Dnaneshwari Agrowon
संपादकीय

समत्व शिकविणारी ज्ञानेश्वरी

टीम ॲग्रोवन

रामेश्वर ठोंबरे

साधू-संतांला जन्म देणारी भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळेच अनेक अंगाने हे राज्य नटून जगासमोर दिसत असले तरी या राज्याचा मूळ पाया हा आध्यात्मिक विचारांनेच रचलेला आहे. जे तुमच्याकडे असेल ते काही प्रमाणात समाजाला देत राहण्याची जी वृत्ती असते तिलाच आध्यात्मिक तत्त्वज्ञान असे म्हणतात. तुम्ही जे प्राप्त केले ते सत्कार्य करण्यासाठी, परोपकार करण्यासाठी.

त्यामुळे त्यातील काही अंश निश्चितच समाजासाठी खर्च केला पाहिजे, ही विचार कृती म्हणजे आध्यात्मिक विचार होय. साधू-संतांचा महाराष्ट्र म्हणण्याची परंपरा निर्माण होण्याचे कारण म्हणजे जो विचार संतांनी आम्हाला दिला तो स्वतः पुरता, कुटुंबापुरता, अथवा विशिष्ट क्षेत्रापुरता नसून तो पूर्ण विश्वासाठी एकच दिला आहे. जगातील संबंध मानवासाठी जेव्हा एक मानवता धर्म स्थापन करायचा झाला तर त्यासाठी नवीन धर्मग्रंथ निर्मिती करण्याची गरज नाही.

ज्ञानेश्वर माउलीने लिहिलेली ज्ञानेश्वरी ज्या त्या भाषा प्रभूंनी फक्त आपल्या भाषेत रूपांतरित करावी, त्याप्रमाणे सर्वांनी आचरण करावे, बस एवढेच! संत म्हणजे काय तर प्रत्येक चांगली कृती अगोदर करणे आणि त्या मार्गाने समाजाला चालता यावे म्हणून योग्य ती दिशा दाखविण्याऱ्यांना संत म्हणतात.

आज समाजात चालणारी चढाओढ ही एकमेकांस पूरक नाही, तर ती एकमेकांच्या द्वेषातून निर्माण झाली आहे. त्यामुळे ही चढाओढ जास्त काळासाठी समाजाला पोषक विचार देणारी नाही. मग अखंड समाज एका विचाराने राहण्यासाठी जे कोणते तत्त्वज्ञान आहे, ते सर्व तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरीत सापडते.

ज्या संताला ज्ञानाचा शिरोमणी म्हणतात त्या ज्ञानेश्वर माउलीने लिहिलेली ज्ञानेश्वरी ही समाजाला समत्व शिकविणारी आहे. अशी उदाहरणे ज्ञानेश्वरीत दिसतील ती वाचली की मनावर परिणाम करतात आणि मग त्या व्यक्तीचे मन हे बुद्धीच्या अंकित हळूहळू येण्यास मदत करते. हे तत्त्वज्ञान खरं तर सध्या देशातील सर्व भाषेतील पाठ्यपुस्तकांत असणे गरजेचे झाले आहे.

आज माणूस विज्ञान युगात वेगाने भौतिक प्रगती करत आहे, पण अंतःकरणात तो कमालीचा अस्वस्थ आहे. तो सर्व विश्वाला जोडला तरी एकटाच असल्यासारखे त्याला वाटते. हा एकाकीपणा कशामुळे आला याचा विचार तो करीत नाही. केवळ सामाजिक सुसंवाद आम्ही ठेवला नाही. असो... आहे त्या परिस्थितीत समाजासोबत कसे आनंदाने राहावे याची शिकवण आम्हाला ज्ञानेश्वरीत मिळते.

माणूस जन्माला आल्यावर कर्म हे केलेच पाहिजे पण केवळ कर्म न होता ते ज्ञानकर्म झाले पाहिजे. आणि हे ज्ञानकर्म मी करतो, असा अंतःकरणात भाव नसला पाहिजे. असे कर्म माणूस करू शकेल काय? हे समजून देण्यासाठी माउलीने निसर्गातील अनेक उदाहरणे दिली आहेत. ती वाचल्यावर खरोखरच वाचक त्या पद्धतीने कर्म करण्यासाठी नक्कीच पुढे येईल. आज पैशाशिवाय कोणतेही काम होत नाही, अशी चर्चा समाजात ऐकू येते. सहज काम कोणीही करत नाही, हे फार धोक्याची बाब आहे.

प्रत्येक माणसाला स्वतःचे आपले काम नीट समजून सांगण्याचे काम ज्ञानेश्वरी करते. ते काम कसे करावे, त्यात सावधानता असावी, त्याची सुरुवात कशी करावी, याचे सर्व मार्गदर्शन ज्ञानेश्वरीत मिळते. जगातील असा कोणताच प्रश्न नाही ज्याची चर्चा माउलीनी ज्ञानेश्वरीत केली नाही. बऱ्याच वेळेस आखलेले बेत तडीस जात नाहीत, याचे कारण म्हणजे मनाचा विकल्प असतो. त्याचे नेमके काय करायचे? अज्ञान एक कलंक आहे तो कसा दूर केला पाहिजे? इतके उपकार ज्ञानेश्वर माउलीने मराठी भाषिकांवर केले आहेत.

आपण सर्व या तत्त्वज्ञानापासून दूर चाललो आहोत. त्यामुळे आमचे एकमेकांचे प्रेम कमी झाले आहे. आज आम्ही क्षणभरही थांबायला तयार नाही. आम्ही सामंजस्य टिकवून ठेवण्यास असमर्थ ठरलो आहोत. सर्व समर्थता येण्यासाठी ज्ञानेश्वरीची कास धरावी लागणार आहे.

संत शिकवण ही कधीच एकमेकांच्या विचारांचा अनादर करायला सांगत नाही. ज्ञानेश्वर माउलीनंतर काही वर्षांनी जन्मलेल्या अनेक संतांनी माउलीची थोरवी गायली आहे. संतच संताचे वर्णन करू शकतील आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या ते कव्हेत येणारे नाही.

म्हणून आपण काही नवीन करण्याची गरज नाही फक्त संत जे सांगतील ते जर लक्षपूर्वक करता आले की मानव देहाचे सार्थक झाले असे समजा. आज राज्यात जे वैचारिक द्वंद्व घडतंय ते जर लवकरात लवकर कमी करायचे असेल तर यासाठी आधार म्हणून ज्ञानेश्वरीतील हेच तत्त्वज्ञान उपयोगी पडेल. ज्ञानेश्वर माउलीबाबत संत तुकाराम महाराज म्हणतात,

जयाचीया द्वारी सोन्याचा पिंपळ

अंगी ऐसे बळ रेडा बोली

आता हे सांगा माउलीनंतर जवळपास तीनशे वर्षांनी जन्मलेले तुकाराम महाराज असे म्हणतात हा त्यांचा अनुभव आपण सामान्यांनी कसा जाणावा. व्यावहारिक दृष्टीने सोने हे वैभवाचे प्रतीक आहे शिवाय यात तीन गुण आहेत. पहिला कितीही दिवस राहिले तर गंजत नाही, दुसरे कमी होत नाही आणि तिसरे बाजारमूल्य कायम असते, किंबहुना त्यात वाढच होते.

पिंपळ हे भव्यता दर्शविणारा वृक्ष आहे. असे हे वैभव ज्यांच्या अंगणात आहे तर मग घर कसे असेल. अर्थात हे रूपक आहे, लौकिक अर्थाने माउली तसे पाहिले तर झोपडीत राहिलेत मग कधीच नष्ट न होणारे माउलीचे वैभव म्हणजे माउलीची विचारांची अनुभूती हीच जगातील सर्व माणसाला माणुसकी शिकविणारी आहे.

जे तत्त्वज्ञान सर्व विश्व हेच माझे घर म्हणते, ज्यांची प्रार्थना ही जग सुखी करण्यासाठी आहे शिवाय जगाचे कल्याण व्हावे म्हणून आपले सर्व पुण्य अर्पण करते मग सांगा इतकी समत्वाची भावना आईची जशी तान्ह्या बाळावर नजर हळुवार असते तशी दृष्टी माउली जगावर ठेवतात. हा हळुवारपणा सर्वांच्या लक्षात येण्यासाठी प्रत्येकांनी हळुवार ज्ञानेश्वरी वाचावी आणि स्वतःचे नाते जगाबरोबर जोडावे.

हे सामर्थ्य प्रत्येकात येण्यासाठी माउलीच कृपा करतील. अशी ही माय ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवरील भाष्यग्रंथ आहे. गीतेचे हे सर्व तत्त्वज्ञान तुमचा आमचा उद्धार होण्यासाठी माउलीने मराठीत केले आहे. गीता ही संस्कृत भाषेत असल्याने अनेक सामान्य वाचकाला त्या ज्ञानाचा उलगडा होणार नाही म्हणून ती काळजी माउलीने घेतली. जसे घास भरवताना आई एका घासाचे चार घास करत लहान बाळाला तृप्त करते, तसेच ज्ञान माउलीने ज्ञानेश्वरीतून देत जगाला तृप्त केले आहे.

रामेश्वर ठोंबरे

९४२०४०६९०१

(लेखक विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद येथे कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT