agrowon editorial article 
संपादकीय

संवाद वाढवा, समस्या सुटतील

लहान मुलांपासून, तरुण मुलामुलींशी संवाद असणे आवश्यक आहे.

सचिन होळकर

रशिया (Russia) आपल्याकडून आहे की युक्रेन (Ukraine) आपल्याकडून आहे हे बघण्यापेक्षा आपला भाऊ (Brother) किंवा बाप (Father) किंवा पत्नी किंवा मुलं आपल्यात आहे का, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. लहान मुलांपासून, तरुण मुलामुलींशी संवाद असणे आवश्यक आहे.
आपल्या धर्मशास्त्रांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ तसेच संतांनी ‘हे विश्‍वचि माझे घर’ या प्रकारची संकल्पना मांडून संपूर्ण विश्‍वाला एका घराचा आणि कुटुंबाचा दर्जा दिला आहे. महापुरुषांच्या या विचारात संपूर्ण मानव जातीला एक मौलिक असा संदेश त्यांनी दिला आहे. मात्र, हा विचार ज्या मातीतून जन्मला त्या देशात, संपूर्ण जगाला आदर्श वाटणारी कुटुंब व्यवस्था आज ढासळत आहे.

त्याकडे मात्र कोणाचे लक्ष जात नाही. पुरातन काळापासून आपल्याकडे कुटुंब व्यवस्था (Family arrangement) अस्तित्वात होती. तसेच ती ढासळल्यावर किती विनाश ओढ़वतो हे देखील अनेक पुराणकथेतून आपल्याला शिकायला मिळते. कुटुंबव्यवस्थेची (Family arrangement) व्याप्ती वाढवताना अगोदर आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल. आज अनेक घरांना घरघर लागली आहे. त्यांचे रूपांतर फक्त चार भिंतीत झाले आहे. त्यातून उत्पन्न झालेल्या समस्यांचे मूळ सदोष कुटुंब पद्धतीत आहे आणि तिला सावरल्याशिवाय समस्या मुळापासून जाणार नाही. कारण समस्यांच्या मुळाशी अभ्यास केल्यावर कुटुंब व्यवस्थेतील (Family arrangement) संवादाचा अभाव असल्याचे लक्षात येते. त्यामुळे समस्यांवर उपाय करण्यापेक्षा मुळावर घाव घालणे आवश्यक आहे. संपूर्ण विश्‍वाला आपलेसे करण्यासाठी अगोदर कुटुंब व्यवस्था सावरण्याची गरज आहे. आज समाजात ज्या काही समस्या दिसत आहेत, अशा गंभीर समस्यांना ढासळती कुटुंब व्यवस्था कारणीभूत ठरत आहे.

विवाह, (Marriage) रक्त संबंध, दत्तकविधान, एकत्र निवासात राहणाऱ्या दोन किंवा अधिक व्यक्तींचा गट म्हणजे कुटुंब. अशी ढोबळ व्याख्या आपल्याला करता येईल. या कुटुंबात सदस्य कितीही असो सर्वांवर एकमेकांची जबाबदारी असते, त्यात व्यवहार नसून प्रेम असण्याची गरज असते. आपल्या कुटुंबव्यवस्थेची विभागणी विवाहांवर अवलंबून असते. त्यात आता पूर्वीसारखे बहुपत्नीत्व, बहुपतीत्व पद्धती नसली तरी कुटुंब ही संकल्पना नवरा-बायको त्यांची मुले इथपर्यंतचा विचारात घेतली जातात. शहरी (City) भागात तर पती-पत्नी आणि त्यांची अपत्य म्हणजे कुटुंब किंवा संपूर्ण घर असते. ग्रामीण (Rural) भागात घर म्हटले की अगदी आजी-आजोबा, पणजोबा, काका-काकू, चुलत भाऊ-बहीण (Brother - Sister) एकत्र राहताना दिसतात. महाराष्ट्रात अगदी क्वचित घरात कुटुंब सदस्यांची संख्या जास्त असून घर एकच असते, असे पाहायला मिळते. अनेकदा आपण त्यांच्या परिवाराची कथा माध्यमातून वाचतो मात्र फक्त वाचून आनंद घेतो त्यातून प्रेरणा घेत नाही ही शोकांतिका आहे.

एकता ही एक मोठी शक्ती आहे, हे आपण बालपणापासून धड्यांमध्ये शिकत आलो. मात्र वय वाढल्यावर शेतकऱ्यांची खरी गरज असते तिथे आपल्याला त्याचा विसर पडतो. एकीचे बळ ही जगण्यासाठी खूप आवश्यक बाब असते. त्यातून कुटुंबाचे आर्थिक,(Economy) सामाजिक प्रगती होत असते. त्यातून विकास होत असतो. कुटुंबाच्या रथातील एक घोडा जरी दमलेला असला तरी इतरांच्या शक्तीने रथ पुढे जात असतो, त्यात कोणी किती ताकद खर्च केली हा हिशेब नसतो. कुटुंबव्यवस्थेत सदस्यांचा स्वभाव, सवयी, काम करण्याची क्षमता, गुण-अवगुण यांचे विश्‍लेषण न करता

त्यांना सावरण्याची भूमिका असली पाहिजे. पूर्वीच्या काळी या एकत्रित कुटुंब पद्धतीच्या जोरावर अनेक परिवारांची प्रचंड आर्थिक उन्नती झाल्याचे पाहायला मिळाले. कालांतराने मात्र विभक्त झाल्यावर त्या परिवाराची परवड झाल्याचे चित्रदेखील बघण्यात आले. कुटुंबामध्ये कोणी किती कमावतो, किती काम करतो, त्यापेक्षा आपण एकत्र किती कमावतो, किती काम करतो, हा हिशेब धरणे आवश्यक असते. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे लहान मुलांवर संस्कार करण्याची गरज पडत नव्हती ते आपोआप घडत होते. ग्रामीण भागात आजही खटल्यातील मुलगी असल्यास विवाहासाठी तिला प्राधान्य दिले जाते. कारण इतर सर्व सदस्यांसोबत मिळतेजुळते घेण्याची तिला सवय असते. एकत्र कुटुंब पद्धतीत फारकतीचे, बाल गुन्ह्याचे, आत्महत्येचे, पळून जाऊन विवाह करण्याचे, व्यसनाधीनतेचे प्रमाण तुलनेने कमी आहे. आज कुटुंब सदस्य कमी झाले, जे आहेत ते त्यांच्या कामात किंवा मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये व्यस्त असल्याने परिवारातील संवाद नष्ट झाला. त्यातून ज्या समस्या उद्‌भवल्या त्यांना आपल्याला आज सामोरे जावे लागत आहे.

घरातील मुलगी किंवा मुलगा पळून जाऊन विवाह (Marriage) करतो, घरातील सदस्य आर्थिक अडचणीतून आत्महत्या करतो, मानसिक विवंचनेतून व्यसनाधीन होतो, कमी वयाची तरुण पिढी गुन्हेगारी मार्गाला लागते, विवाहबाह्य संबंध, फारकती, मनोविकार या समस्या कुटुंबातील सदस्यांबरोबर संवादाचा अभाव असल्यामुळे वाढीस लागल्या आहेत. एकाच घरात राहून देखील घरातील सदस्यांचे प्रत्येकाचे एक घर असते. दुसरा सदस्य आणि त्यांच्यात एक मोठी भिंत असते. त्यातून विसंवाद, गैरसमज वाढत जातो, याचा फायदा आजूबाजूचे घेतात हे सत्य आहे. मात्र विसंवादाला संवादात आणि गैरसमजाला समजूतदारपणामध्ये बदलण्याची खरी गरज आहे.

मोबाइलवर किंवा टीव्हीला वेळ देण्यापेक्षा त्यांना वेळ देणे आवश्यक आहे. त्यांच्या समस्या किंवा बदल जर लक्षात आले तर भविष्यात होणारी मोठी आपत्ती आपल्याला टाळता येईल. कुटुंब छोटी असल्यास काही समस्या उद्‌भवल्यास चांगल्या जाणकार व्यक्ती सोबत चर्चा करणे आवश्यक आहे. अनेक समस्या संवादाने सुटतात, वादाने त्या मोठ्या होतात. घर किंवा कुटुंब म्हटलं की थोडे फार वाद-विवाद होणारच पण त्यांना किती महत्त्व द्यायचे किंवा तो विषय किती लांबवायचा याला मर्यादा असणे आवश्यक आहे. तरुणाईच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुलांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा आपण न दिलेले प्रेम ते इतरांकडून मिळवण्याचा प्रयत्न करतात. तरुणांमध्ये लैंगिक शिक्षण (Sex education) देण्याचे सर्वांत प्रभावी साधन म्हणजे संवाद आहे. संवादापेक्षा मोठे माध्यम नाही. घरातील काही सदस्यांचे वाद झाल्यास पक्षपातीपणा न करता त्यांच्यात परत संवाद घडवावा.

कुटुंब सदस्याच्या अडीअडचणीत त्यांच्या आजारपणात त्यांना सहकार्य करावे. घरातील सख्ख्या भावंडांमध्ये चांगला संवाद असल्यास इतरांच्या कुरबुरीचा कुटुंबावर परिणाम होत नाही असा अनुभव आहे. एकत्र कुटुंब आणि आनंदी कुटुंब म्हणजे चालतं बोलतं समुपदेशन केंद्र तसेच ते एक नैसर्गिक मानसोपचार केंद्रच असते. चांगल्या कुटुंबांमध्ये चांगले व्यक्तिमत्त्व घडते, आत्मविश्‍वास वाढतो मात्र चांगले कुटुंब घडवण्यासाठी परस्परांबद्दल प्रेम आणि विश्‍वास आवश्यक आहे. टीव्हीवरील फॅमिली ड्रामा पाहण्यापेक्षा चांगल्या ग्रंथांचे पुस्तकांचे वाचन (Book Reading) करणे आवश्यक आहे, कारण घर जरी चार भिंती असल्या तरी जगण्यासाठी विणलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं आणि दुःख पचवायची ताकद इथल्या नात्यांच्या खांबांना असते. येत्या काळात कुटुंब व्यवस्थेतील संवाद वाढल्यास अनेक समस्या आपोआप सुटतील.
(लेखक शेती, तसेच सामाजिक प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

९८२३५९७९६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT