Agriculture Technology Agrowon
संपादकीय

Agriculture Mechanization: यांत्रिकीकरणाचा नवा आयाम

Agriculture Development: भविष्यातील शेती स्वयंचलित यंत्रे-अवजारे तसेच यंत्रमानवावर चालणार आहे. अशावेळी आपल्या देशात सुद्धा यांची निर्मिती आणि वापरावर भर द्यावा लागेल.

विजय सुकळकर

Farming With Technology: आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशांतर्गत ट्रॅक्टर विक्री तसेच निर्यातीत देखील वाढ झाली आहे. मागील मॉन्सूनची चांगली साथ शेतकऱ्यांना लाभली. खरीप-रब्बी पिकांचे उत्पादन वाढले. शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला आणि त्यांनी ट्रॅक्टर खरेदीला पसंती दिली, असे देशांतर्गत विक्री व निर्यातवृद्धीचे कारण सांगितले जात आहे.

ट्रॅक्टरची विक्री वाढण्याचे केवळ हे एकच कारण नाही. देशभरात वाढती मजूरटंचाई, मजुरीचे वाढलेले दर, बैलावरचे कमी झालेले शेतीचे अवलंबित्व, बॅंकांकडून ट्रॅक्टर खरेदीसाठी होत असलेला पतपुरवठा, यंत्रे-अवजारांना दिले जाणारे अनुदान या सर्वांच्या परिणामस्वरूप देशांतर्गत ट्रॅक्टरचा खप वाढला आहे.

महत्त्वाचे म्हणजे चांगल्या मॉन्सूनने शेतीचे उत्पादन वाढले तरी शेतीमालास मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढताना दिसत नाही, हा मागील अनेक वर्षांपासूनचा अनुभव आहे. त्यामुळेच ट्रॅक्टरची विक्री वाढली असली तरी आर्थिक कोंडी झालेल्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरसाठीचे कर्ज हप्तेही थकले आहेत.

एक मात्र नक्की आहे, शेतकऱ्यांच्या हाती थोडा पैसा आला की निविष्ठांपासून ते यंत्रे-अवजारेपर्यंतच्या उद्योग-व्यवसायांत भरभराट येते. देशात शेतकरी हा मोठा ग्राहक वर्गही असल्याने सर्वसमावेशक विकासाला चालना द्यायची असेल तर त्याची क्रयशक्ती वाढेल, अशा धोरणांचा अवलंब झाला पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही, हे खेदाने म्हणावे लागते.

कृषी यांत्रिकीकरणामध्ये आपला भर ट्रॅक्टरच्या निर्मिती आणि विक्रीवर राहिला आहे. ट्रॅक्टरला जोडून पलटी नांगर, नऊ फाळी नांगर, रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर अशी अवजारे विकसित झाल्यामुळे मशागत या कामाचे ९० टक्क्यांच्या वर यांत्रिकीकरण झाले. पेरणी, वाहतूक यासाठी देखील ट्रॅक्टरचा वापर बऱ्यापैकी वाढला आहे. परंतु उपयुक्त अवजारांअभावी मशागत आणि काही प्रमाणात पेरणी-वाहतूक यापुढे शेतीचे यांत्रिकीकरण गेले नाही. काटेकोर टोकन, रोप लागवड, आंतरमशागत, फळ लागवडीसाठी खड्डे खोदणे, भाजीपाला-फळांची काढणी शिवाय काढणीपश्‍चात प्रक्रिया यासाठी अजूनही पुरेसे पर्याय आपल्याकडे उपलब्ध नाहीत.

आपल्या देशातील कोरडवाहू शेती क्षेत्र, एक-दोन एकर तुकड्यांतील शेती, डोंगर उतारावरची शेती शिवाय विभाग आणि पीकनिहाय शेतकऱ्यांच्या स्थानिक गरजांनुसार छोटी छोटी यंत्रे अवजारे विकसित करावी लागतील. काही कंपन्या छोट्या ट्रॅक्टरसह छोटी यंत्रे अवजारे विकसित करण्यासाठी संशोधनात गुंतवणूक करीत आहेत, हे चित्र आश्‍वासक आहे.

माहिती तंत्रज्ञानाला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देत स्वयंचलित यंत्र-अवजारांचे संशोधन जगभरात होत आहे. स्वयंचलित यंत्रे अवजारे अधिक काटेकोर आणि परिणामकारक काम करताना दिसून येतात. कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सेन्सॉर तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रमानव निर्मिती व त्याचा वापर उद्योग क्षेत्रात होत आहे. भविष्यातील शेती तर स्वयंचलित यंत्रांवरच चालणार आहे. आपल्या देशात सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत स्वयंचलित यंत्रे-अवजारे, यंत्रमानव निर्मिती आणि वापर यावर भर द्यावा लागेल.

त्याकरिता विभाग, शेतीचा आकार-प्रकार आणि पीक पद्धतीनुसार स्वयंचलित यंत्रे-अवजारे, यंत्रमानव निर्माण करण्यासाठी संशोधन केंद्रे उभारावी लागतील. स्वयंचलित यंत्रे-अवजारे संशोधन-निर्मितीत काम करणाऱ्या संस्था, कंपन्या, स्टार्ट अप यांना ही मोठी संधी आहे. अशा स्टार्ट अपसाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा केंद्र-राज्य शासनाने पुरवायला हव्यात. स्वयंचलित यंत्रे-अवजारे निर्मिती करताना या देशातील शेतकऱ्यांना ती परवडतील आणि उपयुक्तही ठरतील, एवढी काळजीही घ्यावी लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Assembly Monsoon Session: सौर पंपांऐवजी वीज पंप देण्याबाबत धोरण आणू: ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

Ethanol Blending: जूनमध्ये इथेनॉल मिश्रण पोचले १९.९ टक्क्यांपर्यंत

BT Cotton Productivity: बीटी कापसाच्या उत्पादकतेवर प्रश्‍नचिन्ह

Soybean Stock: सोयाबीनचा शिल्लक साठा २३ टक्के कमी राहणार

Maharashtra Rain: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT