सांगली, रत्नागिरीत दमदार पाऊस
सांगली, रत्नागिरीत दमदार पाऊस 
मुख्य बातम्या

सांगली, रत्नागिरीत दमदार पाऊस

टीम अॅग्रोवन

सांगली, रत्नागिरी : सांगली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली. खानापूर तालुक्यातील अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. वाळवा, शिराळा, पलूस, मिरज, आटपाडी, तासगाव आणि कडेगाव तालुक्यांत रात्रभर संततधार पाऊस झाला. दुष्काळी भागात पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. जत तालुक्यात पावसाची हलका पाऊस झाला. 

शिराळा तालुक्यातील वारणा धरणाची साठवणक्षमता ३४.४० टीएमसी इतकी आहे. ते गुरुवारी (ता. २६) सकाळी आठच्या सुमारास शंभर टक्के भरले आहे. वारणा धरणातून कालवा व विद्युतगृहाद्वारे १ हजार २४५ क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. तो वाढला तर धरणातून पाणी सोडले जाईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सांगली येथील आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी २५ फूट ३ इंच इतकी आहे. पलूस, तासगाव, खानापूर-विटा भागात मुसळधार पाऊस झाल्याने वाझर-आंधळी, चिखलगोठण-आंधळी, निंबळक-मोराळे, बोरगाव-राजापूर हे पूल बुधवारी (ता. २५) रात्रीपासून पाण्याखाली आहेत.  दुष्काळी पट्ट्यासाठी हा पाऊस रब्बी हंगामाला पोषक आहे, असे शेतकरी सांगत आहेत.

दहा वर्षानंतर अग्रणीत पाणी 

खानापूर तालुक्यातील अग्रणी नदी नेहमीच कोरडी असते. दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे. ताली भरल्या आहेत, ओढे, नाले भरुन वाहू लागले. अग्रणी नदी उगमस्थानापासून दुथडी भरून वाहू लागली. 

पावसामुळे लांजा, मंडणगडला नुकसान

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी (ता. २४) झालेल्या मुसळधार पावसामुळे लांजा, मंडणगड तालुक्यांना फटका बसला. भांबेड-कुडेवाडीतील (ता. लांजा) एका घरात नदीच्या पुराचे पाणी शिरले. त्यामुळे लाखो रुपयांचे, तर कादवण-वखारवाडीत पावसाच्या पाण्याचा लोंढा घरात घुसल्यामुळे (ता. मंडणगड) सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले.

गुरुवारी दिवसभर पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली आहे. गेले चार ते पाच दिवस दिवसातून एखादी सर पडत होती; मात्र मंगळवारी सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पावसाने धुमाकूळ घातला. मंगळवारी (ता. २४) रात्रीपासून सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत कोसळत होता. भांबेड येथील नदीला आलेल्या पुराचे पाणी नदीकाठच्या संतोष तावडे यांच्या घरात घुसले. पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी ओसरल्यानंतर तावडे यांना घरातून बाहेर काढण्यात आले. 

भांबेड-कुडेवाडीतील जुना पूलही पुराच्या पाण्याने वाहून गेला. कुडेवाडी येथील चंद्रकांत वाडकर यांची भातशेती, कंपाउंड, विहीर, काजू व आंबा व नारळाची झाडे वाहून गेली. भातशेतीत पुराचे पाणी शिरल्याने ती आडवी झाली आहेत. लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील कोचरी, कोर्ले, झर्ये, रिंगणे, बोरीवले, सालपे, भांबेड या गावांना पावसाने अक्षरश झोडपून काढले. 

मंडणगड तालुक्यातील कादवण-वखारवाडीलाही पाण्याच्या लोंढ्याने थैमान घातले. येथील संरक्षण भिंत, साठवणूक केलेल्या सिमेंट गोणी, कडपा, डबर असे साहित्य वाहून गेले. ११०० जांभा चिरा वाहून ओढ्याच्या प्रवाहात गेला. यात १ लाख ५३ हजार ७०० रुपयांचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT