संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

जागतिक कापूससाठा दहा टक्क्यांनी घटणार

Chandrakant Jadhav

जळगाव ः कापूस व्यापारक्षेत्रात कमी उत्पादनामुळे साठ्यासंबंधीची अडचण यंदा राहणार आहे. मागील हंगामाच्या तुलनेत जागतिक कापूससाठा १० टक्‍क्‍यांनी कमी होणार असून, जागतिक गरज यंदा तीन टक्‍क्‍यांनी वाढल्याची माहिती कापूस बाजारपेठेतील विश्‍लेषक, जाणकारांनी दिली आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वांत मोठा वस्त्रोद्योगाचा डोलारा असलेल्या चीनमधील कापूससाठाही यंदा घटणार आहे. परिणामी कापसाचे दर टिकून राहतील, असे अपेक्षित आहे.

चीनने मार्च ते ऑगस्ट २०१८ यादरम्यान आपल्याकडील लिलावात दोन दशलक्ष मेट्रिक टन रुईची विक्री केली. २०१७-१८ मध्ये चीनचा कापूससाठा ८.६ दशलक्ष मेट्रिक टन होता. तर नुकत्याच सुरू झालेल्या कापूस हंगामात (२०१८-१९) चीनचा कापूससाठा ६.६ दशलक्ष मेट्रिक   टन असणार आहे. अर्थातच चीनमधील साठा मागील हंगामाच्या तुलनेत २३ टक्‍क्‍यांनी कमी राहणार आहे. २०११-१२ नंतर सर्वांत कमी कापूससाठा चीनमध्ये यंदा असणार आहे. चीनच्या कापूससाठ्यावरच जगातील साठ्याचे अंदाज बांधण्यात आले असून, जागतिक साठाही कमी असणार आहे.

अर्थातच चीनमध्ये आपल्या वस्त्रोद्योगाची गरज पूर्ण करण्यासाठी हवे तेवढे उत्पादन नसेल. चीन यंदा ८० ते ९० लाख गाठींची शिवाय सुताचीदेखील आयात करील, हेदेखील निश्‍चित आहे. सध्या सुताच्या आयातीसंबंधी चीनने सावध भूमिका घेतलेली असली तरी कापसाचा पुरवठा कमी असल्याचे लक्षात घेता तेथून आयातीसंबंधीचे सौदे सुरू होतील, असे संकेत मिळत आहेत. चीनमधील साठा कमी होत असला तरी चीनव्यतिरिक्त इतर ठिकाणी कापूससाठा काहीसा वाढेल.

२०१७-१८ मध्ये चीनव्यतिरिक्त इतर देशांचा कापूससाठा मिळून १०.१ दशलक्ष मेट्रिक टन एवढा होता. २०१८-१९ हा साठा १०.२ दशलक्ष मेट्रिक टन असण्याची शक्‍यता आहे. परंतु चीनचा साठा कमी होत असल्याने जागतिक साठ्यावरही त्याचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे. सरत्या हंगामात भारतातही कापूससाठा फक्त १८ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) एवढाच राहिला. ऑगस्टनंतर निर्यातीसंबंधी फारसे सौदे झालेले नसले तरी स्थानिक बाजारात चांगली मागणी राहिली. सुमारे ७४ लाख गाठींची निर्यात सप्टेंबरअखेरपर्यंत झाली.

नव्या हंगामात बांगलादेश व व्हिएतनामसोबत सौदे होत आहेत. भारतीय खंडीला (३५६ किलो रुई) ४५,५०० रुपये असे दर सध्या मिळत आहेत. सुमारे दीड लाख गाठींचे सौदे बांगलादेश व व्हिएतनामसोबत अलीकडेच झाले आहेत. चीनकडून अजून फारसा उठाव नाही.  

एक डॉलरसाठी पाकिस्तान मोजतोय १३४ रुपये जगात अमेरिका वगळता सर्व देशांचे चलन डॉलरसमोर कमजोर होत आहे. आशियात चीनला अमेरिकेसोबतच्या व्यापारयुद्धाचा परिणाम सहन करावा लागत आहे. पाकिस्तानमध्ये एकाच दिवसात डॉलरचे दर आठ टक्‍क्‍यांनी वधारून ते १२६ रुपयांवरून १३४ रुपये प्रतिडॉलर झाले. बांगलादेशमधील टाका चलनही डॉलरसमोर कमकुवत असून, सुमारे ९२ टाकांमध्ये एक डॉलर मिळत आहे. भारतात रुपयाही कमजोर असून, एक डॉलरसाठी ७३.८० रुपये मोजावे लागत आहेत. डॉलर तेजीत असल्याने कापसाचे दर स्थिर आहेत.  

कापूससाठ्याची स्थिती (दशलक्ष ः मेट्रिक टन)
घटक   २०१५-१६  २०१६-१७  २०१७-१८  २०१८-१९ (अपेक्षित)
जागतिक २०.३१  १८.७९ १८.७४   १६.९१
चीन  १२.६५   १०.६३   ८.५९  ६.६७
अमेरिका     ०.८२ ०.५९   ०.९७  ०.९७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT