नाशिक : नाशिक जिल्ह्यात अनेक भागात दमदार पावसाची सुरवात झाली असून पेरण्यांना हळूहळू वेग येऊ लागला आहे. येवला, निफाड, नांदगाव, चांदवड, देवळा, सिन्नर, इगतपुरी व त्रंबकेश्वर तालुक्यांतील अनेक भागांत पावसाचे आगमन झाले असले तरी अत्यंत तुरळक ठिकाणी शेतीकामांना वेग आला आहे. तर अजूनही अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस झाल्यानंतर थोड्याफार प्रमाणात पेरणीसाठी ओली झालेल्या जमिनीत शेतकऱ्यांना कामे करण्यासाठी चाल मिळाली आहे. खरीप हंगामातील मका, बाजरी, कापूस आणि सोयाबीन पिकांच्या लागवडीसाठी सुरवात झाली आहे. अनेक भागांत पेरणीसाठी अजूनही जमिनीत पुरेशी ओल न झाल्याने पेरण्या लांबणीवर गेल्या आहेत. वर्षभरापासून दुष्काळी परिस्थितीत अनेक अडचणींना सामोरे जात उदरनिर्वाह झाला. काम मिळत नव्हते आता पाऊस आल्याने शेती कामांना सुरवात झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून पावसाची दमदार सुरवात झाल्याने शेतीकामाला गती आली आहे. मागील वर्षीच्या खरिपात पेरण्या झाल्यानंतर पावसाने पूर्णपणे ओढ दिल्याने मका आणि सोयाबीनची पिके पाण्याविना करपून गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च वसूल झाला नव्हता. त्यामुळे मोठे संकट ओढवले होते. मात्र, चालू वर्षी उशिरा का होईना पाऊस झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मॉन्सून पूर्व पावसाने खरीप हंगामातील पिकांना वेळेवर मशागत करणे शेतकरी वर्गाला सोपे झाले होते. पारंपरिक पद्धतीने यंदाही शेतकरी बैल जोडीच्या पेरणीला प्रामुख्याने प्राधान्य देत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोड्या आहेत ते शेतकरी औताच्या साहाय्याने मशागती करत आहेत तर काही शेतकरी ट्रॅक्टरद्वारे मका, बाजरी, सोयाबीन पेरणी करत आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी अजूनही दमदार पाऊस व्हावा यासाठी शेतकरी प्रतीक्षेत असून शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळले असल्याचे दिसून येते. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांना आता दमदार आणि भिज पावसाची आवश्यक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.