Saline Land Agrowon
संपादकीय

Saline Water Belt : खारपाण पट्ट्याचा करा शाश्‍वत विकास

विजय सुकळकर

Agriculture Salinity : मुळातच विदर्भात शेती समस्या अनेक आहेत. त्यात खारपाण पट्ट्याच्या समस्या तर अजून वेगळ्या आहेत. खारपाण पट्ट्यातील संपूर्ण मातीचा कॉलमच क्षारयुक्त व खारवट आहे. मातीच खारवट असल्याने त्यातील पाणीही क्षारयुक्त आहे, मात्र ते गुणधर्माने विम्ल आहे. हे पाणी सिंचनासाठी वापरता येत नाही.

धरणाचे गोडे पाणी या भागात आणावे तर ते पाटपाण्याने देता येत नाही. पावसाळ्यात दलदल फुगलेली शेती तर उन्हाळ्यात भेगाळलेल्या जमिनी येथे पाहावयास मिळतात. या भागात पाऊस कमी आणि जास्त झाला तरी लगेच पिके धोक्यात येतात. शेतीसाठी अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत काही शेतकरी तूर, हरभरा, कापूस, बडीशेप, ओवा, जिरे या पिकांचे चांगले उत्पादन घेत आहेत.

एवढेच नव्हे तर या भागातील माती-पाण्याच्या वेगळ्या गुणवैशिष्ट्यांमुळे येथील शेतीमालाचा दर्जाही वेगळा आहे. वेगळी गुणवैशिष्ट्ये लाभलेल्या शेतीमालाचे योग्य मार्केटिंग करून काही शेतकरी अधिक दर पदरात पाडून घेत आहेत. खारपाण पट्ट्यातील हरभऱ्याला विशिष्ट अशी नैसर्गिक खारवट चव असते.

त्याचपाठोपाठ येथील थोड्या वेगळ्या चवीच्या तूर डाळीलाही आता मागणी वाढत आहे. अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा संभू येथील अभिजित देशमुख यांनी तुरीचे नैसर्गिक पद्धतीने उत्पादन घेऊन नॅचरल ब्रॅण्डखाली विक्रीवर भर दिला आहे. त्यांची ही तूर सातासमुद्रापार अमेरिकेत पाठविण्यासाठी तिकडे स्थायिक धर्मपाल कांबळे आणि संजय वाघमारे यांनी त्यांना मदत केली आहे.

खरे तर शेतीमाल पिकविण्यापासून ते विक्रीपर्यंत अनेक आव्हाने असलेला खारपाण पट्टा संशोधन पातळीवर दुर्लक्षित तर आहेच, मात्र शासन-प्रशासनाचे देखील या भागाकडे लक्ष दिसत नाही. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा या तीन जिल्ह्यांत चार लाख ७० हजार हेक्टरवर पसरलेला खारपाणपट्टा हा भारतातीलच नव्हे, तर जगातील एक नावीन्यपूर्ण असा भूभाग म्हणावा लागेल.

हा खारपाणपट्टा मानवी व्यवस्थापन चुकीने नव्हे, तर नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण झालेला आहे. इतरत्र उपलब्ध खारपाण पट्टे आणि विदर्भातील खारपाणपट्टा यात मोठा फरक आढळून येतो. त्यामुळे खारपाणपट्ट्यांसाठी इतरत्र कुठेही झालेले संशोधन या भागासाठी जसेच्या तसे लागू पडत नाही. असे असताना या भागातील कृषी विद्यापीठांतर्गत विविध छोट्यामोठ्या प्रकल्पांतून झालेल्या संशोधनापलीकडे या खारपाणपट्ट्यावर फारसे काही काम झाले नाही.

खारपाण पट्ट्यातील जमिनीतील क्षारता पूर्णपणे काढून टाकू, असे यातील काही जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु हा खारपाणपट्टा नैसर्गिक असल्यामुळे तसे करणे सयुक्तिक नसून, क्षारनिर्मूलन करून नव्हे, तर त्याचे व्यवस्थापन करीत शेती करावी लागेल. या भागातील शेतीत पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन हेच फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी मृद व जलसंधारणावर भर द्यावा लागेल.

महत्त्वाचे म्हणजे सर्वत्र राबविण्यात येणारे मृद्‍-जलसंधारणाचे उपचार इथे सरसकट वापरता येत नाहीत. त्यामुळे मूलस्थानी जलसंधारणाचे धोरण आधी निश्‍चित करावे लागेल. शेततळ्यांच्या माध्यमातून संरक्षित सिंचन हा पर्याय या भागात उत्तम आहे. पिकांचे उत्पादन घेण्यासाठी जमिनीच्या सेंद्रिय कर्बामध्ये वाढ करावी लागेल. खारपाण पट्ट्यास पूरक तसेच हवामान अनुकूल पिकांना प्रोत्साहन द्यावे लागेल.

खारपाण पट्ट्यातील हरभरा, तूर यासह इतरही शेतीमालास विशिष्ट चव आहे. या भागात पिकणाऱ्या शेतीमालाचे पौष्टिक मूल्य (न्यूट्रिशनल व्हॅल्यू) तपासून वेगळे गुणवैशिष्ट असलेल्या पिकांना जीआय मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. अशा जीआय मानांकनप्राप्त सर्व शेतीमाल विशिष्ट ब्रॅण्डने जगभर पोहोचल्यास खारपाण पट्ट्याचा शाश्‍वत विकास होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्य

Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?

Samruddhi Train : शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Soybean Procurement : सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

Crop Insurance : शेतकऱ्यांना विक्रमी पीकविमा

SCROLL FOR NEXT