संपादकीय

माहिती, ज्ञान आणि शहाणपण

शिकलेल्या माणसाकडे माहिती अन्‌ ज्ञान जरूर असते; पण अनुभवाने अन्‌ सतत कष्ट केल्याने, कृतिशील राहिल्याने, कमी शिक्षित वा अशिक्षित अशा ग्रामीण माणसाकडे शहाणपण खच्चून भरलेले असते. लोकशिक्षिका बनून जेव्हा वाडी-वस्तीवर पाऊल ठेवले, तेव्हा या गोष्टीची पदोपदी प्रचिती येऊ लागली.

कांचन परुळेकर

शाळा-कॉलेजात जाऊन शिकता आले नाही, की माणसे स्वतःला अडाणी समजतात. वास्तविक जीवनात यशस्वी व्हायला माहिती, ज्ञान, कौशल्य, भविष्याचा वेध अन्‌ शहाणपण लागते. शिकलेल्या माणसाकडे माहिती अन्‌ ज्ञान जरूर असते; पण अनुभवाने अन्‌ कष्ट केल्याने, कृतिशील राहिल्याने, कमी शिक्षित वा अशिक्षित अशा ग्रामीण माणसाकडे शहाणपण खच्चून भरलेले असते. वंचित वस्तीतल्या शाळाबाह्य मुलांतही शहाणपण दिसून येते. लोकशिक्षिका बनून  जेव्हा वाडी-वस्तीवर पाऊल ठेवले तेव्हा या गोष्टीची पदोपदी प्रचिती येऊ लागली. शाळाबाह्य कचरावेचक मुलांना आम्ही मेणबत्ती बनविणे शिकवित होतो. साच्यातील मेणबत्ती शिकवली अन्‌ प्रश्‍न विचारला, ‘‘तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही कोणती घरगुती साधने वापरून वेगळ्या आकाराची मेणबत्ती बनवाल?’’ वाटी, पणती, पेला, फुंकणी, मोदकपात्र अशी उत्तरे अपेक्षित होती; पण कचरावेचक मुलांनी एकदम अनपेक्षित उत्तर दिले ‘अंड्याच्या कवचात’. आम्ही चकीतच झालो. आजवर कधीही हा पर्याय आम्हाला सुचलाच नव्हता. प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी, ‘‘कवचातील पांढरा पापुद्रा हळुवारपणे काढा. मातीत वा वाळूत तोंड वर करून कवच उभे ठेवा. रंगीत पातळ मेण त्यात ओता. थंड झाल्यावर कवच काढून टाका. अंडे उलटे करून ठेवा. वरच्या निमुळत्या भागावर गरम सुई दाबून धरा. भोक पडेल. आधीच मेणात घालून घट्ट केलेला दोरा त्या भोकात सरकवा. मेणाचा एक थेंब भोकावर टाकून भोक बंद करा.’’ बोलतच होतो; पण मन म्हणत होते शाळेतच न गेलेल्या मुलांनी आम्हाला केवढा मोठा धडा दिला.

शेतमजूर महिलांना शास्त्रोक्त पद्धतीने अळे कसे घालावे याचे प्रशिक्षण देऊन दोडका बीवाटप करीत होतो. ‘अंगणात वा परड्यात खडबडीत नसणारी जागा निवडा. त्या जागी एक घमेले पालथे घाला. घमेल्याभोवती रेघ मारा. गोल तयार होईल. घमेले बाजूला काढून त्या गोल जागेत खणा. दोन पाटी माती बाहेर काढा. एक घमेले मातीचा चिखल बनवा. गोलाभोवती वरंबा तयार करा. पाणी, खत अडावे म्हणून राहिलेल्या एक घमेले मातीत एक घमेले उत्तम शेणखत मिसळा. ते मिश्रण खड्ड्यात ओता. तयार शिगेवर हात मारा. सपाट जागा मिळेल. वीतभर अंतर मोजा. दोन्ही टोकांना बोटाचे एक पेर एवढा खड्डा करा. त्यात बी आडवी टाका. एका अळ्यात दोन बिया असतात. मग खड्डे माती टाकून बुजवा. पाणी शिंपडा. खाली अळ्यात पाणी ओता. शिग ओली, खाली पाणी. केशाकर्षणाने पाणी वर खेचले जाऊन ते आधी बीला नंतर मुळांना मिळते. वेल वर आला की शेजारी काठी, वेलाला दोरी बांधून वेल काठीच्या आधारे घरावर, मांडवावर चढवा.’’ एक जण जोरात ओरडली, ‘‘अहो परडं अन्‌ अंगणच नाही तर अळं कुठं घालायचं?’’ मला काय उत्तर द्यावे ते सुचेना. तेवढ्यात एक आजी जोरात बोलल्या, ‘‘अगं परडं अंगण नसना. घराला दार तर हाय न्हवं? एक पोतं घे. त्यात माती अन्‌ शेणखत भरून बाजूनं हवा, पाणी जाया वाईक भोकं पाड. त्यात घाल आळ अन्‌ ठेव दारात.’’ जागेचा प्रश्‍न सुटला असं वाटेपर्यंत नकारनाथाला शरण गेलेली ती बाई म्हणाली, ‘‘अहो अत्यासाब, पाणी कुठं हाय? मग मात्र आजीचा पारा चढला. ‘‘अगं पदरच्या पैशानं बी घेऊन तुला शिकवाय माणसं इथवर आली. अर्धा तास तुला शिकवित्यात, अन्‌ तुझा नन्नाचा पाढा संपना. अगं रोज चूळ भरतीस का नाही? घरच्या चार माणसांनी चुळा पोत्यात टाकल्या की उगवतं की अळं’’ आम्ही फक्त माहिती अन्‌ ज्ञान दिले. आजीने मोलाचे शहाणपण दिले. शेतमजुरांनी पोत्यात अळी घालून प्रत्येकी शंभरवर दोडकी काढली, तेव्हा मी आजीच्या शहाणपणाला दंडवतच घातला.

चारसूत्री भातशेती, पाणी उपलब्ध नसताना जमिनीतील ओल व दव यांच्या साह्याने मटार उत्पादन, सामुदायिक शेती, कंत्राटी शेती, गांडूळखत निर्मिती, वैभव विळा वापर, नारळ काढण्याची शिडी असे शेती तंत्र अंतरण करताना शेतकऱ्याचा अनुभव मोलाचा ठरला; म्हणून वाटते शहरी वा शिक्षिताला सहजप्राप्त ज्ञान आणि माहिती, वंचित तसेच ग्रामिणांचे शहाणपण यांची सांगड घातली गेली, तर आमचे प्रजासत्ताक महासत्तेच्या शर्यतीत लवकरात लवकर अग्रणी ठरेल. कांचन परुळेकर : ०२३१-२५२५१२९ (लेखिका ‘स्वयंसिद्धा’च्या संचालिका आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा; अतिरिक्त १ हजार ६०० कोटींची मदत जाहीर

Agriculture Technology: धान्य साठवणुकीतून नफ्याचे गवसले तंत्र

Cotton Import Duty: कापूस उत्पादकांच्या अस्तित्वावर घाला

Dragon Fruit Benefits: क्षेत्र वाढते, जाणीव-जागृती वाढवा

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

SCROLL FOR NEXT