Indian Agriculture: खरिपातील कापूस तसेच सोयाबीन या दोन मुख्य पिकांना पर्याय म्हणून शेतकरी मक्याकडे पाहत आहेत. या वर्षीच्या खरिपात मका बियाण्याला मागणी वाढत असल्याचे लक्षात घेऊन बियाणे उत्पादक कंपन्यांनी प्रति बॅग (चार किलो) ३५० ते ४०० रुपये दरवाढ केली आहे. एवढेच नाही तर अधिक मागणी असलेल्या विशिष्ट मका बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या दराने विक्री सुरू आहे. दरवाढीबरोबरच काळ्या बाजारातील चढ्या दराचा नाहक भुर्दंड शेतकऱ्यांवर बसत आहे.
निविष्ठा गुणनियंत्रण विभागाने हंगामापूर्वी आवश्यकतेनुसार सर्वच निविष्ठांचा सुरळीत पुरवठा केला जाईल, असा दावा केला होता. हा दावा फोल ठरताना आता निविष्ठांमध्ये फसवणुकीचे प्रमाण कसे कमी होईल, हे पाहणे गरजेचे होते. ते सोडून अधिक दराने बियाणे खरेदी करू नका, पक्की पावती घ्या, मका बियाणे दर किंवा दर्जाबाबत फसवणूक झाली असेल तर तक्रार करा, असे सल्ले शेतकऱ्यांनाच दिले जात आहेत.
एकतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग असते, त्यात तक्रार करणे, त्यासाठीचा पाठपुरावा करणे यासाठी बहुतांश शेतकऱ्यांकडे वेळच नसतो. इथेच तर बियाण्यासह इतरही निविष्ठा उत्पादकांचे फावते. चालू खरिपात सर्वाधिक उत्साही मका उत्पादक असताना त्यावर पाणी फेरण्याचे काम बियाणे बाजार करीत आहे. बीटी कापसाचा काळाबाजार जगजाहीर आहे. सोयाबीन बियाणे टंचाई देखील काही भागात जाणवत असून तेथे शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे. पेरणी हंगामात सर्वाधिक मागणी असलेल्या डीएपीची राज्यात सातत्याने टंचाई जाणवते. अनेकदा डीएपीचीही टंचाई कृत्रिम असते. अशावेळी निविष्ठांमध्ये होणारी शेतकऱ्यांची लूट थांबणार कधी, असा प्रश्न उपस्थित होतो.
मका हे तृणधान्य तसेच चारा पीक म्हणून देखील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. पीठापासून ते स्टार्चपर्यंत अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ मक्यापासून बनतात. पशु-पक्षी खाद्यातही मका मोठ्या प्रमाणात वापरला जातो. अलीकडे मक्यापासून इथेनॉल निर्मिती होत असल्याने या पिकाचे औद्योगिक महत्त्व खूपच वाढले आहे. सध्या मक्यापासूनच्या इथेनॉलला सर्वाधिक दर मिळतो. इथेनॉलसह मक्याच्या इतर वाढत्या औद्योगिक वापराने जागतिक बाजाराच्या दृष्टीने देखील हे पीक महत्त्वाचे ठरत आहे.
अशावेळी या पिकाच्या बियाणे बाजारापासून ते दर, मूल्यवर्धन, आयात-निर्यातीपर्यंतच्या प्रक्रियेत व्यापक सुधारणा गरजेच्या आहेत. बहुतांश देशांत जीएम मका वाण असताना नॉन जीएम मक्यात कमी खर्चात उत्पादकता वाढीचे प्रमुख आव्हान आपल्यापुढे आहे. गुणवत्तापूर्ण बियाणे हा घटक कळीचा आहे. या वर्षीच्या लागवड क्षेत्रातील वाढीने उत्पादन वाढीची शक्यताही वर्तविली जात आहे.
अशा वेळी दर टिकविण्याचे दुसरे मुख्य आव्हान आपल्यापुढे असणार आहे. मागणी असल्यामुळे मक्याला चांगला दर मिळत असला तरी तो टिकून राहील का, याबाबत छातीठोक अंदाज बांधता येत नाही. कारण मक्याचे दर वाढू लागले की औद्योगिक क्षेत्राकडून निर्यात थांबविण्याबरोबर आयातीची मागणी जोर धरू लागते. २०२२ मध्ये देशातून विक्रमी मका निर्यात झाली होती. २०२३ मध्ये सुद्धा मका निर्यातीचा आलेख चढताच होता.
मात्र २०२४ मध्ये मका निर्यातीत मोठी घट झाली. तसेच मका आणि इथेनॉलसाठी भारताची बाजारपेठ खुली करावी, यासाठी अमेरिका दबाव टाकत आहे. अशा वेळी सरकारने धोरणात्मक तटबंदी भक्कम करून मका उत्पादक शेतकऱ्यांच्या िहताचे रक्षण केले पाहिजे. अन्यथा कापूस, सोयाबीनप्रमाणे मका पिकातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.