Onion  Agrowon
संपादकीय

Onion Variety Research : कांदा वाण संशोधन : एक चिंतन

Agriculture Research : खरीप तसेच लेट खरीप कांद्यामध्ये जमिनीतील अतिरिक्त ओलाव्यास सहनशीलतेबरोबर हवामानातील अधिक आर्द्रता तसेच दमटपणा यांत तग धरणारे वाणं पण विकसित करावी लागणार आहेत.

विजय सुकळकर

Agriculture Innovation : कोणत्याही पिकाच्या नवीन वाण संशोधनामध्ये पूर्वी विकसित वाणांच्या तुलनेत नवा वाण कसा सरस आहे, याचा तुलनात्मक अभ्यास हा नेहमीच केला जातो. आधी विकसित वाणांच्या तुलनेत कीड-रोगास प्रतिकारक्षम, अधिक उत्पादनक्षम याचबरोबर इतर काही खास गुणवैशिष्ट्ये असतील तरच अशा वाणास संबंधित संस्थांकडून मान्यता मिळते. त्यामुळेच वाण संशोधकांचा कल देखील शेतकरी तसेच ग्राहकांची मागणी आणि पूर्वीपेक्षा गुणवत्तेत सरस वाण विकसित करण्यावर असतो.

एनएचआरडीएफ अर्थात राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान या संस्थेने निवड पद्धतीने ‘एल - ८८३’ हा वाण विकसित केला आहे. खरीप व लेट खरीप लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेल्या या वाणाचा कालावधी ८० ते ८५ दिवस, तर उत्पादनक्षमता प्रतिहेक्टर ३२.५ टन आहे. खरीप, लेट खरीप हंगामाच्या तुलनेत या पूर्वीच्या जातींपेक्षा १५ ते २० दिवस लवकर काढणीस येणाऱ्या या वाणाची उत्पादनक्षमता मात्र कमीच आहे.

खरिपात एकरी १० ते १२ टन, अर्थात हेक्टरी ३० टनांपर्यंत उत्पादन सध्या मिळत असताना जेमतेम तेवढेच उत्पादन देणारी ही जात आहे. लेट खरिपामध्ये ४० ते ४५ टन प्रतिहेक्टर उत्पादनक्षम जाती (भीमा रेड, भीमा राज) यापूर्वीच विकसित झाल्या आहेत.

एल - ८८३ या कांदा वाणाच्या साठवणूक क्षमतेबाबत बोलायचे झाले तर तीन महिने म्हणजे मध्यम साठवणूक वर्गातच हे वाण मोडते. कांद्यामध्ये एक ते दीड महिना साठवणक्षमता खराब, दीड ते तीन महिने मध्यम तर तीन ते सहा महिने उत्तम समजली जाते. खरीप हंगामात सतत पडणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा न झाल्यास कांदे सडतात, माना लांब होतात. त्यामुळे कांदे न पोसणे, ओल्या जमिनीमुळे सुकवणी न होणे, काढणीनंतर लगेच कोंब येणे अशा समस्या उद्भवत असतात. एल - ८८३ हा वाण अतिरिक्त ओलाव्यास सहनशील असल्याने कांदे सडणे, त्यांना लगेच कोंब येणे या समस्या उद्‍भवणार नाहीत, ही या वाणाची जमेची बाजू म्हणावी लागेल.

कांदा दरात सातत्याने चढ-उतार होत असले तरी बहुतांश वेळा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमीच दर मिळतो. शिवाय कांद्याचे दर कमी असताना त्यांना साठवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक शेतकरी लेट खरीप, उन्हाळ कांदा साठवतातही. परंतु अशा साठवणुकीत कांदा सडून शेतकऱ्यांचे नुकसानच होते. अशावेळी अधिक उत्पादनक्षम वाणाने कांद्याचे उत्पादन वाढले, शेतकरी हा कांदा दीर्घकाळ पर्यंत खराब न होता साठवून ठेवू शकला तर त्यास अधिक दराचा लाभ मिळू शकतो.

खरीप तसेच लेट खरीप कांद्यामध्ये जमिनीतील अतिरिक्त ओलाव्यास सहनशीलतेबरोबर हवामानातील अधिक आर्द्रता तसेच दमटपणा यात तग धरणारे वाण पण विकसित करावी लागणार आहेत. कांद्याच्या संकरित वाणांबाबत देशात संशोधन वाढवावे लागेल. खरीप कांदा उत्पादनासाठी आपण प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांवरच अवलंबून आहोत.

देशात सर्वाधिक कांद्याचा वापर पंजाबात होतो. परंतु तिथे कांद्याचे फारसे उत्पादन होत नसल्याने नाशिकचा कांदा पंजाबात जातो. कांद्याची ही वाहतूक महाग पडते, शिवाय वाहतुकीत बराच कांदा खराब होतो. अशावेळी प्रांतीय गरजेनुसार नव्या वाणांची निर्मितीवरही भर द्यावा लागेल. प्रक्रियेसाठी पांढऱ्या कांद्याचे चांगले वाण अजूनही उपलब्ध नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेऊन कमी कालावधी, टिकवण क्षमतेत वाढ, अधिक उत्पादनक्षम, प्रक्रिया आणि निर्यातीस सुलभ अशा अनेक बाबतीत कांदा वाण संशोधनात काम व्हायला पाहिजेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT