Kharif Sowing Agrowon
संपादकीय

Monsoon Update 2023 : मॉन्सून आला, पुढे काय? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी?

Team Agrowon

Weather Update : मॉन्सूनची लांबलेली वाटचाल आता पुन्हा सुरू झाली आहे. कोकणात थांबलेला मॉन्सून आता सक्रिय होऊन मुंबईसह उर्वरित राज्यात देखील सुरुवात झाली आहे. पेरणीसाठी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही चांगली वार्ता असली, तरी अख्खे मृग नक्षत्र कोरडे गेले आहे.

मृग नक्षत्रात पेरण्या झाल्या नाहीत तर बहुतांश पिकांचे उत्पादन घटते. मॉन्सूनच्या बाबतीत बोलायचे झाले, तर प्रत्येक वेळचा मॉन्सून हा वेगळा असतो. त्याचे आगमन, वितरण आणि परतीचा प्रवास देखील दरवर्षी काही ना काही वेगळेपण दाखवितो; हेच तर मॉन्सूनचे वैशिष्ट्य आहे.

या वर्षी एकाच दिवशी मॉन्सूनने देश व्यापला असे चित्र आहे. देशभर जवळपास सर्वत्र पाऊस पडतोय. मॉन्सून दरवर्षी न चुकता नक्की येतो. त्यामुळेच तर ठरावीक हंगामात निश्‍चित येणाऱ्या पावसाला मॉन्सून म्हटले जाते.

मॉन्सून हा आपल्यासाठीच नाही तर आशिया खंडातील सर्वच देशांसाठी उपयुक्त मानला जातो. कृषिप्रधान भारतातील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. शेती बरोबरच या देशातील बहुतांश उद्योग-व्यवसायाचा गाडाही पावसापासून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावरच चालतो. यावरून मॉन्सूनचे महत्त्व आपल्या लक्षात यायला हवे.

त्यातच देशभरात मुख्य मानल्या जाणाऱ्या खरीप हंगामातील पेरण्यांना आता उशीर झाला आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनानंतर पेरण्यांना वेग येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतशिवारात पेरणीयोग्य ओल झाल्यावर पेरणीला सुरुवात करायला हवी. आता पाऊस सुरू झाला आहे.

पुढेही तो असाच बरसेल, अशा कल्पनांवर कमी ओलीवरची पेरणी कोणत्याही शेतकऱ्यांनी मात्र करू नये. मुळात पंधरा दिवस पाऊस लांबला आहे, त्यात जुलैमध्येही कमी पावसाचे अनुमान आहे. कमी पावसामध्ये खंडदेखील आहेत. आयओडी (इंडियन ओशन डायपोल) मॉन्सूनच्या पावसाला मदत करीत असला, तरी हे ‘एल निनो’चे वर्ष आहे.

एकंदरीत ही सर्व परिस्थिती पेरण्या साधण्यासाठी (बियाण्याची चांगली उगवण होऊन सुरुवातीच्या उत्तम वाढीसाठी) योग्य नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. पेरणी करताना रुंद वरंबा-सरी पद्धतीचा, तसेच पिकांत ओल टिकून राहण्यासाठी आच्छादनाचा वापर करायला हवा.

या वर्षी पाऊस कमी असून त्याचे आगमन लांबले आहे. त्यामुळे खरीप हंगाम पेरण्यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. आता जून संपत आल्याने कमी कालावधीची मूग, उडीद अशी पिके शेतकऱ्यांनी टाळायला हवीत. आपण डाळींमध्ये स्वयंपूर्ण नाही. त्यामुळे लांबलेल्या पावसाने मूग, उडदाचा पेरा कमी झाला, तर डाळींमध्ये अधिक तूट जाणवू शकते.

परंतु पाऊस लांबला तरी तुरीचा पेरा वाढविण्याची एक चांगली संधी शेतकऱ्यांकडे आहे. जूनअखेर पावसाला सुरुवात झाल्याने सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांना करता येणार आहे, ही बाबही शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगलीच म्हणावी लागेल. याशिवाय ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस झाला तर रब्बीत हरभऱ्याचा पेराही वाढविता येऊ शकतो.

लांबलेला आणि कमी मॉन्सून काळात तीळ, सूर्यफूल अशी काही तेलबिया पिके चांगली येतात. खरीप-रब्बीत तेलबिया पिकांचा पेरा वाढवून खाद्यतेलावरील परावलंबित्वही शेतकरी कमी करू शकतात. लांबलेल्या पावसाने खरीप भाजीपाला पिकांचा पेरा घटेल.

पेरा घटला म्हणजे उत्पादन घटेल, उत्पादन घटले म्हणजे बाजारात आवक कमी होऊन भाजीपाल्याचे दर वधारू शकतात. कमी पाऊसमान म्हणजे पाणीटंचाई अधिक, हे सूत्रच आहे. राज्यात चाऱ्याचा तुटवडा मागील वर्षभरापासून जाणवतोय. चारा (ओला, कोरडा) समस्येमुळे येथील दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे.

पाऊस लांबल्याने चाराटंचाई अधिक गंभीर बनू शकते. त्यामुळे जुलै-ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसावर पुढे वर्षभर पुरेल असे अन्न, पाणी तसेच जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन शासन पातळीवरच झाले पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT