शेतीला नवाश्मयुगात सुरुवात झाली असे मानतात. या नवाश्मयुगाचा (Neolithic Age) काळ इसवीसन पूर्व १०,००० वर्षांचा गणला जातो. त्याआधी मानव रानटी अवस्थेत होता. तेव्हाचे लोक गायी, बैल, घोडे वगैरे जनावरे पाळीत. यानंतरच्या, म्हणजेच ताम्रपाषाण (Chalcolithic Age) युगाच्या काळात (इ.स.पू. ५००० ते ३०००) लोक शेती करून घरे बांधून स्थायिक झाले. त्या काळी भारतातील शेती बरीच प्रगत झाली होती. हे लोक ईजिप्त, इराण, मेसोपोटेमिया वगैरे देशांशी व्यापार करीत.
मोहें-जो-दडो आणि हडप्पा येथील उत्खननांवरून सिंधू संस्कृती (इ.स.पू. ३२००–२७००) ही नागरी संस्कृती होती, हे स्पष्ट दिसते. त्या संस्कृतीतील लोकांचा व्यवसाय मुख्यतः शेती असून कापूस, जव, टरबुजे, खजूर, भाजीपाला, आणि फळे यांची ते लागवड करीत असावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. गहू, जव, विविध शेंगा, तीळ यांचीही पिके त्याकाळी काढली जात असावीत. भात शेतीचा पुरावा मिळत नाही.
कापसाची निर्यात मेसोपोटेमियासारख्या प्रदेशांमध्ये केली जाई. कृत्रिम जलसिंचनाबद्दल खात्री देता येत नाही पण त्याच्या अस्तित्वाची शक्यता आहे. आता परिचित असलेले बहुतेक भारतीय प्राणी – गोवंश, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, डुकरे, कोंबड्या – तेव्हाही पाळले जात. घोड्यांच्या अस्तित्वाबद्दल साशंकता आहे. हडप्पामध्ये सापडलेल्या एका मोठ्या धान्य कोठारावरून शेतकऱ्यांकडून कर वसूल केला जात असावा, असे अनुमान निघते.
वैदिक काळात (इ.स.पू. २००० ते इ. स. पू. ८००) वर्षांचा गणला जातो. या काळात भारतात आर्यांचे वास्तव्य असून त्यांचा मुख्य धंदा शेती होता. ते गायी-मेंढरे पाळीत. भारतात येण्यापूर्वी आर्यांना कृषिविद्या अवगत होती, असे आढळून येते. ऋग्वेदात आणि अथर्व वेदात शेतीशी संबंधित अनेक उल्लेख आढळतात. उदा. उर्वरा म्हणजे नांगरलेली जमीन, अप्नस्वती म्हणजे खणणे, शिंपणे इ. कामे झालेली जमीन, असे शब्द ऋग्वेदात आले आहेत. पाट किंवा कालवे काढून शेतीला पाणीपुरवठा करण्यासंबंधीची वचने ऋग्वेद आणि अथर्ववेदात आहेत.
शतपथब्राह्मणात धान्य विळ्याने कापणे, त्याचे भारे बांधणे, ते खळ्यात नेऊन झोडणे, धान्य चाळन साफ करणे यांसारख्या शेती कामांचे वर्णन आहे. अथर्ववेदात उंदीर, पाखरे, कीटक यांच्यापासून तसेच अवर्षण, अतिवृष्टी अशा आपत्तींपासून शेतीचे संरक्षण करण्याचे मंत्र दिलेले सापडतात. पाणिनीच्या ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथात नदीचे पाणी कालव्याद्वारे शेतात नेणे आणि विहिरींचे पाणी मोटेने वर खेचून शेतात सोडणे, असे दोन्ही उल्लेख आढळतात.
तत्कालिन भारतीय अर्थव्यवस्था पशुपालन आणि शेती या दोन गोष्टींवर आधारित होती. तत्कालीन वाङमयात शेतीपेक्षा पशुपालनाचे उल्लेख जास्त येतात. याचे कारण शेतीचा व्याप कमी होता असे नाही. पण शेती व्यवसायाचा दर्जा निकृष्ट मानलेला होता. धान्याच्या संदर्भात ‘यव’ हा एकच शब्द ऋग्वेदात वापरलेला आहे पण त्याने सर्व प्रकारच्या धान्यांचा निर्देश होत असावा. एक विशिष्ट धान्यप्रकार हा अर्थ त्याला नंतरच्या काळात प्राप्त झाला असावा.
नांगरणी आणि कापणी यांचे तत्कालीन उल्लेख आढळतात. कृत्रिम जलसिंचनाबद्दल निर्णायक पुरावा मिळत नाही. गोधनाचा चलन आणि संपत्तीच्या मोजमापाचे साधन म्हणून उपयोग होई. रामायण, महाभारत या ग्रंथांमधील शेतीच्या बाबतीतल्या उल्लेखांवरून तत्कालीन शेती प्रगतावस्थेला पोहोचली होती, असे स्पष्ट होते.
क्रमशः
पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : प्राचीन काळातही शेतीसाठी स्वतंत्र खाते होते!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.