शेती म्हटली की,त्रास,अडचणी,कटकटी, कर्जबाजारीपणा, रडारड हे सगळीकडं दिसणारं चित्र आहे.कोणत्याही शेतकऱ्याला विचारा,कसं चाललयं? तो लगेच त्याचं रडगाणं गायला सुरू करेल.त्याच्या समोरच्या अडचणींचा पाढा वाचेल.बाजारात कशी अडवणूक होतेय,सरकार शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी कसे निर्णय घेतेय,ते सांगेल.अवर्षण किंवा अतिवृष्टी हे नेहमीचं संकट.त्यात गेल्या काही वर्षांत हवामान बदलाचा शेतीला मोठा फटका बसतोच.अवेळी पडणारा पाऊस,तीव्र थंडी,तीव्र ऊन ,महिनो न् महिने झाकोळलेलं आकाश, सलग दोन-तीन आठवडे वाहणारे कुंभारी वारे,अचानक उद्भवणारी रोगराई, रानडुकरं, हरीण,वानरं, सायाळ,मरलांगी, गोगलगायी, मोर,चिमण्या....हे सगळे शेतीचे शत्रू.तशी ही यादी मोठी आहे. त्यात शेतीसाठी मनुष्यबळ नाही, ही गंभीर समस्या आहे.त्यामुळं शेतीबद्दल कोणीच चांगलं बोलत नाही. फळ बागायतदार असो,भाजीपाला (vegetable) पिकवणारा असो,ऊसवाला असो की कोरडवाहू शेतकरी ,कोणीच समाधानी नाही. सेंद्रीय शेती (organic farming) करा,रासायनिक (chemical) करा की,नैसर्गिक,नुकसान आहेच. प्रत्येकाच्या आपल्या समस्या आहेत,प्रश्न आहेत....आणि हे सगळं खरं आहे.यात काही अतिशयोक्ती नाही.शेतीवर कोणीही गर्भश्रीमंत झालेला नाही. अशा स्थितीत मी आनंददायी शेतीबद्दल बोलतोय,ते धाडसच म्हणावे लागेल.
हेही वाचा- सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना
सरकारने धोरणे बदलावीत,शेतीला सवलती द्याव्यात, उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, स्वामीनाथन आयोग लागू करावा,शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत असे विविध विषय घेऊन शेतकरी समर्थक गट सोशलमिडीयावर (social media) लढत आहेत. यातून अद्याप भरीव असं काहीच हाती लागलेलं नाही.याचं कारण सरकारवर याचा दबाव येत नाही. रस्त्यावरील प्रभावी,दीर्घकालीन आंदोलनापुढे सरकार झुकते.संसदेत पास केलेले कायदे संसदेत रद्द करते याचाही अनुभव देशाने नुकताच घेतला. सोशल मिडीयावर एक असा मोठा वर्ग आहे,जो शेतकऱ्यांच्या नावानं कायम रडत असतो.जो रस्त्यावरील लढाईत अपवादानेच दिसतो.अनेकदा आपल्यासाठी कोणीतरी रडतयं,हेही शेतकऱ्यांना माहित नसतं.
शेतकऱ्यांची एवढी दूरवस्था असतानाही,प्रत्येक राजकारणी,सामाजिक कार्यकर्ता आपण कसे शेतकऱ्यांचे हितकर्ते आहोत,हे दाखविण्यासाठी धडपडत असतो.याचं कारण शेतकरी हे या देशात चलनी नाणं आहे.कोणालाही त्याच्या नावानं रडून,आपण संवेदनशील आहोत हे दाखवता येते.शेती प्रश्नांची चिकीत्सा करतानाही,शेतकऱ्यांच्या चुका दाखविण्याचा प्रयत्न केला तर तो शेतकरी विरोधी ठरतो.इतका हा प्रश्न संवेदनशील आहे.
२००६ साली मी शेतकऱ्यांनो शेती सोडा,या मथळ्याखाली एक लेख लिहिला होता.फक्त शेतीवर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यावर एक दिवस फाशी घेण्याची वेळ येते.शेतीवर जेमतेम पोट भरू शकतं.सुखी आयुष्याची स्वप्नपूर्ती होऊ शकत नाही. त्यामुळं ज्यांना शक्य आहे त्यांनी शेतीतून बाहेर पडावं.ज्यांना शेती पूर्णपणे सोडणं,विकणं शक्य नाही, त्यांनी मुख्य व्यवसाय दुसरा कुठलाही करावा.शेतीला दुय्यम स्थान द्यावं,अशी ती भूमिका होती.त्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे.
माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. वडील ५२ एकरवाले शेतकरी. रब्बीला होणारा गहू,हरभरा आणि भाजीपाला सोडला तर,सगळी कोरडवाहू शेती. एवढी शेती असतानाही सात-आठ जणांचं कुटुंब चालवतानाचे झालेले हाल मी अनुभवलेले.दुध,दही ,भाज्या व शेतात पिकणाऱ्या गहू, ज्वारीमुळे मुबलक खायला होतं.पण शाळेसाठी वर्षांला दोन ड्रेस आणि एक चप्पल,घेताना किती अवघड जायचं ते मी बघायचो. अपवादाने का होईना ठिगळाचे कपडे घालावे लागले.दोन-तीन वर्षे हायब्रीड ज्वारीची चव चाखावी लागली.तुटलेली चप्पल शिवून वापरणं,ही सामान्य बाब होती. एवढ्या मोठ्या शेतीतूनही भागत नसल्याने, वडील संतुकराव मंगनाळे यांनी हॉटेल,किराणा, कापड,मिरची असे विविध व्यवसाय केले. ते चवथी पास होते.माझ्या वडिलांचं शेतीवर अफाट प्रेम होतं.एवढा त्रास होऊनही त्यांनी शेती विकण्याचा विचार कधी मनात आणला नाही. त्यांच्यासाठी शेती ही दुसरी आईच होती. तरीही शेतीवर सुखा- समाधानाचं आयुष्य जगणं शक्य नाही, याची त्यांना कल्पना होती. आपली मुलं शेतीत येऊ नयेत,यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.एवढ्या आर्थिक अडचणीतही आमचं शिक्षण पूर्ण केलं.आम्ही शेतीत आलो नाही, याचा त्यांना मनापासून आनंद होता.तरीही मी नियमितपणे शेतात येत-जात होतो.जमेल तेवढी शेतीसाठी आर्थिक मदत करीत होतो.त्यामुळं शेतीशी बालपणी जुळलेली नाळ कायम टिकून राहिली.
२००८ मध्ये कौटुंबिक अपरिहार्यतेतून माझ्यावर शेतीची जबाबदारी आली.तेव्हा मी ती आनंदानं स्विकारली.तेव्हाच मी मनोमन ठरवलं होतं की,आनंददायी शेती करायची.निसर्गासोबत एन्जॉय करायचं. शेतीत राहायचं म्हणून २०१० साली तीनशे चौरसफुटाचा एक हॉल बांधायला घेतला. पैशाची अडचण होतीच.ते बांधकाम पूर्ण व्हायला २०११ साल उजाडले.या काळात मी पत्रकारीतेतील लक्ष कमी केलं होतं.आठ पानी,चार रंगातील बातमी मागची बातमी हे साप्ताहिक ,दोन रंगात चार पानी निघत होतं.मात्र मुक्तरंग प्रकाशनचं काम जोरात होतं.नवोदित लेखक-कवींची रीघ होती.वर्षाला शंभर पुस्तकं प्रकाशित करीत होतो.त्यामुळं त्यात भरपूर गुंतलेला होतो.तरीही वेळात वेळ काढून शिरुरला येत होतो.चार चाकी वाहन आणि चालक असल्याने रात्री-बेरात्री कधीही शेतात येऊन मुक्काम करायचो.त्यातून आनंददायी शेतीच्या माझ्या कल्पना स्पष्ट होत गेल्या. इथंच पिकणाऱ्या अन्नावर,फळावर जगता आलं पाहिजे,हे डोक्यात होतं.
२०१३ मध्ये शेताच्या वरच्या कोपऱ्यात बांधलेल्या या हॉलला मी रुद्रा हट हे नाव दिलं. त्याच्या समोर अतिशय निकृष्ट अशी जमीन होती.इथं कारळ,हुलगा अशी पिकं घेतली जातं.हे कुसळीच्या जमिनीचं आगार होतं.मी इथं फळझाडं लावण्याचा निर्णय केला तेव्हा सगळ्यांनी वेड्यात काढलं.त्यामुळं मी इथंच फळबाग करण्याचा निर्णय केला. केशर आंबा,चिकू,नारळ, अंजीर, पेरू,संत्री,मोसंबी, डाळिंब, आवळा,लिंबू ,जांभूळ ,केळी,सीताफळ,बोर ही फळझाडं लावली.सोबत बागेतच एक पिंपळ लावला.विविध फुलांची झाडं लावली. बारमाही या बागेत एकतरी फळ खाण्यासाठी उपलब्ध असावं,ही त्यामागची भूमिका होती. मात्र ही बाग टिकवणं, जोपासनं हे आव्हान होतं.२५फुट खोल असलेली विहीर ७२ फुटावर नेली.दगडाचा खिळगा काढून सिमेंट काँक्रीटचं कडं टाकलं तरी,उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. अनिच्छेनेच चार विंधन विहिरी घेतल्या. पण उन्हाळ्यातील पाण्याची समस्या कायम राहिली.सलग दोन दुष्काळात टँकरने पाणी आणून झाडं जगवली.तरी आठ नारळाची,काही आंब्याची झाडं गेलीच.तिथं दुसरी झाडं लावली. बघता बघता झाडं मोठी झाली.पाचव्या वर्षीचं आंबे,अंजीर ,पेरू खायला मिळाले. आता जांभूळ वगळता सगळ्याच झाडांना फळं लागताहेत.त्याचा आनंद पक्ष्यांसह आम्हीही घेतो. आमच्या बागेत बारा महिने कोणतं ना कोणतं फळ खायला असतं.माझ्या आनंददायी शेतीत बाग ही ह्रदयस्थानी आहे.या बागेला कुठलंच रासायनिक खत घालत नाही. फवारणी करीत नाही. नैसर्गिकरित्या जे मिळतं त्यावर आम्ही खूष आहोत.यातून पैसे मिळवणं हा हेतूच नाही. नातेवाईक ,मित्र,शेजारी यांनाही ही फळं देतोच.
माझ्या बालपणी आमच्याकडं भरपूर जनावरं होती.२००८ मध्ये दोन बैल आणि दोन म्हशी होत्या.मला जनावरांची आवड आहेच. शेतीसाठी शेणखत अमृत आहे.एकतर चांगलं शेणखत मिळत नाही. ते परवडतही नाही. खत मिळावं आणि एका सालगड्याच्या पगारीचा मोठा हिस्सा यातून निघावं असा विचार यामागे होता.यात मी बऱ्यापैकी यशस्वी झालो.२०२१साली माझ्याकडं २४म्हशी, वासरं,रेडा आणि ४गायी अशी ३२जनावरं होती.यावर्षी बाजार पडल्याने पहिल्यांदाच फटका बसला.पण त्याबद्दल माझी तक्रार नाही. व्यवसायात नफ्याबरोबर तोटाही गृहीत आहे.पण ही जनावरं आमच्या शेतीची शोभा आहेत.दुध, दही,ताक,तूप मनसोक्त खातोय.म्हशी,गायी वेतात. छोट्या बछड्यांशी खेळण्याचा आनंद मी घेतो.जनावरांसाठी छान शेड आहेत.त्यांना खायला मिळेल अशी तरतूद करून ठेवतो.जनावरांच्या सगळ्या कामात मी सहभागी असतो. संख्या कमी-जास्त होत राहील पण आमच्याकडं गाई-म्हशी राहतीलच.ती आमच्या सहजीवनाचा भाग आहेत.
शेतीत दरवर्षी अनुभवाने शिकत गेलो.पायाभूत सुविधांसाठी भरपूर पैसे खर्च केले.पण पिक घेण्याबाबत कायम व्यवहारी भूमिका घेतली.कोणाचे सल्ले ऐकून वा यशकथा बघूनही, मी महागडे प्रयोग करण्याच्या भानगडीत पडलो नाही. गेल्या दहा वर्षांपासून खरीपाला सोयाबीन आणि रब्बीला ज्वारी हिच प्रमुख पिकं घेतोय.त्यात मोठा फायदा नाही की,रडण्यासारखं नुकसान नाही. एकदाच ऊस लावला.सलग दोन वर्षे पाऊस कमी.दिड-दोन लाखाला बुडालो तेव्हाच ठरवलं ,असा कुठलाच प्रयोग करायचं नाही.
प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा, शेतकऱ्यांचे शारीरिक कष्ट कसे असतात,ते जाणून घेण्यासाठी म्हणून गेली चार वर्षे अफाट मेहनत घेतली.प्रत्येक काम केलं.त्याचा मनसोक्त आनंद घेतला.खरं तर केवळ बागेतच एवढं काम असतं की, दिवसही पुरत नाही.
मला अनेकांनी प्रश्न केला,एका बाजुला तुम्ही शेतकऱ्यांना शेती सोडा असं म्हणता....आणि तुम्ही शेतीचं सुंदर,लोभसवाणं चित्र उभा करता. त्यावर माझं उत्तरही ठरलेलं असतं.मी निसर्गप्रेमी आहे.निसर्गात राहायचं म्हणून मी शेती करतो. शेती करणे हा मुळ उद्देश नाही. मी पत्रकार असल्याने, त्या दृष्टीने शेतीकडं बघतो,प्रश्नांची चिकीत्सा करतो.तरीही माझ्यातील शेतकऱ्यापेक्षा,निसर्गप्रेमी माणूस अधिक प्रभावी आहे.त्यामुळंच अतिवृष्टीत नुकसानीसोबत सौंदर्यही दिसतं.याचं कारण, तुम्ही मानता तसा मी शेतकरी नाही. शेतीत होणारा तोटा सहन करण्याची आर्थिक क्षमता मी इतर कामातून निर्माण केलीय.त्यामुळं शेतीत होणाऱ्या तोट्याकडं मी सहजतेने बघू शकतो.ही क्षमता नसणारा शेतकरी ही आनंददायी शेती करू शकणार नाही.
अनेकजण निवृत्तीनंतर, कोणी नाईलाज म्हणून,कोणी यशकथांना भूलून पैसे कमावण्याची स्वप्न घेऊन शेतीत येतात.वैफल्यग्रस्त होतात.माझी पत्रकारिता भरभराटीला असताना मी सोडली, आजही मी मुंबईत येऊन काम करावं,असा आग्रह करणारे मित्र आहेत. मी लक्ष घातलं तर पुरे पुरे म्हणावं,इतकं प्रकाशनाचं काम आहे.मीच ते मर्यादित केलयं.कारण प्रत्येक बाबीतून योग्य वेळी बाहेर पडलं पाहिजे,हे माझं धोरण आहे.त्याप्रमाणं मी ठरवून शेतीत आलो आणि ही आनंददायी शेती सुरू केली.
परवाचं मुंबईचा पत्रकार मित्र बोलला,काय यार...तुझ्यासारख्या पत्रकारानं शेतात गुरं सांभाळत, शारीरिक कष्टाची कामं करीत बसावं,हे माझ्या बुध्दीला पटत नाही... तुला पैसे,नाव कमावण्याची किती मोठी संधी आहे...बघ आणखी विचार कर....या दहा वर्षांत काय मिळवलंस तू? मी म्हटलं ,मी गरजेपुरते पैसे मिळवलेत.कामामुळे जे काही नाव मिळायचं ते मिळवलयं.त्यावर मी खूष आहे..पण मी काय काय मिळवलंय ते तुला माहित नसलेली यादी खूप मोठी आहे... अँसिडीटी आणि मध्यरात्रीशिवाय झोप न येणं, या दोन बाबी माझ्यासाठी सगळ्यात त्रासदायक होत्या. मी रुद्राहटवाशी झालो नि या दोन्ही त्रासातून मुक्त झालो.प्रकृती ठणठणीत झाली.याआधी औषधांवर किती पैसे खर्च केले,त्याचा हिशोब नाही. याशिवाय पहिल्यांदाच मी खऱ्या अर्थाने जगतोय याची जाणीव मला इथं आल्यावरच झाली.सुर्योदय आणि सुर्यास्ताचा अनुभव मी दररोज घेतो.पहाटे पाखरांच्या संगीतानं जाग येते आणि रात्री रातकिडे जंगलात झोपल्याचा आनंद देतात.माझ्या डोळ्यासमोर आकाशात ढग येतात...ते जमिनीवर उतरतात...धो..धो पाऊस पडतो.त्या पावसात मी मनसोक्त भिजतो.कडाडणाऱ्या विजा कोसळताना मी पाहतो.पावसाच्या मातीमिश्रीत रंगीत पाण्यात फिरतो,भिजतो.अंगाची लाही लाही करणाऱ्या ऊन्हातही मी मजेत काम करतो.गारठ्यात शेकोटी करून बसतो.चांदण्या रात्री हातात कारवा रेडिओ घेऊन गाणी ऐकत फिरतो.काळ्या मातीत धान्य पेरतो.ते उगवताना, कलाकलाने वाढताना पाहतो...त्या एका दाण्याचे हजार दाणे होताना बघतो. इच्छा होईल तेव्हा झाडावरचा ताजा पेरू खातो.पिकलेली केळी खातो.सीताफळाच्या दिवसात तर आमची दिवाळी असते.जेवणाची गरजच भासत नाही. मी झोपतो तिथं रात्री निशीगंधाचा तर पहाटे प्राजक्ताचा,चाफ्याचा सुगंध येतो...इथं २४तास शुध्द हवा असते.पिंपळाच्या,केळीच्या पानांची सळसळ पाऊस आल्याचा आभास देते. सतत मोकळ्या अवकाशात वावरतो.इथं कसलंच प्रदूषण नाही.. मित्रा...माझ्यासाठी हा स्वर्गच तर आहे.हे एक स्वतंत्र जग आहे. मी तुला कितीही पैसे दिले तरी तू हे जग मला देऊ शकशील?....
मित्रासाठी हा विचार वेडेपणाचा असावा.त्याचा फोन बंद झाला होता.माणसं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत फक्त आणि फक्त पैशाचा विचार करतात.या आनंददायी शेतीनं माझी पैसे कमवावेत ही प्रेरणा अधिकच कमकुवत केलीय.पण ही शेती माझं जगणं अधिकाधिक समृद्ध बनवतेय.याचं मोल पैशात करता येत नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.