Diwali 2024 Agrowon
संपादकीय

Diwali Festival 2024 : तिमिराकडून तेजाकडे...

Diwali Article 2024 : मनातले दुःखाचे काळोखमय क्षण जाऊन आनंदमय सौख्याची पहाट फुलावी, हेच दिवाळी सणांचे मर्म आहे.

विजय सुकळकर

Farmers' Diwali : दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव. दिवाळी म्हणजे प्रगती, भरभराट आणि समृद्धी. मनातले दुःखाचे काळोखमय क्षण जाऊन आनंदमय सौख्याची पहाट फुलावी, हेच दिवाळी सणांचे मर्म आहे. वसुबारस ते भाऊबीज असा पाच दिवसांचा भरगच्च उत्सव, मनमुराद आनंद आणि वैभव, सुख-समृद्धीची उधळण करण्यात आपण सारे उत्सुक असतो.

दिवाळी सण साजरी करण्याची संस्कृती पूर्वापार आहे. शहरांमध्ये बदलत्या संस्कृतीत काही परंपरा लोप पावत असल्या तरी ग्रामीण भागात परंपरेनुसार दिवाळीचा टवटवीतपणा अजूनही टिकून आहे. खरीप हंगामाची सांगता आणि रब्बीची सुरुवात अशा संक्रमण काळात हा सण येतो.

शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक धावपळीचा हा काळ असला तरीही वसुबारसेचे गाय-वासराचे पूजन, धनत्रयोदशीच्या दिवशी धन-धान्यांचे पूजन, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदेस दिन दिन दिवाळी म्हणून गोधनपूजा, धनधान्य राशींची पूजा, मायमाती लक्ष्मीचे पूजन अशा परंपरा शेतकरी आजही पाळतो. मायमाती आणि पशुधन हेच तर शेतकऱ्यांची खरी लक्ष्मी आहे.

देशातील शेतकरी प्रयोगशील प्रयत्नशील आहे. आपल्या कर्तृत्वाच्या बळावरच तर त्याने देशाला अन्नसुरक्षा प्रदान केली आहे. एवढेच नाही तर त्यांच्या दर्जेदार शेतीमाल उत्पादनांचा, प्रक्रियायुक्त पदार्थांचा डंका जगभर पसरला आहे. शेतकऱ्यांच्या यशोगाथांच्या दीपाने सर्वत्र वातावरण प्रकाशमय होत आहे. तेजोमय प्रकाशाने दाही दिशा उजळून निघत असताना काही ठिकाणी अंधाराच्या कडाही पाहावयास मिळतात.

या अंधारास नैसर्गिक आपत्तीबरोबर मानवनिर्मित संकटांचीही किनार आहे. अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस, गारपिटीने हातात तोंडाशी आलेला घास हिरावला जातोय. पाणी अन् रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापराने जमिनीचा पोत खराब होतोय. मजूर टंचाईने शेतकरी त्रस्त आहेत. निविष्ठा आणि मजुरीच्या वाढत्या दराने पीक उत्पादन खर्च वाढला आहे.

नवनव्या रोग-किडींचे आक्रमण पिकांवर होत आहे. संकटाच्या मालिका भेदून हाती आलेल्या जेमतेम उत्पादनास बाजारात योग्य भाव मिळत नाही. चाराटंचाई, पशुखाद्याच्या वाढत्या दराने पशुधनही अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ऐन दिवाळीत दिवाळे निघत आहे.

अडचणी कितीही असल्या तरी शेतकरी कुटुंबे दिवाळीचा सण आनंद उत्साहात साजरा करीत असताना त्यांना इतर समाजघटकांचे देखील सहकार्य लाभायला हवे. खरिपातून जेमतेम उत्पादन हाती आलेले असताना रब्बी हंगामाला नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. या वर्षी चांगल्या पावसाची साथ आहेच. त्यास गुणवत्तापूर्ण निविष्ठा आणि आर्थिक पाठबळ द्यावे लागेल. कापूस, सोयाबीनला सध्या चांगला भाव मिळत नसल्याने तो काही काळ साठवून ठेवण्याच्या विचारात बहुतांश शेतकरी आहेत.

अशावेळी रब्बीच्या आर्थिक नियोजनासाठी पीककर्ज वाटपाची व्याप्ती वाढवावी लागेल. राज्यातील निवडणूक आचारसंहितेचा परिणाम खरीप शेतीमाल विक्री आणि रब्बी पीक पेरणी नियोजन यावर होणार नाही, ही काळजी घ्यावी लागेल. शेतकऱ्यांच्या जीवनात दिवाळीचा अक्षय आनंद आणि प्रकाश टिकवायचा असेल तर बदलत्या हवामानास पूरक तंत्र त्यांना द्यावे लागेल.

शेतशिवारात पायाभूत तसेच अत्याधुनिक सुविधांची पेरणी करावी लागेल. मातीचा पोत सुधारून जमिनीची सुपीकता वाढवावी लागेल. पाण्याचा कार्यक्रम वापर होईल याकडे लक्ष द्यावे लागेल.

नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करून शेती शाश्‍वत करावी लागेल. शेतीमाल विक्रीसाठीचे विविध पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे लागतील. शेतीमालास योग्य दर मिळण्यासाठी थेट शेतीमाल विक्री तसेच त्यावर प्रक्रिया करावी लागेल.

या सर्वांबाबत प्रबोधनाच्या पणत्या जागोजाग लावाव्या लागतील. हा बदल घडवून आणण्यासाठी शासन प्रशासनाचे थेट प्रयत्न आवश्यक आहेत. अंधाराकडून प्रकाशाकडे सर्वांना घेऊन जाणे, हेच तर जीवनाचे सार्थक समजले जाते. दिवा दिवा पेटवायचा आहे आणि ही प्रकाशवाट आपणा सर्वांच्या प्रयत्नाने अधिक तेजोमय करायची आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT