कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे नियंत्रण
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे नियंत्रण 
नगदी पिके

कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे नियंत्रण

डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, डॉ. हनुमान गरुड

फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत बारीक असते. त्यांच्या पंखाच्या कडा केसाळ असतात. सर्वसाधारणपणे हे किडे पानाच्या मागच्या बाजूस आढळतात. पानाचा वरचा पापुद्रा खरवडून अन्नरस शोषतात. परिणामी पाने निस्तेज होतात. पांढुरके व नंतर तपकिरी डाग दिसू लागतात. अधिक प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये पानाची गळ होते. दिर्घकाळ कोरडे व उष्ण हवामान राहिल्यास व पावसाने दांडी मारल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. जोराच्या व सततच्या पावसाने संख्या कमी होते. या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वाधिक आढळतो. पांढरी माशी पांढरी माशी १ ते २ मिमी लांब, रंगाने पिवळसर, पांढरट असून पंख पांढऱ्या किवा करड्या रंगांची असते. या किडीचे पिल्ले, प्रौढ पानाच्या खालील बाजूस राहून पानातील रस शोषतात. पाने कोमेजतात. माशीच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या चिकट पदार्थांमुळे पानावर काळी बुरशी चढते. पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबली गेल्याने कपाशीच्या उत्पादन, प्रत यावरही अनिष्ट परिणाम होतो. सध्या या कीडीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ह्या किडीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर महिन्यापासून ते नोव्हेंबर अखेर जास्त आढळतो. कमी पर्जन्यमान व अधिक तापमान ह्या किडीच्या वाढीस पोषक आहे. अधिक पाऊस व ढगाळ वातावरणात किडीची संख्या कमी होते. आर्थिक नुकसानीची पातळी फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान पांढरी माशी : सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किवा २० पिल्ले प्रती पान एकात्मिक व्यवस्थापन : १. प्रचलित मशागतीय पद्धतीचा योग्य वेळी व विशिष्ट प्रकारे वापरल्यास फायदेशीर ठरतात. २. कपाशीचा खोडवा घेण्याचे टाळावे. हंगामाबाहेर पीक घेतल्यास किडींना अखंड अन्न पुरवठा होतो. पुढील हंगामात पिकावर लवकर आक्रमण करतात. ३. कपाशीमध्ये किडी खाणाऱ्या पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी भगर हे मिश्र पीक घ्यावे. त्यासाठी हेक्टरी २५० ग्रॅम बियाणे वापरावे. कापसाच्या शेताभोवती मका, झेंडू, एरंडी, चवळीची लागवड करावी. ४. कपाशीच्या कुळातील ( भेंडी, अंबाडी ) किंवा ज्या पिकावर कपाशीवरील किडी उपजीविका करतात. (टोमॅटो, तूर, हरभरा इ. ) अशी पिके कपाशीपूर्वी किंवा नंतर घेऊ नयेत. ५. कपाशीची शेवटची वेचणी संपल्याबरोबर लगेचच शेतात जनावरे किंवा शेळ्या, मेढ्या चरण्यासाठी सोडाव्यात. त्या कपाशीच्या झाडावरील शिल्लक बोंडे, पाने खातात. त्यातील किडी, रोगांच्या विविध अवस्था नष्ट होतात. ६. कपाशीची धसकटे, पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावा. त्यावरील किडीच्या अवस्था नष्ट होतील. ७. कपाशीच्या शेताच्या कडेने पाण्याच्या चारीतील तसेच पडीक जमिनीतील पिठ्या ढेकणाच्या पर्यायी यजमान वनस्पती उदा. गाजर गवत, पेठारी, बावची, रानभेंडी, रुचकी, कोळशी इ. चा नायनाट करावा. ८. माती परीक्षणानुसार खतांच्या मात्रा द्याव्यात. रस शोषक किडींचा व बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नत्र खताचा अधिक वापर टाळावा. ९. कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू किटकाचे संवर्धन होण्यासाठी उदा. मका, चवळी, उडीद, मूग यासारखी अंतरपिके/मिश्रपिके अथवा कपाशी पिकाभोवती घ्यावीत. १०. वेळेवर आंतर मशागत करून पीक ८-१० आठवडे तणविरहित ठेवावे. ११. पिवळे चिकट सापळे कपाशीच्या शेतामध्ये लावावेत. पिवळ्या रंगाकडे पांढऱ्या माशा आकर्षित होऊन चिकटतात. १२. लेडीबर्ड बीटल (ढालकिडा) या किटकाचे प्रौढ भुंगे व त्याच्या अळ्या प्रामुख्याने मावा किडीवर जगतात, म्हणून पिकावर मावा किडीसोबत लेडीबर्ड बीटल पूरेशा प्रमाणात आढळल्यास रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळावा. १३. कपाशीवरील किडीचे नैसर्गिक शत्रू उदा. सिरफीडमाशी, पेंटाटोमिड ढेकूण, कातीन, भुंगे, ड्रगनफ्लाय, (चतुर), हॉबरमाशी, गांधीलमाशी, प्रार्थनाकीटक(मॅन्टीड), टचनिड माशी इ. चे संवर्धन करावे. १४. किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच शिफारशीनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी. कीटकनाशकांचा वापर (मात्रा प्रती लीटर पाणी ): फुलकिडे ॲसिटामेप्रीड (२० टक्के) ०.४ ग्रॅम किंवा थायामिथोक्झाम (२० टक्के) ०.४ ग्रॅम किंवा फिप्रोनिल (५ टक्के) २ मि. ली. किंवा डायमिथोएट (३० टक्के) १ मि. ली. पांढरी माशी ॲसिफेट (७५ टक्के) २ ग्रॅम किंवा ॲसिटामेप्रीड (२० टक्के) ०.४ ग्रॅम किंवा डायमिथोएट (३० टक्के) १ मि. ली. किंवा फ्लोनिकामीड ०.२ ग्रॅम. डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८ (विषय विशेषज्ञ किटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT