Babanrao Lonikar Controversial Statement: पराक्रमाच्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या उत्तर बाळाची सत्याचा सामना करताना अर्थात कुरू सैन्य पाहून मात्र बोबडी वळाली होती. याचे अतिशय मार्मिक वर्णन मोरोपंतांनी आर्या वृत्तात बालिश बहु बायकांत बडबडला असे केले आहे. राजपुत्र उत्तर बाळाप्रमाणेच काहीशी अवस्था भाजपसहित त्यांच्या सोबत राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांच्या काही नेत्यांची झाली आहे. विधानसभा निवडणूक प्रचार सभा तसेच जाहीरनाम्यांमध्ये भाजप आणि मित्र पक्षांनी राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, युवकांना अनेक मोठमोठी आश्वासने दिली. ती आश्वासने सत्तेत आल्यानंतर पूर्ण करायची सोडून सत्ताधारी पक्षांतील नेते वादग्रस्त विधाने करीत आहेत.
वाटूर येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना पातूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी ‘मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार दिले, तुझ्या बायकोच्या, बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले...’ असे वक्तव्य केले. यावर राज्यभरातून टीकेची झोड उठल्यावर देखील माफी मागायची सोडून हे विधान शेतकऱ्यांसाठी नाही तर स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांसंदर्भात केले असा जुजबी खुलासा त्यांनी केला. कोणाच्याही संदर्भात हे विधान केले असले तरी ते चुकीचे आहे, कष्टकरी, शेतकरी, महिलांचा अपमान करणारे आहे.
मुळात कोणत्याही फुकट वाटपांच्या योजनांची मागणी येथील शेतकरी अथवा महिलांनी कधी केली नाही. लाडकी बहीण, शेतकरी सन्मान आदी फुकट वाटपांच्या योजना या केवळ आणि केवळ मतांवर डोळा ठेवून भाजपने आखल्या. आणि त्याचा त्यांना राज्यात सत्तेत येण्यासाठी फायदा देखील झाला. या योजनांद्वारे शेतकरी, महिलांचे कल्याण करण्याऐवजी आपला स्वार्थ हाच हेतू अधिक होता, हे बाष्कळ बडबड करणाऱ्या नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
आणि ज्या फुकट योजनांचे तुम्ही दाखले देत आहात, त्यातील आश्वासने (लाडकी बहीण, शेतकरी सन्मान निधीत वाढ) नीट पाळण्याची दानत सरकार अजूनही दाखवत नाही. कर्जमाफीसाठी शेतकरी, त्यांच्या संघटना आंदोलन करीत असताना ती आत्ताच देता येत नाही, म्हणून सांगितले जाते. अर्थात, ‘गरज सरो वैद्य मरो’ याच दृष्टिकोनातून तुम्ही शेतकरी, महिलांकडे पाहता, हेच यातून दिसते. दुसरा मुद्दा म्हणजे सरकारचा पैसा म्हणजे सत्ताधारी नेत्यांचा पैसा, असा समज अलीकडे वाढताना दिसतो.
जनतेच्या करातून जमा झालेला हा पैसा जनतेवरच खर्च करायचा असतो. आणि हा खर्च करण्यासाठीची एक व्यवस्था म्हणून सरकार असते. त्यामुळे सरकार म्हणून राज्याचे कायमस्वरूपी मालक समजण्याचा गैरसमजही कोण्या नेत्याने करून घेऊ नये. सत्तेच्या अहंकारातून अनेक नेते वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. मायबाप जनतेने आज तुम्हाला सरकार म्हणून कारभार करण्याची संधी दिली, उद्या हीच संधी जनता दुसऱ्याला देऊ शकते. त्यामुळे सत्तेचा अहंकार बाळगण्याचेही काही कारण नाही.
कोण्या नेत्यामुळे शेतकऱ्याची पेरणी होत नाही किंवा सर्वसामान्यांच्या अंगावर कपडा येत नाही. शेती हा व्यवसाय नैसर्गिक आपत्ती आणि राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे तोट्याचा ठरतोय. तरीही शेतकरी अन्नधान्य, नगदी पिकांचे उत्पादन घेतो. त्यामुळे नेत्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत खायला अन्न, अंगभर वस्त्र मिळतात. आम्हाला दर्जेदार निविष्ठा, तंत्रज्ञान स्वातंत्र्य आणि शेतीमालास रास्त भाव द्या, आम्हाला तुमचे अनुदान, फुकट वाटप योजनांची गरज नाही, असे शेतकरी आजही ठामपणे सांगतो. अशावेळी फुकट वाटप योजनांचे कौतुक करताना शेतकऱ्यांचा अपमान होणार नाही, ही काळजी सत्ताधारी नेत्यांनी घ्यायला हवी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.