Rahul Gandhi
Rahul Gandhi Agrowon
संपादकीय

Rahul Gandhi : ‘भारत जोडो’ राहुल गांधींची अग्निपरीक्षा

विकास झाडे

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून ‘भारत जोडो’ पदयात्रा (Bharat Jodo Padyatra) सुरू होत आहे. कन्याकुमारीपासून श्रीनगरपर्यंतची ही यात्रा दीडशे दिवसांत ३५७० किलोमीटर प्रवास करेल. यासाठी दररोज सुमारे २५ किलोमीटर चालावे लागेल. स्वातंत्र्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच रसातळाला गेलेल्या काँग्रेसला (Congress) या यात्रेमुळे नवसंजीवनी मिळेल, असा विश्‍वास पक्षातील निष्ठावंत नेत्यांना आहे. पदयात्रांचा जगाचा इतिहास पाहता ज्यांनी यात्रा काढून सामान्यांशी नाळ जोडली त्यांना सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे.

महात्मा गांधींनी १९३० मध्ये काढलेल्या दांडी यात्रेनंतर आपले काही खरे नाही, याची जाणीव इंग्रजांना झाली होती. पंचवीस दिवसांची ही यात्रा स्वातंत्र्याची चाहूल देणारी ठरली. मिठावरील कर रद्द करावा म्हणून हा सत्याग्रह होता. तेव्हा गांधीजींच्या अनुयायांनी ही यात्रा यशस्वी होईल का? अशी शंका व्यक्त केली होती. परंतु या यात्रेने देशात नवचैतन्य आणले. इंग्रजांनी यात्रेत सहभागी ६० हजार नागरिकांना तुरुंगात डांबले होते. कविवर्य गदिमांनी ‘उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया, भारतास का मानवयात्रा, स्फुरणदायि ती दांडीयात्रा...’ या शब्दांत यात्रेचे वर्णन केले होते.

आजही त्या दांडीयात्रेचा प्रभाव कायम आहे. दांडी यात्रेनंतर चार वर्षांनी चिनी नेते माओ त्से तुंग यांनी चीनमध्ये १९३४ मध्ये तब्बल ३७१ दिवसांचा ऐतिहासिक ‘लाँग मार्च’ काढला. त्याचा परिणाम असा झाला, की कम्युनिस्ट क्रांतिकारी तळाचे आग्नेय ते वायव्य चीनमध्ये स्थलांतर झाले, चीनमध्ये कम्युनिस्टांची सत्ता आली. इटलीमध्ये मुसोलिनी यांनी २७ ते २९ ऑक्टोबर १९२२ असा केवळ तीन दिवसांचा ‘रोम मार्च’ केला. तिथेही सत्तांतर झाले. जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरच्याही १९२३ मधील म्युनिक ते बर्लिन मार्चचा इतिहास आहे. कालांतराने हिटलर हुकूमशहा झाला.

अस्तित्वाची यात्रा

यात्रा गांधीजींच्या मार्गाने निघाली की हिटलरच्या, हा प्रश्‍न नाही. या यात्रांनी मात्र सत्तापरिवर्तनाचा इतिहास नोंदवला आहे. काँग्रेसही आता पुन्हा ‘भारत जोडो’ यात्रेद्वारे रणनीती आखत ‘आयसीयू’मधून बाहेर पडू पाहत आहे. यात यश मिळाले तर दिल्लीतील रायसिना मार्गावर हुकूमत; अन्यथा पक्षाची अधोगती कायम या दोन्हीही बाबी नाकारता येत नाहीत. विशेष म्हणजे महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा पक्षाला लाभला असला तरी आताची बाब केवळ गांधी आडनावापुरतीच मर्यादित आहे. काँग्रेसचे महात्मा गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्येच भाषणांतून आपलेसे केले आहेत. गांधी विचार आणि तो जगण्याची कृती शून्य असली तरी देशातील तमाम लोकांमध्ये सातत्याने गांधीजी येत असतात ते मोदींमुळेच. साम-दाम-दंड-भेद ही ‘गुण’संपन्नता काँग्रेसकडे नाही. अन्यथा, त्यांच्या पक्षातील चार राज्यांतील आमदार विकले गेले नसते.

राजकारणात अपयशाचा ठपका बसलेल्या राहुल गांधींसाठी ही यात्रा अग्निपरीक्षा ठरणार आहे. त्यांना कोणत्याही पदाची अपेक्षा नसली तरी गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसची गाडी पुढे जात नाही. पक्षात आयुष्य काढलेल्या अन्य नेत्यांना देश नेता मानायला तयार नाही. पक्षात आपली अवहेलना होते म्हणून जी-२३ मधील नेत्यांनी राहुल यांच्याविरोधात आवाज उठवला. या नेत्यांना खासगीत विचारा तुम्ही अध्यक्ष का होत नाही? त्यांच्याकडूनच उत्तर मिळते, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही हो, परंतु दुसऱ्याला मी चालणार नाही.’ हा दुसराही जी-२३चा सदस्य असतो. शेवटी त्यांचे म्हणणे एकच असते गांधी कुटुंबियांनीच पक्ष चालवावा आणि आमचे आधीसारखे चालू द्यावे. राहुल गांधींना हे मान्य नसते. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे.

‘क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे...’ अशी त्यांची कार्यपद्धती आहे. एखादा विषय त्यांनी हातात घेतला की तिसऱ्या दिवशी ते परदेशात असल्याची बातमी येते. मग भाजपवाल्यांना आयते कोलीत मिळते. या धरसोडीमुळेच काँग्रेसची दुरवस्था झाली आहे. आता ‘भारत जोडो’च्या निमित्ताने ते किमान दीडशे दिवस राज्याराज्यांतील तळागाळातील लोकांशी थेट संवाद साधतील. सरकारला घेरण्यासाठी गरिबी, बेरोजगारी, राष्ट्रीय सुरक्षा, राफेल, नोटाबंदी, जीएसटी, महागाई, सरकारी उपक्रमांची विक्री, चीनचे आक्रमण आदी विषय त्यांच्याकडे आहेत. राजकीय, सामाजिक, बुद्धिजीवी, व्यापारी, कष्टकरी अशा विविध वर्गांतील लोकांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे.

पक्षांतर्गत संघर्ष मिटवावा

मोदींच्या भाजपवर २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत मात करण्यासाठी काँग्रेसची ही धडपड असली तरी अडथळेही खूप आहेत. राहुल गांधींना पक्षांतर्गत युद्ध आधी जिंकावे लागेल. भारत जोडो यात्रा काँग्रेसची नाही तर योगेंद्र यादवांची आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अन्य नेतेही म्हणतात. आम्ही सहभागी होणार नाही, असे सांगत यात्रा सुरू होण्यापूर्वीच सुरूंग लावणारेही नेते काँग्रेसमधीलच आहेत. भारत काय जोडता? आधी काँग्रेस जोडा, असे भाजपचे नेते म्हणत असतील तर ते चुकीचे नाही.

राहुल यांच्यासमवेत काँग्रेसने निवडलेले ११७ लोक पूर्णवेळ असतील. यामधील काहींची निवड मुकूल वासनिक यांनी केली आहे. जी-२३च्या यादीत स्वाक्षरी करणाऱ्या नेत्यांपैकीच ते एक आहेत. यावरून लक्षात येते, की ‘भारत जोडो’आधी पक्षाने ‘काँग्रेस जोडो’ची सुरूवात केली आहे. योगेंद्र यादव यांच्या नेतृत्वात जनआंदोलनाचा एक जत्था यात सहभागी होईल. यात्रेत कायम १०० अतिथी असतील, तर ज्या राज्यातून यात्रा जाईल तेथील १०० जण अशी कायम ३०० जणांची यात्रा असेल. राज्याराज्यांतून उप-पदयात्रा काढून मोदींविरोधात वातावरण निर्मितीचा केलेला संकल्प कितपत यशस्वी होतो, हेही पाहणे महत्त्वाचे आहे.

ही यात्रा नांदेड आणि जळगाव जामोद येथून जाणार आहे. नांदेडमधील नेते अशोक चव्हाण हे पृथ्वीराज चव्हाणांच्या बाधेपासून वाचले, तर ते भारत जोडो यात्रेचे स्वागत करून त्यात सहभागी होतील. यात्रेच्या नियोजनातून सेवाग्राम आणि नागपूरला का वगळले? हा अनेकांपुढे प्रश्‍न आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर आहे. विद्यमान सरकारपुढे संघाचे काहीही चालत नाही, असा समज करून नागपूर वगळले असावे. काँग्रेसचा लोकसभा निवडणुकांचा प्रारंभ सेवाग्राममधील गांधी आश्रमातून होत असे. त्यासाठी सोनिया गांधी आग्रही असायच्या. परंतु ही पदयात्रा आश्रमाजवळही फिरकणार नाही.

गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यावर आधी भारत दर्शन करा, असा सल्ला समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखलेंनी त्यांना दिला होता. कदाचित तोच धागा पकडून राहुल अत्यंत दुर्गम भागातून जात असावेत. काँग्रेसचे भारत जोडो सुरू होईल, त्याच दिवशी आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हरयानामधून अखिल भारतीय प्रचार मोहीम सुरू करतील. ‘मेकिंग इंडिया नंबर-१’च्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये रॅली, तरुणांच्या भेटी आणि तिरंगा यात्रा काढतील. केजरीवालांनी ‘भारत जोडो’चाच मुहूर्त साधून काँग्रेसलाही पर्याय असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. उगाच नाही ‘आप’चा भाजपची टीम-बी उल्लेख केला

जात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT