Ravindranath Tagor
Ravindranath TagorAgrowon

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Birth Anniversary Of Ravindranath Tagor : भारत आणि चीन या दोन देशांदरम्यानचे संबंध कधीही फारसे चांगले राहिले नाहीत. परंतु अशाही परिस्थितीत चीनमधील करोडो लोकांच्या हृदयात सदैव एक भारतीय बसलेला आहे. त्यांचे नाव आहे रवींद्रनाथ टागोर! आज त्यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष लेख.

प्रा. डॉ. संतोष डाखरे

भारत आणि चीन या दोन देशांत मागील अनेक वर्षांपासून सुरळीत असणारे संबंध जून २०२० च्या सीमेवरील रक्तरंजित संघर्षानंतर चिघळले आहेत. परंतु भारताला सदैव पाण्यात पाहणाऱ्या चीनमधील करोडो लोकांच्या हृदयात एक भारतीय बसला आहे, असे म्हटल्यास कोणाचाही विश्वास बसणार नाही, मात्र ही वस्तुस्थिती आहे.

चिनी लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर साहित्यातील नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय आणि आशियाई व्यक्ती होत. ते उत्कृष्ट कवी, लेखक, संगीतकार, चित्रकार, गीतकार, कथाकार आणि महान समाजसुधारक होते.

गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रहाने जगभरात प्रसिद्धी मिळविली होती. १९०५ च्या बंगाल फाळणी दरम्यान त्यांनी ‘अमार सोनार बाग्लां’ नामक ऐतिहासिक गीताची रचना केली होती. पुढे जाऊन हेच गीत स्वतंत्र बांगला देशचे राष्ट्रगीत झाले. ‘जन गण मन’ या भारतीय राष्ट्र्गीताचे जनक रवींद्रनाथ टागोर हेच आहेत. अशाप्रकारे टागोर जगातील असे एकमेव कवी असावे की ज्यांच्या रचनेला एकाचवेळी दोन देशांनी आपले राष्ट्रगीत बनविले.

टागोरांनी त्यांच्या कार्यकाळात अमेरिका, ब्रिटन, जपान, चीनसह अनेक देशांची भ्रमंती केली. मात्र चीनमध्ये त्यांना अधिकच प्रेम मिळाले, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. टागोर यांना साहित्यातील नोबेल घोषित होताच आशियामधील साहित्यिक वर्तुळात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांच्या प्रसिद्धीमध्ये आणखीनच भर पडली. भारतामध्ये त्यांच्या या पुरस्काराची चर्चा होतीच मात्र शेजारी चीनमध्येही टागोरांना डोक्यावर घेण्यात आले.

Ravindranath Tagor
Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

त्याकाळी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थांपैकी एक असलेले चेन डक्सिऊ हे टागोरांच्या साहित्याने प्रचंड प्रभावित झाले होते. त्यांनीच सर्वप्रथम त्यांच्या साहित्याची ओळख चीनला करून दिली. त्यांनी टागोरांच्या चार कविता चिनी भाषेत अनुवादित करून एका मासिकात प्रसिद्ध केल्या. वाचकांना त्या आवडल्यात.

त्यानंतर पुढे त्यांच्या कविता प्रकाशनाचा ओघ वाढतच गेला. सुरुवातीला गीतांजलीमधील कविता ह्या प्रेम कविता आहेत, असा समज तेथील वाचकांचा होता. त्यामुळे ते केवळ युवा वर्गात लोकप्रिय होते. मात्र पुढे टागोरांच्या कवितेमध्ये आध्यात्मिक अर्थ आणि तत्त्वज्ञानही दडले असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व स्तरात त्यांची लोकप्रियता वाढीस लागली.

त्यानंतर चेन यांनी विविध चिनी पत्रिकांमधून टागोरांच्या साहित्यावर, त्यांच्या जीवनकार्यावर लेखमाला चालविली. टागोर भारतासह युरोपमध्येही कसे लोकप्रिय आहेत याचे गुणगान त्यांनी गायले. याच कालावधीत चीनमधील पेकिंग विद्यापीठात त्यांच्या कवितांचे भाषांतर झाले. पुढे त्यांची जगप्रसिद्ध रचना गीतांजलीचा चिनी भाषेत अनुवाद झाला आणि ती चीनच्या घराघरांत पोहोचली. या माध्यमातून चीनमध्ये टागोरांची लोकप्रियता वाढतच गेली.

चीनमध्ये टागोर असे लोकप्रिय झाले असतानाच चिनवासियांना त्यांच्या प्रत्यक्ष भेटीची ओढ लागली होती. आणि तो दिवसही उजाडला. १९२४ मध्ये सर्वप्रथम टागोर चीनमध्ये दौऱ्यावर गेले. आधीच त्यांच्या कविता आणि साहित्याने चिनी नागरिकांवर मोहिनी घातली होती. त्यात आता प्रत्यक्ष त्यांचे दर्शन म्हटल्यावर चिनी भारावून गेले. ठिकठिकाणी त्यांचे उत्साहात स्वागत झाले. नामांकित विद्यापीठांमध्ये त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. दिग्गजांसोबत भेटी-गाठी घडू लागल्यात.

बुद्धिजीवींसोबत चर्चासत्र पार पडू लागलेत. चिनी राजकीय नेते आणि साहित्यिकांनी तर त्यांचे ‘झ्यू झेन्दान’ असे चिनी नामकरणही केले होते. टागोर तब्बल सहा महिने चिनमध्ये वास्तव्यास होते. या कालावधीत त्यांचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १९१० मध्ये चीनमध्ये ‘न्यू कल्चर मुव्हमेंट’ नामक चळवळ सुरू झाली. पाश्चिमात्य आधुनिक आणि विज्ञानवादी विचारसरणीचा अवलंब करण्यासंदर्भातील या मोहिमेत टागोरांचे योगदानही महत्त्वपूर्ण असे राहिले आहे. चीनमधील बुद्धिजीवींनी उचलून धरलेल्या या चळवळीत टागोरांच्या साहित्याचा मोठा वाटा होता.

Ravindranath Tagor
Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

आजही चीनमधील अनेक विद्यापीठांत टागोरांचे साहित्य अभ्यासक्रमात आहे. साहित्याच्या अभ्यासकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तर ते आजही लोकप्रिय आहेत. मात्र काही असे घटकही आहेत की ज्यांना टागोरांची ही लोकप्रियता आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या साहित्याची चिरफाड करण्याचे उद्योग तिथेही चालतात. असाच काहीसा उद्योग काही वर्षांपूर्वी तेथील फेंग तांग नामक कवीने केला होता. टागोरांचा प्रसिद्ध ‘स्ट्रे बर्ड्स’ या कविता संग्रहाचा चिनी अनुवाद त्यांनी केला होता. मात्र यातील काही कवितांचे त्यांनी अश्लील भाषेत भाषांतर केले होते.

भारतामध्ये तर यावर प्रचंड टिका झालीच, मात्र टागोरांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या चीनमधील चाहत्यांनाही हा प्रकार आवडला नाही, ते रस्त्यावर उतरले. आंदोलने केली. हा रोष बघता चिनी प्रकाशकाला हे अनुवादित साहित्य परत घ्यावे लागले. २००९ मध्ये चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी वृत्तसंस्थेने एक सर्व्हे केला. ज्यामध्ये कोणत्या विदेशी व्यक्तींचा चीनवर प्रभाव आहे हे तपासण्यात आले. तर यामध्ये साठ प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत अकराव्या क्रमांकावर टागोरांना पसंती मिळाली. टागोरांच्या चीन भेटीला शतक उलटून गेले तरीही त्यांची लोकप्रियता तिथे अजूनही कायमच आहे हे यावरून सिद्ध होते.

चीनचे टागोरप्रेम एवढ्यावरच थांबले नाही तर तेथील साहित्यप्रेमींनी टागोरांच्या समग्र साहित्याचा ३३ खंडामध्ये अनुवाद केला आहे. (या कार्यात चीनने भारत सरकार किंवा कोणत्याही भारतीय संस्थेचे सहकार्य घेतले नाही. हे विशेष!) एक हजारांच्या वर कथा, आठ कथासंग्रह, पन्नास कविता संग्रह, विपुल प्रमाणात लेख, दोन हजारांच्यावर गीत आणि साहित्यातील नोबेलचे मानकरी असणाऱ्या टागोरांबद्दल भारतात अनास्था असताना चीनचे हे योगदान नोंद घेण्याजोगे आहे.

खरे तर भौगोलिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या रशियाशी साम्य बाळगणाऱ्या चीनमध्ये रशियन साहित्यिक लोकप्रिय असावयास हवे होते. मात्र साहित्यप्रेम कोणत्याही भौगोलिक आणि विचाराने संचालित होत नसते तर ते हृदयाने जुळलेले असते. हेच खरे आहे. टागोरांनी तीनवेळा चीनला भेट दिली आणि प्रत्येक वेळेला त्यांचे उत्साहातच स्वागत झाले. त्यांचाही चीनवर विशेष लोभ होता. भारतात परत आल्यानंतर त्यांनी एक स्वतंत्र अध्ययन केंद्र सुरू केले ज्यामधून चिनी भाषा आणि संस्कृती शिकविल्या जात होती.

चीनमध्ये मागील वर्षी टागोरांची १६१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चीनमधील साहित्यिक, बुद्धिजीवी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या योगदानाचे पारायण केले. इतकेच नव्हे तर भारताचा पराकोटीचा द्वेष करणाऱ्या शी जिनपिंग यांनी टागोरांच्या कवितेतील काही ओळींचे वाचन केले आणि आपण टागोरांच्या साहित्याने प्रेरित असल्याचे मत व्यक्त केले. नवनव्या शोधांनी जगाला भुरळ घालणाऱ्या चीनवर एका भारतीय साहित्यिकाची मोहिनी असावी हे अभिमानास्पदच म्हणावे लागेल.

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com