Grapes Variety Agrowon
संपादकीय

Grapes Variety : द्राक्षांच्या नव्या, ‘पेटंटेड’ वाणांकडे वळावेच लागेल

Grapes Export : भारत हा जगातील आघाडीचा द्राक्ष उत्पादक देश असून, जागतिक बाजारपेठेतही त्याचे चांगले स्थान मिळवले आहे. मात्र जगभरातील स्पर्धक द्राक्ष उत्पादक देशांनी दहा ते पंधरा वर्षांत पारंपरिक वाण बदलून नव्या ‘पेटंटेड’ वाणांच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आपल्यालाही जागतिक बाजारपेठेत स्थान टिकवायचे असेल, तर त्यादृष्टीने मार्ग आखावा लागणार आहे हे निश्‍चित.

विलास शिंदे

Grapes Farming : महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक सातत्याने बदलते हवामान, बाजारपेठा आदी विविध आव्हानांना सातत्याने तोंड देत आहेत. बदलत्या जगाचा वेध, बाजारपेठेचा अभ्यास व जगातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेणे हे राज्यातील द्राक्ष उत्पादकांचे वैशिष्ट्य आहे.

दरवर्षी पाच लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती या पिकातून होते. अमेरिका (कॅलिफोर्निया), युरोपातील स्पेन, इटली हे देश, चीन, चिली, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया असे उत्तर व दक्षिण गोलार्धातील विविध देश विविध वातावरणात द्राक्ष उत्पादन घेतात. यातील काही देशांत वर्षातील फक्त चार महिने द्राक्षे पिकतात.

उर्वरित आठ महिने तिथे द्राक्षे आयात केली जातात. भारत, ब्राझील येथे वर्षातील आठ महिने द्राक्षे पिकू शकतात. जास्तीत जास्त दिवस द्राक्ष पुरवठा करण्याची या देशांची क्षमता आहे. उपलब्ध हवामानात फळधारणाही चांगल्या पद्धतीने येते. तुलनेने खर्चही कमी येतो. या नैसर्गिक अनुकूलतेमुळे जागतिक बाजारपेठेत या दोन या देशांना पुढील काळात चांगले भवितव्य आहे.

ग्राहकांची मागणी ओळखायला हवी

जागतिक बाजारपेठ ताब्यात घ्यायची तर तिथल्या ग्राहकाला जे पाहिजे तेच द्यावे लागणार आहे. नैसर्गिक ‘ब्लुम’ असलेल्या जाती, मोठा आकार, चवही चांगली टिकून असणे अशा द्राक्षांना त्यांची मागणी आहे.

अशी द्राक्षे कुठून उत्पादित होऊन आली आहेत यात ग्राहकाला रस नाही. द्राक्षाची गुणवत्ता, चव, ‘फूड सेफ्टी’चे निकष, टिकवणक्षमता या सर्व निकषांवर जगभरातील ग्राहक द्राक्षाकडे पाहतो. त्यामुळे आपले द्राक्ष उत्पादक स्पर्धक देश नेमके काय करताहेत? बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी कशाप्रकारे ‘स्ट्रॅटेजी’ आखताहेत हे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे.

क्षमता भरपूर, पण आव्हानेही आहेत.

क्रिमसन वगळता आपल्याकडे जवळपास सर्वच वाणांमध्ये संजीवकांचा वापर होतो. द्राक्षाची नैसर्गिक चव मिळत नसल्याने बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. चव टिकवायची तर संजीवकांचा कमीत कमी वापर किंवा तो होणार नाही या अवस्थेपर्यंत पोहोचणे हे आपल्यापुढचे महत्त्वाचे आव्हान आहे.

आपली उत्पादकता चांगली आहे. नव्या वाणांची साथ मिळाल्यानंतर त्यात अजून चांगले काम आपण करू शकू. पुढील किमान दोन वर्षे वाणांच्या ‘प्रोटोकॉल’ची प्रमाणके (स्टॅण्डर्डस्) तयार करण्यावर काम करावे लागेल. जागतिक निर्यात आकडेवारीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. ठरवलं तर २०३० पर्यंत आपण पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो. एवढी ताकद आपल्या द्राक्ष उत्पादकांची नक्कीच आहे.

स्पर्धा जिंकण्यासाठी नवे वाण हवेत...

वाण पैदास कार्यक्रम (प्लॅंट ब्रीडिंग प्रोग्रॅम) या संकल्पनेने जगभरातील द्राक्ष शेतीचे चित्र बदलले आहे. यातून अनेक दर्जेदार वाणांची निर्मिती होत आहे. याच जोरावर जगभरातील स्पर्धक द्राक्ष उत्पादक देश जगाच्या बाजारात बाजी मारीत आहेत. ‘ग्राफा, एसएनएफएल, आयएफजी, सनवर्ल्ड’ या जागतिक संस्थांनी जगातील ग्राहक व उत्पादकांची गरज ओळखून द्राक्षाच्या नवीन वाणांची निर्मिती केली आहे.

तीसहून अधिक वर्षे संशोधन, अपार मेहनत, सांघिक प्रयत्न यातून त्यांनी तयार झालेल्या या ‘पेटंटेड’ वाणांनी जगाचे ‘मार्केट’ काबीज करायला सुरुवात केली आहे.‘सह्याद्री’ शेतकरी उत्पादक कंपनीनेही असे ‘पेटंटेड’ वाण भारतात आणले आहेत. त्यातील काही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले

आहेत. काही येत्या दोन वर्षांत उपलब्ध होतील. पारंपरिक थॉम्पसन व त्याच्या ‘म्युटेशन’ झालेल्या वाणांच्या मर्यादा समोर येत आहेत. हे वाण जगभरातून लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. भारतात मात्र अजूनही पारंपरिक वाणांचा वापर सुरू आहे.

जागतिक स्पर्धेत टिकायचे तर काळाची पाऊले ओळखून नव्या, अधिक सक्षम वाणांकडे वळावे लागणार आहे. येत्या काळात दर्जेदार वाणांची निर्मिती आपल्याकडेच होईल असा जागतिक दर्जाचा ‘ब्रीडिंग प्रोग्रॅम’ राबवला गेला पाहिजे.

‘पेटंटेड’ वाणांची स्पर्धा

आपला द्राक्ष काढणीचा हंगाम डिसेंबर ते एप्रिल आहे. या काळात आपली सर्वांत मोठी स्पर्धा चिली, पेरू आणि दक्षिण अफ्रिका यांच्याशी होते. चिलीत काही वर्षांपूर्वी थॉमसन, फ्लेम, क्रिमसन हे पारंपरिक वाण ६२ टक्के क्षेत्रावर तर रेड ग्लोब वाण २८ टक्के क्षेत्रावर होता. आता तिथे नवीन वाणांची लागवड वाढत असून पारंपरिक वाण कमी होत आहेत.

सन २०२० मध्ये ‘तिथे पेटंटेड’ वाणांचे प्रमाण १४ टक्क्यांपर्यंत वाढले. चिलीची अशा वाणांची निर्यात वाढत आहे. पेरू हा द्राक्ष शेतीत तुलनेने उशिरा आलेला देश आहे. मात्र नवीन तंत्रज्ञान व वाणांवर त्यांनी दिलेला भर लक्षणीय आहे. या देशात सुरुवातीपासून लाल (रंगीत) वाणांचे प्रमाण जास्त आहे.

आताच्या आकडेवारीनुसार ७१ टक्क्यापंर्यंत तेथे या वाणांचे क्षेत्र वाढले आहे. तर हिरव्या द्राक्षांचे क्षेत्र फक्त १८.५ टक्के आहे. काळ्या (ब्लॅक) वाणांचे क्षेत्र तर फारच कमी म्हणजे १.७ टक्काच आहे. रेड ग्लोब, क्रिमसन हे त्यांचे सर्वांत महत्त्वाचे वाण होते. त्यानंतर फ्लेम वाणाचा क्रमांक होता.

मात्र तेही कमी होऊन ‘स्वीट सेलिब्रेशन’, ‘जॅक सॅल्यूट’ या नव्या ‘पेटंटेड’ वाणांचे प्रमाण वाढत आहे. ‘शुग्रावन’ हे ‘व्हाइट’ प्रकारातील वाण ८ टक्के होते. त्या जागेवर आरा-१५ हे वाण वाढत आहे. सोबत ‘स्वीट ग्लोब’, ‘टिमसन’ची लागवडही होतांना दिसत आहे. नव्या वाणांखाली २३.८ टक्क्यांपर्यंत क्षेत्र पोहोचले आहे.

दक्षिण अफ्रिकेतही हीच परिस्थिती

दक्षिण आफ्रिकेतही लाल वाणांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तिथेही ‘व्हाइट ग्रेप्स’ची लागवड कमी होत चालली आहे. युरोपात ग्राहकांकडून लाल द्राक्षांना चांगली मागणी होत असल्याने आफ्रिकेत त्यांची लागवड वाढत आहे.

तिथे क्रिमसन हे पारंपरिक लाल वाण होती. त्यांची सर्वाधिक निर्यात पूर्वी ‘क्रिमसन’चे राहिले आहे. मागील काही वर्षांत त्या तुलनेत ‘स्टार लाइट’, ‘स्कार्लोटा’, ‘टाऊनी’, ‘सेलिब्रेशन’ या नव्या लाल द्राक्षांची निर्यात वाढताना दिसत आहे.

विलास शिंदे

(लेखक नाशिक- मोहाडी येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT