खास कोरडवाहू क्षेत्र डोळ्यांसमोर ठेवून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेली तुरीची बीडीएन- ७११ ही जात राज्याच्या बरोबरीने गुजरातसह, तेलंगाणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आदी राज्यांत गेली आहे. या जातीचे विस्तारलेले क्षेत्र कृषी संशोधन कार्याची दिशा स्पष्ट करीत आहे. मराठवाडा हे तुरीचे आगार. सुमारे पाच लाख हेक्टरवर मराठवाड्यात तुरीचे पीक घेतले जाते. सुधारित जातींमुळे या आगारातील तुरीची उत्पादकता प्रतिकूलतेतही टिकून आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे तूर पिकातील सातत्यपूर्ण संशोधन आणि खास कोरडवाहू क्षेत्रात उत्पादन देणारी तुरीची बीडीएन ७११ ही जात उत्पादकतेच उदाहरण म्हणून घेता येईल. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्र कडधान्यांतील संशोधन कार्यासाठी प्रसिद्ध आहे. याआधी बीएसएमआर -७३६ आणि बीएसएमआर -८५३ या जातींना इतर राज्यांतील शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. याचबरोबरीने आता बीडीएन ७११ ही जात राज्य, परराज्यांतील शेतकऱ्यांच्या पसंतीस पडली आहे. कोरडवाहू क्षेत्राला डोळ्यांसमोर ठेवून २०१२ मध्ये तुरीची बीडीएन-७११ ही जात विकसित झाली. प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल उत्पादन देण्याच्या जातीचा प्रसार मराठवाड्यासह विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात झाला. राज्यात तुरीच्या सुमारे नऊ जाती लागवडीखाली आहेत. या सर्व जातींच्या तुलनेत ४० ते ५० टक्के क्षेत्रावर बीडीएन ७११ जातीची लागवड आहे. ‘महाबीज’कडूनही बीजोत्पादन कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा केला जातो. दरवर्षी सुमारे साडेतीन हजार क्विंटल बीडीएन-७११ जातीचे बियाणे महाबीजमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना पुरविले जाते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत विविध कृषी विज्ञान केंद्र आणि विभागीय कृषी विस्तार व शिक्षण केंद्रावरून बियाणे उपलब्ध केले जाते. बीजप्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून बीडीएन ७११ जातीच्या सत्यतादर्शक बियाणेपुरवठा (क्विंटल)
| वर्ष | बियाणे (क्विंटल) |
| २०१४-१५ | १३५ |
| २०१५-१६ | ११२.७४ |
| २०१६-१७ | ९२.८८ |
| २०१७-१८ | २२६.८० |
| २०१८-१९ | १७३.१२ |
| २०१९-२० | २१० |
| २०१०-२१ | २९६ |
(टीप ः पुरवठा झालेल्या बियाण्यांपैकी किमान ५० क्विंटल बियाणे इतर राज्यांत जाते.) विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद येथून मागील तीन वर्षांतील बीडीएन ७११ बियाणे विक्री (प्रति बॅग ः ६ किलो)
| २०१८ | १०७० बॅग |
| २०१९ | ७४० बॅग |
| २०२० | १०२५ बॅग |
बीडीएन-७११ जातीची वैशिष्ट्ये ः
प्रतिक्रिया... कोरडवाहू क्षेत्रासाठी ही जात वरदान ठरली आहे. १५० ते १६० दिवसांत तयार होत असल्यामुळे पाण्याचा ताण पडत नाही. दुष्काळी परिस्थितीतही एकरी पाच क्विंटल उत्पादन मिळाले आहे. मर रोगास प्रतिकारक आणि वांझ रोगास प्रतिबंधक आहे. शेंगा एकाच वेळेस काढणीस येतात. शेंगा फुटण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे यंत्राद्वारे काढणीस योग्य आहे. - डॉ. डी. के. पाटील, ७५८८५६२६०८ प्रमुख, कृषी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना यंदा २५ एकरांपैकी २३ एकरांवर बीडीएन-७११ जातीची लागवड आहे. गतवर्षी एकरी साडेनऊ क्विंटल उत्पादन मिळाले. यंदा अति पावसामुळे काही क्षेत्रांमध्ये ५ क्विंटल, तर काही ठिकाणी ८ ते १० क्विंटल उत्पादनाची आशा आहे. - दीपक बुनगे, रामगव्हाण, ता. घनसावंगी, जि. जालना तुरीचा बीडीएन -७११ ही जात बीजोत्पादन साखळीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून आघाडीवर आहे. ही जात लवकर काढणीस येत असल्याने पावसाच्या शेवटच्या टप्प्यात कमी पावसाच्या परिस्थितीतही उत्पादन देते. - एस. बी. घुगे, प्रभारी अधिकारी, बीजप्रक्रिया केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी गेल्या तीन वर्षांपासून बीडीएन -७११ या जातीस चांगली मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बहुतांश शेतकरी उत्पादनाविषयी समाधानी आहेत. येत्या खरिपात औरंगाबाद जिल्ह्यात याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. - रामेश्वर ठोंबरे, ९४२०४०६९०१ (कृषी सहायक, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.