जलपर्णी Agrowon
संपादकीय

जलपर्णी : महावरदानच

आपले सांडपाणी मुख्यतः तयार होते मानवी मलमूत्रामुळे. त्याचबरोबर साबण, डिटर्जंट यामुळेही पाण्यातील नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात वाढते. ह्या अशा सेंद्रिय घटकांवर तर जलपर्णी पोसली जाते.

टीम ॲग्रोवन

पूर्वार्ध

‘जलपर्णी महा वरदान’ हे शीर्षक धक्कादायक वाटले तरी काही निरीक्षणे, काही संशोधनाचा मागोवा व काहीसा अभ्यास केल्यानंतरच या अनपेक्षित अनुमानावर आम्ही आलो आहे. दोन वर्षांपूर्वी मंचर (जिल्हा पुणे) येथील दूषित सांडपाणी घेऊन वाहणारा नाला निसर्गाच्या मदतीने (Phyto remedial पद्धतीने) चांगल्या पाण्याचा करता येईल का, यासाठी चार साडेचार किलोमीटर नाला फिरून पाहिला. नाल्यात पाणी वाहत पुढे जाताना दुर्गंधी व करड्या रंगाचे कधी तर काळ्या रंगाचे दिसत होते. पुढे त्यावर असलेल्या बंधाऱ्यामुळे पाणी तुंबलेले होते. पहिल्या बंधाऱ्याच्या अडलेल्या पाण्यात पांढरा फेस मोठ्या प्रमाणात होता आणि आश्‍चर्य म्हणजे त्याच्या पुढच्या बंधाऱ्‍याच्या नंतरचे पाणी एकदम नितळ दिसत होते. या दोन्ही बंधाऱ्यांच्या वरच्या बाजूस (up stream side) पूर्ण नाल्यात दोन्ही थडीला लागेपर्यंत जलपर्णी पसरलेली होती. दुसऱ्या बंधाऱ्याच्या भिंतीवरून पडणाऱ्या नितळ पाण्याने मला सुखद धक्का दिला. मी बरोबर असलेल्या तज्ज्ञ सायली जोशी यांना याबद्दल विचारले तर त्यांनी हे पाणी बऱ्यापैकी प्रदूषणमुक्त असते, असा निर्वाळा दिला आणि त्याचे कारण आहे ही पसरलेली जलपर्णी!

दुसरे निरीक्षण नारायणगावच्या मीना नदीच्या पाण्यात टिकली गवत वाढलेले होते. बाजूला म्हणजे नारायणगावच्या पश्‍चिमेला जाऊ तसं ते टिकली गवत कमी होत गेले व एका टप्प्यानंतर अजिबात नाहीसे झालेले दिसले. यातून कुतूहल जागे झाले आणि माहिती घेणे सुरू झालं. दरम्यान, एक पोस्टही वाचण्यात आली, विदर्भातील एका तालुक्याच्या गावी जलपर्णीपासून धागे काढतात आणि त्याच्या लोक उपयोगी वस्तू बनवतात. मग तर या विषयाचा पिच्छाच पुरवायचा, असं मनानं पक्क ठरवलं.

‘अहो, जलपर्णी ही निसर्गाचीच योजना आहे, जिथे जिथे पाण्यात सेंद्रिय घटक जमा होतात तिथे जलपर्णी अवतीर्ण होते. शुद्ध वाहत्या पाण्यात, धरणाच्या पाण्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची जलपर्णी दिसणार नाही.’ पहिला पाठ गिरवला सायली जोशी यांच्याकडे! आपले सांडपाणी मुख्यतः तयार होते मानवी मलमूत्रामुळे. त्याचबरोबर साबण, डिटर्जंट यामुळेही पाण्यातील नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात वाढते. या अशा सेंद्रिय घटकांवर तर जलपर्णी पोसली जाते.

तसंच पुढे हेही कळालं, की जीवित नदीच्या शैलजा देशपांडे काही संशोधक व विद्यार्थी यांना बरोबर घेऊन जलपर्णीवर काम करताहेत. ‘बायोअॅक्युमुलेशन’ म्हणजे पाण्यातील प्रदूषण करणारे घटक जलपर्णी किती साठवते आणि त्याचे चांगले-वाईट परिणाम, हा विषय दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांनी हाती घेतलेला पण कोरोनाच्या काळात काम ठप्प झाले. त्यांची प्रतिक्रिया ‘‘खूपच विषारी पदार्थ ही जलपर्णी शोषून घेत असावी, कारण प्रयोगासाठी नदीतून काढताना वा प्रयोगशाळेत त्यावर काम करताना जलपर्णीची बऱ्याचदा ॲलर्जी झाली. हाताना ॲसिड लागल्यासारखे आग होणे, खाजव येणे वगैरे. ग्लोज घालून काम केले तरी त्रास होतो. आमचा अभ्यास निरीक्षणे प्रयोग सुरू आहेत, पण त्यावर निष्कर्ष देण्यासाठी अजून पाच सहा महिने लागतील.’’

दरम्यान, पुण्यातलेच डॉ. समीर शास्त्री हे सांडपाण्यावर बरेच संशोधन व प्रकल्प करतात. त्यांच्या एमई व पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा बहुदा सांडपाण्यावर संशोधन व प्रयोग करून ते घेतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांडपाण्याच्या इतर अनेक यशस्वी प्रयोगांतच, ‘जलपर्णीची सांडपाणी शुद्धीकरणातील भूमिका’ यावरही संशोधन त्यांच्या विद्यार्थिनी प्राध्यापक भारती महाजन यांनी केले आहे, ते समजले आणि मग त्या दोघांशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यांचं संशोधन त्यांनी पवना नदीच्या एका टप्प्यासाठी केले. त्यांनी वेगवेगळ्या शक्यता वापरल्यावर अनुमाने काढली. त्यांच्या अनुमानानुसार जलपर्णी सांडपाणी शुद्ध करते. पाण्यातील विरघळलेले व न विरघळलेले घनपदार्थ शोषून घेते. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी पाच ते सात युनिट इतकी वाढते. प्रा. भारती महाजन यांच्या संशोधनाने सिद्ध केले आहे की सांडपाणी जलपर्णीमुळे शुद्ध होते, स्वच्छ होते.

जलपर्णी म्हणजे पाण्यात वाढणारी वनस्पती. तिच्या चाळीस-पन्नास विविध प्रजाती आहेत. आपल्याला पुण्याच्या नद्यांत निदर्शनास पडणारी जलपर्णी ही सर्व ठिकाणी आढळते. या प्रजातीची एक हेक्टर पाण्याच्या पृष्ठभागावर २० लाख झाडे असतात. हे सर्व पाण्याच्या बाहेर काढून वजन केले, तर ते २७० ते ४०० टन भरते. हे अतिशय वेगाने वाढणारे ‘बायोमास’ आहे. हे बायोमास दर पाच दिवसाला दुप्पट होते. ९५ टक्के पाणी असलेल्या या वनस्पतीत प्रथिनांची मात्र विपुलता असते.

अशी जलपर्णी पाण्यातून काढून टाकण्याचा आग्रह असल्याची ही कारणं ही सबळ आहेत. महत्त्वाचे म्हणजे जलपर्णीचे जाळे सांडपाण्याच्या पृष्ठभागाबरोबरच खाली खोलवर पोहोचलेले असते. ते घनदाट म्हणावे असे असते. यातून प्रवाहाला खूप गतिरोध होतो व सांडपाणी खूप हळू पुढे सरकते. यामुळे पाऊस झाल्यावर किंवा इतर कारणांनी या ओढ्याला वा नदीला पाणी आले की त्या घनदाट जलपर्णीमुळे ते अडते आणि पूरपरिस्थिती निर्माण होण्याची काहीशी शक्यता असते. जलपर्णीमुळे सांडपाणी झाकले जाते. त्यामुळे हवेतला ऑक्सिजन त्यात मिसळणे अवघड होऊन बसते. तसेच सूर्यप्रकाशालाही अटकाव होतो, त्यामुळे खाली पाण्यात अनॲरोबिक विघटन सुरू होते. त्यामुळे खरंतर दुर्गंधी येते. तसेच यात ऑक्सिजन कमी असल्याने कोणताही जीव किंवा मासे तग धरणे अवघड किंवा अशक्य असते. त्यामुळे अन्नसाखळी तुटलेली असते. मासे नसल्यामुळे मासेमारी जमातीची उपासमार होते. मासे डासांची अंडी व अळ्या खातात पण माशांना ऑक्सिजन नसल्याने ते जलपर्णीच्या आसपास जाऊ शकत नाहीत. परिणामी, डासांची पैदास त्यामुळे वाढत राहते. त्याला नैसर्गिक अटकाव होत नाही. छोट्या-मोठ्या बोटींची वाहतूक ठप्प होते.

साधारणपणे चार पद्धतीने जलपर्णी काढून टाकता येते किंवा कमी करता येते. १) मनुष्यबळ वापरून, २) मशिनरी वापरून, ३) तणनाशक यासारखी रसायने वापरून, ४) कीटक जलपर्णीवर सोडून. पण यापैकी प्रत्येक पद्धतीला काहीना काही मर्यादा आहेत. मनुष्यबळ व मशिनला खोल पात्र, रुंद पात्र याच्यामध्ये मर्यादा येतात. तसेच ते खूप खर्चिक ठरते. माणसाच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण होतो. मशिनरी पात्रात आत जाऊ शकत नाहीत, खोली असलेल्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे तणनाशक फवारून क्लोरोफिलचा नाश करून जलपर्णी सुकवणे व त्यातून ती नष्ट करणे हा तसा सोपा उपाय असला, तरी अशा तणनाशक रसायनामुळे अशुद्ध सांडपाणी विषारी होते. त्याचबरोबर पुढे नदीच्या किंवा ओढ्याच्या काठावरच्या वनस्पती इतर जीवसृष्टीलाही यामुळे खूप मोठा धोका पोहोचतो. यामुळेच हा उपाय तर खूपच धोकादायक व दीर्घ पल्ल्यासाठी विनाशक आहे. कीटकांमार्फत जलपर्णी काढून टाकण्यावर तर खूपच मर्यादा आहेत.

अनेक अभ्यासकांचा आणि पर्यावरणवाद्यांचा ही जलपर्णीच्या अस्तित्वाला विरोध असतो तो विविध मुद्द्यांवर! त्यात महत्त्वाचा मुद्दा असतो सूर्यकिरण पोहोचत नसल्याने व विघटनामुळे जलपर्णी असलेल्या ठिकाणी खाली पाण्यात जैवविविधता धोक्यात असते. हा त्यांचा दावा मला मोठा विरोधाभास वाटतो कारण तसेही सांडपाण्यात बीओडी, सीओडी खूप जास्त असते, विरघळलेला ऑक्सिजन अगदीच नगण्य असतो. अशा स्थितीतही जलपर्णी नसली तरी जैवविविधता कशी काय अस्तित्वात राहू शकेल?

सतीश खाडे ९८२३०३०२१८

(लेखक पाणी प्रश्‍नाचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT