पोल्ट्री व्यवसायातून कुटुंब झाले आर्थिक स्वयंपूर्ण
फळबागायती आणि भातशेती सामायीक. त्यामुळे मालगुंड (जि. रत्नागिरी) येथील दीपक दुर्गवळी यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कुकुटपालन व्यवसाय सुरू केला. सुरूवातीला लेअर पक्षी व पुढे ब्रॉयलर पक्षांचे संगोपन सुरू केले. चिकाटी व सातत्य ठेवत स्वतःचे चिकन सेंटरही सुरू केले. आज सर्व सदस्यांच्या एकत्रित कामांमधून हे कुटुंब या व्यवसायातून आर्थिक स्वयंपूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात व एकूणच कोकणात आंबा, काजू, सुपारी व नारळ या फळपिकांबरोबर प्रक्रिया उद्योगातही बागायतदार कार्यरत आहेत. मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) हे असेच रत्नागिरी जिल्ह्यातील गाव आहे. येथील दीपक प्रकाश दुर्गवळी यांची पंधरा गुंठे भातशेती, दहा गुंठ्यात नाचणी आणि सोबत पन्नास आंब्याची कलमं अशी सामायिक शेती आहे. ते विद्यमान सरपंचही आहेत. पूर्वी गावातच छोटे व्यवसाय करीत मालवाहतुकीसाठी त्यांनी रिक्षा घेतली. केवळ शेतीवर उदरनिर्वाह करणे आर्थिक दृष्ट्या शक्य नव्हते. त्यामुळे पूरक व्यवसायात लक्ष घातले. कृषी विभागाच्या सल्ल्याने पंचायत समितीच्या शंभर टक्के अनुदानातून २०१५ मध्ये लेअर पक्षांच्या माध्यमातून कोंबडीपालनास सुरवात केली. कावेरी जातीच्या एक दिवसीय ४० पिल्लांचे संगोपन सुरू झाले. त्यासाठी घराजवळच ५० बाय २० फूट आकाराचे शेड उभारले. अंडीविक्रीतून उत्पन्न सुरू झाले. व्यावसायवृध्दी व्यवसाय स्थिर होत असतानाचा दीपक यांच्या एक गोष्ट लक्षात आली. पंचक्रोशीत ब्रॉयलर कोंबड्यांना मागणी असून चिकन सेंटर चालक त्या बाहेरुन विकत घेतात हे लक्षात आले. बाजारपेठेचे अधिक सर्वेक्षण करुन या कोंबडीपालनातही उतरायचे त्यांनी ठरवले. गावातील बंड्या साळवी, सोनल पवार यांच्या सहकार्याने अण्णाभाऊ साठे योजनेतून दहा लाखांचे कर्ज बँकेकडून मिळाले. रत्नागिरी तालुक्यातील नरबे येथून प्रति नग ४० रूपये दराने एक दिवसांची पिल्ले आणली. आज अंडी व चिकन अशा दोन्ही हेतूंनी पोल्ट्री व्यवसायाची वृध्दी करून उत्पन्नात वाढ करणे शक्य झाले आहे. व्यवस्थापनातील बाबी
विक्री व्यवस्था गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर, मालगुंड या गावांची मालगुंड येथे बाजारपेठ आहे. साहजिकच ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात असतो. दर्जेदार चिकन या ठिकाणी मिळते. दीपक व्यावसायिक चिकन सेंटरना कोंबड्या पुरवतात. येथे अशी पाच विक्री केंद्रे आहेत. आता तर आपलेही छोटेखानी सेंटर दीपक यांनी सुरु केले आहे. त्यामुळे प्रति पक्षामागे ३० ते ४० रूपये नफा वाढल्याचे ते सांगतात. कोकणात गटारी अमावास्या, गौरी सण, शिमगोत्सव आणि ३१ डिसेंबर या कालावधीत चिकनला मोठी मागणी असते. हा विचार करुन उत्पादन व विक्रीचे नियोजन केले जाते. महिन्याला चारशे ते पाचशे कोंबड्यांची चिकन सेंटरमध्ये गरज असते. एक कामगारही नियुक्त केला आहे. उत्पन्नात अजून वाढ व्हावी यासाठी दीपक यांचे बंधू यांनी चायनीज फूड विक्री सेंटरही सुरू केले आहे. तेथेही पोल्ट्रीतील उत्पादनांना चांगला उठाव होतो. मालगुंडजवळच काजूची १०० व हापूस आंब्याच्या ७० कलमांची लागवडही केली आहे. प्रतिक्रिया शेतीपूरक व्यावसायामधून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करण्याची पूर्वीपासून इच्छा होती. पोल्ट्री व्यावसायाने दिशा दिली आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळाली. आमचे आठ सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. मालगुंडसारख्या गावात व्यवसाय आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करून कुटुंबाचे जीवनमान उंचावले आहे. संपर्क- दीपक दुर्गवळी- ९४२००५२०१५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

