agrowon editorial article
agrowon editorial article 
संपादकीय

खवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ

अजय देशमुख 

भात उत्पादक शेतकरी कृषी व्यवस्थेतला महत्वाचा पण काहीसा दुर्लक्षित घटक. नगदी पिकाच्या दृष्टिकोनातून पूर्वी भात उत्पादनाकडे पाहिले जात नसावे. किंबहुना आजही बऱ्याच प्रमाणात भात पीक पावसाळी सिंचनावरच अवलंबून असते. हरितक्रांतीच्या काळात आंबेमोहोरच्या तोडीचे पण अधिक उत्पादनाचे दर्जेदार वाण निर्माण करण्याचे आव्हान होते. आंबेमोहोर सुगंधी तर होता पण जास्त पावसात त्याचे उत्पादन कमी व्हायचे. त्यातच करपा रोगाला देखील हे वाण लगेच बळी पडायचे. हे आव्हान स्विकारून राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत येणारे वडगाव मावळ येथील भात संशोधन केंद्राने इंद्रायणी हे वाण १९८७ मध्ये विकसित केले. आंबेमोहोर व १५७ आयआर - ८ या जातीच्या संकरातून इंद्रायणी वाण तयार करण्यात आले. मावळातून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीचे नाव या वाणाला देताना कदाचित कोणास हे ठाऊक नसेल की इंद्रायणी नदीप्रमाणे हे भाताचे वाण देखील प्रवाही व सामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यातील जीवनदायीनी पीक ठरेल. 

आज घोटी ते कोल्हापूर पर्यंत सह्याद्रीच्या सर्वच दऱ्या-खोऱ्यातील शेतकरी इंद्रायणी तांदळाकडे विकासाचे साधन म्हणून पाहतो आहे. राज्यातील एकूण भात लागवडीखालील क्षेत्रापैकी म्हणजेच तीन लाख हेक्टर क्षेत्रामधील जवळपास सत्तर टक्के क्षेत्रावर इंद्रायणी भाताचे पीक घेतले जाते. एकरी उत्पादनात देखील इंद्रायणी इतर भात वाणांना स्पर्धा निर्माण करते आहे. उच्च रोगप्रतिकारक क्षमता, मध्यम कालावधी, चांगला उतारा व हक्काचा ग्राहक यामुळे यापुढील काळातही इंद्रायणी भात पिकाखालील क्षेत्र वाढते राहणार आहे. भात संशोधन केंद्र वडगाव मावळ चे काशीद सर यांच्या मते अगदी दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी देखील या भात वाणाच्या लागवडीसाठी आग्रही आहेत. नाशिक नंदुरबार ते पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर असा सर्वदूर जरी इंद्रायणी पिकत असला तरी मावळ, वेल्हा, भोर व रेठरे इंद्रायणी साठी ग्राहक प्रथम पसंती दर्शवतात. या भागातील इंद्रायणी तांदूळ चवीला अधिक चांगला असल्याचे मत जाणकार नोंदवतात. ग्राहकांच्या पसंतीचा भाग म्हणजे इंद्रायणी मधील सुवास व मऊपणा. पीक फुलोऱ्यात असताना ६९ ते ७४ टक्के आर्द्रता असल्यास चांगला सुगंध प्राप्त होतो. ही अनुकूलता साधारणतः मावळातील डोंगरदऱ्यात आढळते.  या सर्व जमेच्या बाजू असल्या तरी इंद्रायणी तांदळाला काही ग्रहण लावणाऱ्या बाबी देखील निदर्शनास येत आहेत. भेसळयुक्त तांदूळ केवळ ग्राहकांची फसवणूक करत नाही तर विश्वास देखील कमी करतो. आज फार मेहनतीने निर्माण केलेले हे इंद्रायणी चे मार्केट या कृतीने संपुष्टात येऊ शकते. याची सुरवात जशी थोड्या जास्त नफ्यासाठी तांदळात भेसळ करण्यापासून होते तशीच मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त बियाणे विक्री करून होते. आजकाल बियाणांची मागणी आणि पुरवठा याचा विचार केला तर चांगले दर्जेदार आणि खात्रीशीर बियाणे मिळणे ही पहिली कसोटी ठरते. या कसोटीवर पुरेपूर उतरणे आजतरी शक्य नाही. हा बाजार खूप मोठा आहे, यामध्ये जसे अनवधानाने बियाणांमध्ये गफलत होते तसाच जाणीवपूर्वक देखील काळाबाजार केला जातो. यातून मूळ वाण व त्यावर आधारित शेतकरी ते ग्राहक अशी सर्व साखळीच फसविली जाते. उत्कृष्ट व प्रमाणित बियाणे कोणते? कोठे उपलब्ध होणार? लागवडी चे सुधारित तंत्रज्ञान कोणते? खतांच्या मात्रा कोणत्या व कशा द्याव्यात? फुलोऱ्यात काय काळजी घ्यावी? सेंद्रिय पद्धतीने इंद्रायणी कसा पिकवावा? मध्यस्थ वगळून विक्री व्यवस्था कशी निर्माण होईल? असे असंख्य प्रश्न आज शेतकरी बांधवांमधून उपस्थित होत आहेत. इंद्रायणी नदी ज्याप्रमाणे जीवनाचा कणा आहे त्याप्रमाणेच इंद्रायणी तांदूळ देखील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. दोन्हीकडे शुद्धीकरणाची आवश्यकता आहे. त्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी लागेल. 

इंद्रायणीचे प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सीड प्लॉट उभारणे, खात्रीशीर बियाणे उपलब्ध करून देणे, सुधारित लागवड तंत्रज्ञान प्रसार व प्रचार, खत नियोजन, सेंद्रिय निविष्ठांची उपलब्धता, काढणीपश्चात हाताळणी, एक उत्कृष्ट विपणन व वितरण व्यवस्था यासारखे उपाय योजावे लागतील. याकरिता शेतकरी, राज्य शासनाचा कृषी विभाग व या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा लागेल. ‘आत्मा’ या कृषी विभागातील यंत्रणेमार्फत शेतकरी गटांची चांगली साखळी ग्रामीण भागात उभी राहत आहे. या माध्यमाचा फायदा घेऊन यापैकी इंद्रायणी उत्पादक गटांना एकत्र करून जिल्हा किंवा विभागीय पातळीवर फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करता येऊ शकते. या कंपनीच्या माध्यमातून वरील सर्व प्रश्नांची उत्तरे शोधता येतील व शेतकरी वर्गाला आर्थिक तसेच संघटनात्मक ताकद यातून देता येईल. प्रमाणित बियाणे व तांदूळ उत्पादनाबरोबरच चांगले मार्केटिंग व ब्रँड या माध्यमातून विकसित होऊ शकेल. 

इंद्रायणी उत्पादक शेतकरी जर एकत्र आले तर भौगोलिक मानांकन अर्थात जीआय नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करता येतील. इंद्रायणी हे संकरित वाण असल्याने त्याची नोंद जीआयसाठी होत नसल्याचे मत यातील काही तज्ज्ञ व्यक्त करतात. परंतु संघटित प्रयत्न केल्यास निश्चितीच यामध्ये यश मिळू शकते. आज राज्यात मावळचा आंबेमोहोर, भंडाऱ्याचा चिन्नोर व आजरा घनसाळ या तांदूळ वाणांना जीआय मिळाले आहे. वाडा कोलम प्रस्तावित आहे. या सर्व तांदूळ वाणांइतकाच वैशिष्ट्यपूर्ण अशा इंद्रायणी चे महत्त्व महाराष्ट्राला चांगलेच पटले आहे. केवळ पारंपरिक व विशिष्ट भौगोलिक स्थान हे निष्कर्ष न लावता इंद्रायणी तांदळाला जीआय मिळणे हे या वाणाच्या शुद्धतेसाठी व देशी-विदेशी बाजारपेठेसाठी आवश्यक ठरेल. येणारा काळच ठरवेल की इंद्रायणी सारखे गुणी वाण आपले अस्तित्व सर्व कसोट्या पार करून टिकवेल की काळाच्या ओघात नष्ट होईल. जर राज्याचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांनी तसेच कृषी विभाग, सर्व शेतकरी व इंद्रायणी प्रेमी ग्राहक यांनी प्रयत्न केल्यास हा तांदूळ पिकवणारे आणि खाणारे असे दोन्ही घटक समाधानी होतील. 

अजय देशमुख  - ८३८००८००१५  (लेखक शासकीय शेतकरी सल्लागार समिती भोर तालुक्याचे अध्यक्ष आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT