Agricultural Export
Agricultural Export Agrowon
संपादकीय

Agriculture Export : शेतीमाल निर्यातीत नेतृत्वाची संधी

टीम ॲग्रोवन

यंदाच्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत शेतीमाल (Agriculture Produce) तसेच प्रक्रिया केलेल्या खाद्य पदार्थांची निर्यात (Food Export) गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या काळात शेतीमाल निर्यात (Agriculture Export) १५ अब्ज डॉलर होती, ती आता साडे सतरा अब्ज डॉलर झाली आहे. असे असले तरी गेल्यावर्षी पहिल्या आठ महिन्यांत कृषी आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात २२.१ टक्क्यांनी वाढली होती.

त्या वाढीच्या तुलनेत यंदाची निर्यात वाढ कमीच म्हणावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे गेल्यावर्षी कोरोना लॉकडाउन तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा प्रभाव आयात-निर्यातीवर होता. असे असताना निर्यातीचा टक्का अधिक होता, हे लक्षात घेतले पाहिजे. गहू बासमती तांदूळ, बिगर बासमती तांदूळ, ताज्या फळे-भाजीपाला, प्रक्रियायुक्त पदार्थ तसेच डेअरी आणि पोल्ट्री प्रॉडक्ट्स अशा सर्वांमध्येच निर्यातीत वाढ आहे. मागील काही दिवसांपासून संपूर्ण जगाला अन्नसुरक्षा सतावते आहे.

बहुतांश शेतीमाल उत्पादक देशांनी निर्यातीसाठी हात आखडता घेतला आहे. अन्नसुरक्षेसाठी खाद्यान्नाचा साठा करून ठेवण्याकडे त्यांचा कल दिसतो. नैसर्गिक आपत्तींमध्ये पिकांचे वाढते नुकसान आणि युद्धामुळे विस्कळीत झालेली आयात-निर्यात ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. अशा परिस्थितीत आपली खाद्यान्न निर्यात वाढत असल्यास त्याचे स्वागतच करायला पाहिजे. वाढत्या निर्यातीची ही सगळी किमया उत्पादक शेतकरी, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार, पणन विभाग, अपेडा असा सर्वांची आहे, हेही मान्य करावे लागेल.

शेतीमाल तसेच प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्यातवाढीसाठी अपेडा प्रयत्नशील असले तरी अजूनही देशातून अपेक्षित निर्यात होत नाही. कोरोना महामारी तसेच रशिया-युक्रेन युद्ध पश्चात भारतातील गहू, तांदूळ अशा खाद्यान्नासह ताजा भाजीपाला-फळे, अन् प्रक्रियायुक्त पदार्थांना जगभरातून मागणी वाढतेय. त्यामुळे असे सर्व पदार्थ जगभर पोहोचविण्याची एक चांगली संधी भारताकडे आहे. अमेरिका (८० टक्के), युरोपच्या (७० टक्के) तुलनेत आपण शेतीमाल प्रक्रियेत खूप मागे (१० टक्के) आहोत.

देशात टाकाऊ शेतीमालावरच प्रक्रिया केली पाहिजेत, या मानसिकतेतून आता बाहेर पडावे लागेल. प्रीमियम क्वालिटीचा माल प्रक्रियेसाठी वापरला गेला पाहिजेत. शिवाय प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी भांडवली गुंतवणुकीबरोबर खेळते भांडवल पण बॅंकांनी द्यायला हवे. असे झाले तरच शेतीमालावर प्रक्रियेत आपला टक्का वाढणार आहे. अपेडाने शेतीमाल आणि प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्यातीत जागतिक पातळीवर भारताला नेतृत्व कसे करता येईल, असे उद्दिष्ट ठेवून निर्यातीचा कार्यक्रम आखला पाहिजे.

महत्त्वाचे म्हणजे त्याला केंद्रीय कृषी तसेच वाणिज्य-व्यापार मंत्रालयाची चांगली साथ लाभायला हवी. मागील काही वर्षांपासून अन्नधान्य तुटवडा तसेच वाढत्या महागाईच्या भीतीने शेतीमालावर निर्यात निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे निर्यातीला ब्रेक लागत आहे. अपेडासह शेतीमाल निर्यातीसंबंधी केंद्रातील सर्व मंत्रालयाने जगभरातील नवनव्या बाजारपेठा शोधून तेथे आपला शेतीमाल, प्रक्रियायुक्त पदार्थ कसे पोहोचतील, हे पाहायला हवे.

सेंद्रिय अथवा रसायन अवशेषमुक्त शेतीमाल, भौगोलिक मानांकन (जीआय) असलेला शेतीमाल त्याचबरोबर आता आपली पौष्टिक भरडधान्य आणि या सर्वांचे प्रक्रियायुक्त पदार्थ यांनी देखील प्रचंड मागणी आहे. अशा वैशिष्टपूर्ण शेतीमालाचे भारताच्या स्वतंत्र ब्रॅण्डने जगभर पोहोचविण्याचे नियोजन करायला हवे.

निर्यातीतील सातत्यामुळे शेतीमालास चांगला दर मिळतो. देशांतर्गत बाजारात दर टिकून राहतात. देशाला परकीय चलन मिळते. जगभर खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून आपण नावारूपाला येऊ शकतो. शेतीमाल प्रक्रिया असो की निर्यात त्यात शेतकऱ्यांचा, उत्पादक कंपन्यांचा सहभाग वाढला पाहिजेत. असे झाले तर शेतीमाल प्रक्रिया तसेच निर्यातीचा थेट लाभ शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT