिक्त रसायनाची गरज असते. त्यामुळे स्त्री कामातुर होण्यास वेळ घेते. मुक्त लैंगिक संबंधाला प्रतिबंध घालण्यापूर्वी पुरुषांची कामभावना शमनाची व्यवस्था इतर स्त्रियांकडून भागवली जात होती. त्यामुळेच स्त्रीवरील लैंगिक हल्ल्यांना प्रतिबंध बसत असे.

Rape Issue
Badlapur School Case : चिमुरड्यांवरील अत्याचारावरून नागरिकांचा उद्रेक

नैसर्गिक लैंगिक संबंध प्रतिबंधित करण्यासाठी संस्कार, पाप, पुण्य, योनिशुचिता, असल्या संकल्पना लादून केवळ स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला जातो, तिला बंदिस्त केले जाते तर पुरुषाला मात्र मुक्त ठेवले जाते.ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू; इत्यादी लैंगिक दमनाचे संस्कार झुगारूनही स्त्री आणि पुरुष लैंगिकता शमवण्याचे मार्ग स्वीकारतात. अशा संबंधाकडे कानाडोळा करणारा प्रगल्भ समाज पूर्वीही होता आजही आहे. अपवाद परिस्थितीत एकत्र कुटुंबात एखादी बाई विधवा झाली तर घरातील कोणीतरी पुरुष तिच्या लैंगिक भावना शमवत असे. त्यामागे विधवेला इतरांच्या शरीरसंबंधातून झालेल्या संतानाला जमिनीचा वारस ठरवण्याची वेळ येऊ नये हा स्वार्थही होता. घरातील सदस्य आणि समाज अशा घटनांचा बाऊ करत नसे; त्या घटनेला पाप पुण्याशी जोडत नसे.

पुरुषाच्या कामवासना उत्तेजित करणारे टेस्टॉस्टेरॉन हे रसायन कारणीभूत असते. तसेच उत्तेजनातिरेक होऊ नये याचे भान देणारे सेरॉटोनिन हे रसायनही असते. स्त्रियांमध्ये उत्तेजनेला ताब्यात ठेवणारे सेरॉटोनिन रसायन मूलतः अधिक असते. त्यामुळेच सगळे स्त्री आणि पुरुष व्यभिचारी, बलात्कारी होऊ शकत नाहीत. सामाजिक तणाव, सततचा अपमान, आर्थिक अरिष्ट, सातत्याने दुर्लक्षित राहणे, कौटुंबिक अस्वास्थ्य, लैंगिक कुंठा, इत्यादी घटनांचा तणाव असह्य झाला की अपवादा‍त्मक परिस्थितीत एखादा पुरुष प्रक्षुब्ध आणि आक्रमक होऊन बलात्कारासारखे अपराध करू शकतो.

दारूबंदी केली म्हणजे माणूस दारू सोडत नाहीत; प्यायची तो कुठूनही मिळवून पितोच. ज्याला प्यायची नसते तो शंभर दारूची दुकाने ओलांडून गेला तरी त्याकडे फिरकत नाही. स्त्री-पुरुष लैंगिकतेचे तसेच आहे. स्त्री अथवा पुरुषाला कामभावना अनिवार झाली तर ते शमवण्याचा प्रयत्न करणे नैसर्गिक आहे. पण यामागील शास्त्र, लैंगिक भूक निर्मितीचे केंद्र आणि त्याचा कार्यकारणभाव काय हे समजून घेण्यासाठी मानवी मेंदूच्या उत्क्रांतीचा इतिहास समजून घ्यावा लागेल. उद्याच्या लेखात या विषयाच्या आणखी खोलात जाऊन उलगडा करण्याचा प्रयत्न करूया.

(लेखक शेतकरी संघटना न्यास आंबेठाणचे विश्‍वस्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com