Water Management Agrowon
संपादकीय

Water Management : या मातीचा पोत आगळा, रचना वेगळी

Dr. S. B. Varade : डॉ. एस. बी. वराडे यांचे ५ नोव्हेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मराठवाड्याला आपली कर्मभूमी मानून तेथे आयुष्यभर काम करणाऱ्या या सच्च्या मार्गदर्शकाच्या निधनाने या भागाचे अपरिमित नुकसान झाले आहे.

Team Agrowon

प्रदीप पुरंदरे

Water Resources : डॉ. एस. बी. वराडे यांचे ५ नोव्हेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मराठवाड्याला आपली कर्मभूमी मानून तेथे आयुष्यभर काम करणाऱ्या या सच्च्या मार्गदर्शकाच्या निधनाने या भागाचे अपरिमित नुकसान झाले आहे.

डॉ. एस. बी. वराडे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे निधन झाले. कृषी क्षेत्रात जल व्यवस्थापनात मातीचे महत्त्व या विषयावर अत्यंत तळमळीने प्रबोधन करणाऱ्या आणि मराठवाड्याला आपली कर्मभूमी मानून तेथे आयुष्यभर प्रत्यक्ष काम करणाऱ्या या सच्च्या मार्गदर्शकाच्या निधनाने मराठवाड्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. ‘वाल्मी मराठवाड्यात आहे पण वाल्मीत मराठवाडा नाही,’ ही टिका वराडे साहेबांनी कृतीने खोडून काढली. त्यांनी मराठवाड्यात विजयअण्णा बोराडे यांच्या बरोबर जे काम केले ते केवळ ऐतिहासिक आहे. मराठवाड्याने याची म्हणावी तशी दखल घेतली नाही, ही मात्र खेदाची बाब आहे. मराठवाडा हा अनुशेष त्वरित भरून काढेल यांची मला खात्री आहे. कारण अनुशेषाची जखम किती जिव्हारी असते हे मराठवाडा प्रत्यक्ष अनुभवतो आहे.

संस्थेच्या स्थापनेपासून वराडेसाहेब वाल्मीत होते. खरे तर वाल्मी स्थापन करण्याच्या प्रक्रियेतही त्यांचा सहभाग होता. सहभाग नव्हे; योगदान म्हणायला पाहिजे! संस्था कशी असावी, प्रशिक्षणाचे एकूण स्वरूप काय असावे, अभ्यासक्रमात नेमका कशाकशाचा समावेश करावा, इत्यादी अनेक बाबतीत वराडे साहेबांचे मत आदरपूर्वक विचारले जायचे आणि त्याचा आवर्जून स्वीकारही व्हायचा. त्याला कारण होते त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी, मृदाशास्त्रातील त्यांचे संशोधन, त्यांचा प्रदीर्घ व संपन्न अनुभव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावरील सर्वांचा विश्वास. वराडे साहेब म्हणजे निःस्वार्थी, निःस्पृह आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व. त्यांची प्रत्येक कृती संस्थेच्या हितासाठी आणि जलव्यवस्थापनाच्या भल्यासाठीच असणार याबद्दल सर्वांची खात्री होती.

वराडे यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले, आयएआरआय, दिल्ली येथे. त्यांची पीएचडी आयआयटी, खरगपुरची तर पोस्ट डॉक्टरेट रिव्हरसाईड, कॅलिफोर्नियाची! अनुभवाची सुरुवातच मुळी आयआयटी पासून. शोध प्रबंध व निबंध आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे प्राध्यापक व प्रमुख पदाचा अनुभव. अनेकजणांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केली आहे. वाल्मी स्थापन करायचा आग्रह जागतिक बॅंकेचा. तिचा अभ्यासक्रम निश्चित करायला जागतिक बॅंकेने निवडले पेरी आणि कारमेली हे इस्रायली तज्ज्ञ. आणि त्या तज्ज्ञांनी महाराष्ट्र शासनाला शिफारस केली ती वराडे साहेबांच्या नावाची. एवढा मोठा हा माणूस! प्रशासकीय अधिकाराची अपेक्षा त्यांनी कधी बाळगली नाही. ज्ञानातून प्राप्त होणारा अधिकार मात्र त्यांना भरपूर मिळाला - न मागता.
वाल्मीच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय मोठ्या प्रमाणात वराडे यांना जाते. विशेषतः १९८० ते १९९५ म्हणजे वाल्मीच्या स्थापनेपासून वराडेसाहेबांच्या सेवानिवृत्तीपर्यंत वाल्मीच्या प्रगतीचा आलेख सदैव चढता होता. एका भल्या पहाटे जलसंपदा विभागाची ही संस्था जलसंधारण विभागाकडे एका तुघलकी निर्णयानुसार वर्ग करण्यात आली. जलसंपदा विभागाने वाल्मीतून अंग काढून घेतले. जलसंधारण विभागाला वाल्मीचा उपयोग करून घेता आला नाही. परिणामी, वाल्मी आज व्हेंटिलेटरवर आहे.

सेवानिवृत्तीनंतर वराडे साहेबांनी पार पाडलेल्या काही विशेष जबाबदाऱ्या अशा आहेत.
- सदस्य, नेरीवाल्म-मूल्यांकन समिती, (ईशान्य
भारतासाठी असलेली वाल्मी म्हणजे नेरी वाल्म)
- कोर्ट कमिशनर (सिंचन पाणी वापराच्या एका न्यायालयील प्रकरणात)
- राज्यपाल नियुक्त सदस्य, कोकण कृषी विद्यापीठ, कार्यकारणी परिषद
- नवीन कृषी महाविद्यालय देण्यासाठीच्या निवड समितीचे अध्यक्ष
- सदस्य, महाराष्ट्र जल व सिंचन आयोग, १९९६
- सदस्य, केळकर समिती-शेती व पाणी उपगट, २०१४
- सदस्य, जोसेप समिती (जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात), २०१८
एकीकडे मोठमोठ्या शासकीय जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच दुसरीकडे वराडे अनेक संस्थांना मार्गदर्शन करत. सिंचन सहयोग, महाराष्ट्र पाणी परिषद, जीओफोरम, कृषी विज्ञान केंद्र-खरपुडी-जालना, मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, जालना आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केलेले संस्थात्मक काम मोलाचे आहे.

वसंतराव नाईक कृषी पुरस्कार (१९९६), सॉईल कॉनझर्व्हेशन सोसायटी ऑफ इंडियाने दिलेले सुवर्णपदक (२००३) आणि इंडियन सॉईल सायन्स सोसायटी व नास या व्यावसायिक संस्थांची फेलोशिप याद्वारे वराडे साहेबांचा बहुमान केला गेला असला तरी मला असे वाटते की वराडे यांच्या योगदानाची म्हणावी तेवढी दखल समाजाने घेतली नाही. वराडे आणि माझा संबंध १९८० सालापासूनचा. वाल्मीच्या पहिल्या प्रशिक्षण वर्गातला मी एक प्रशिक्षणार्थी. त्यांच्यामुळे वाल्मीने मला प्रतिनियुक्तीवर घेतले. पुढे मग मी पाटबंधारे विभागात राजीनामा देऊन सहायक प्राध्यापक म्हणून वाल्मीतच रुजू झालो. कालांतराने विद्याही वाल्मीत आली. आमच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक प्रगतीचे सर्व श्रेय वराडे यांना आहे. त्यांच्यामुळे आम्ही वाल्मीत आलो. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.
रूरकी विद्यापीठातून १९८९ साली मी एम ई पदवी प्राप्त केली. त्यावेळी कालवा स्वयंचलितीकरण हा माझा विशेष अभ्यासाचा विषय होता. त्या विषयाचे महत्व वराडे यांना चांगले माहीत होते. कारण त्यांनी अमेरिकेत स्वयंचलित कालवे पाहिले होते. दोन दोनशे किलोमीटर लांबीचे कालवे आणि त्यावर पाणी नियमनाची व्यवस्था नाही, ही महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांची स्थिती ‘मृदा-पीक-हवामान’ संकल्पनेवर आधारित शास्त्रीय सिंचन व्यवस्थापनासाठी योग्य नाही, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी यावर भाष्य देखील केले आहे. मृद संधारणाला प्राधान्य देणारा पाणलोट क्षेत्र विकास आणि हरित-जल हे वराडे यांचे चिंतन, संशोधन व कृतीचे विषय राहिले. मातीची धूप रोखणे आणि जमिनीतला ओलावा जपणे हे त्यांचे जीवित कार्य. मृदशास्त्राच्या परिभाषेत वराडे यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करायचे झाल्यास मी एवढेच म्हणेन की, या मातीचा पोत (soil texture) आगळा, रचना (soil structure) वेगळी, आणि मानवी मूल्ये धरून ठेवण्याची (water holding capacity) क्षमता अफाट!

प्रदीप पुरंदरे, ९८२२५६५२३२
(लेखक जलतज्ज्ञ आहेत.)
 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule : आमदार विकत घेता येतात, मग शेतकऱ्यांसाठी पैसे का खर्चत नाही

Voting Awareness : अकलूजला मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती

Krushna Valley Water : कृष्णा खोऱ्यातील पाणी डिसेंबरअखेर तुळजापुरात

Sugarcane Season 2024 : ‘कादवा’चे यंदा साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ८१ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT