Eknath Shinde
Eknath Shinde Agrowon
मुख्य बातम्या

Ola Dushkal : शिंदे, फडणवीस पापक्षालन करणार का ?

रमेश जाधव

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abddul Sattar) म्हणतात ओला दुष्काळ (Ola Dushkal) जाहीर करण्यासारखी स्थिती नाही. दुसरे एक विद्वान मंत्री चंद्रकांत पाटीलही (Chandrkant patil) म्हणाले की ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागली. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. आणखी किती राखरांगोळी झाल्यावर पुरेसे नुकसान झाल्याची खात्री सरकारला पटणार आहे?

वातावरणातील बदलाचे ( Climate Change) संकट येणाऱ्या काळात किती भयानक स्वरूप धारण करेल, याची काहीशी चुणुक गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना अनुभवायला येत आहे. चालू वर्षही अपवाद ठरलं नाही. यंदा सुरूवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची सत्त्वपरीक्षा बघितली. पेरणीपासून ते पीकवाढीच्या प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना परेशान करून सोडलं पावसानं. शेवटचा दणका परतीच्या पावसानं दिला.

पीक ऐन काढणीला आलेलं असताना पावसानं धुमाकूळ घातला. खरीपाची पिकं मातीमोल झाली आणि रब्बीच्या पेरण्यांचीही अडचण झाली, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडलाय. त्यात जे काही किडूकमिडूक खरीपाचं पीक हाताशी लागेल, त्याला बाजारात दर मिळू नये, अशी सरकारची धोरणं आहेत. सगळ्या बाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी झालीय.

राज्यात अतिवृष्टीने दाणादाण उडाली, पण सरकारदरबारी मात्र कोणाला त्याचं सोयरसुतक नाही. सरकार अस्तित्वात आहे की नाही, अशी शंका यावी, इतकी भयाण शांतता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिसून आली. शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल संतापाची भावना आहे, हे लक्षात आल्यावर राज्य सरकारने तातडीने एक निर्णय मात्र घेतला. तो काय तर मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानावर शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. म्हणजे काय केले तर अब्दुल सत्तारांनी जसे एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला सिल्लोडवरून बस भरून माणसं गोळा करून आणली होती, तसे काही निवडक शेतकरी वर्षा बंगल्यावर गोळा करून आणण्यात आले आणि त्यांना मंदिराच्या बाहेर याचकांच्या गर्दीला पैसे वाटावेत तसे दिवाळीच्या भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला.

शेजारी यजमानाच्या भूमिकेत सुस्मित अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री पुत्र खा. श्रीकांत शिंदे जातीने लगबग करत होते. राज्याचा कृषी विकास आराखडा तयार केला जाईल, असा हवेतला गोळीबार करून मुख्यमंत्र्यांनी वेळ मारून नेली. आता एवढं सगळं करूनही सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही, अशी टीका होत असेल तर, त्याला शिंदे-फडणवीस काय करणार?

ज्याला घरकोंबडे म्हणून हिणवलं जात होतं, ते माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मराठवाड्यात शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घ्यायला दौरा करतात. ब्याऐंशीव्या वर्षी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पुरंदर तालुक्यात दौरा करून शेतकऱ्यांचं नुकसान बघतात. मग `वर्षा` आणि `सागरा`ला जाग येते. विरोधी पक्षाला राजकीय मायलेज मिळेल, या धास्तीने मग शिंदेणवीस शनिवारपासून राज्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार, अशी घोषणा होते.

पाऊस आता परत गेलाय. शेतकरी काढणीच्या कामात गुंतलेत. जेव्हा अतिवृष्टीनं दाणादाण उडाली होती, तेव्हा शिंदेणवीसांना हा प्रश्न काही महत्त्वाचा वाटला नाही. गणपती मंडळांना, गोविंदांना, खोकेसम्राट आमदारांच्या मतदारसंघताल्या मेळाव्यांना हजेरी लावणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शेतकऱ्यांच्या बांधावर जावंसं वाटलं नाही. महाशक्तीचे प्रतिनिधी आणि सरकारचे चालक-मालक असलेल्या अभ्यासू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या विषयावर रसवंती पाझरावी वाटली नाही.

ठीक आहे. देर आये पण दुरूस्त या. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा. आस्मानी संकटाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना पिकविम्याचं संरक्षण का मिळत नाही, दरवेळी सरकारकडे का हात पसरावा लागतो, याचा भ्रष्ट स्वार्थ बाजूला ठेऊन विचार करा आणि पिकविम्याच्या विषयाचा एकदा तुकडा पाडा.

शेतकऱ्यांना परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी भरभक्कम भरपाई द्या. सोयाबीन, कापूस आणि कडधान्यांचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारने आयात-निर्यातीच्या आघाडीवर शेतकऱ्यांना जो फास लावलाय, ते सुलतानी संकट दूर करण्यासाठी महाशक्तीच्या दाढ्या कुरवाळा आणि धोरणात्मक निर्णयांत बदल घडवून आणा. तरच थोडेफार पापक्षालन होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT