निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवात 
मुख्य बातम्या

निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवात

माणिक देसाई

निफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव, पिंपळगाव, लासलगाव, निफाड यासह गोदाकाठ परिसरात द्राक्षमाल काढणीच्या हंगामाला सुरवात झाली आहे. द्राक्षखरेदीसाठी परप्रांतीय व्यापाऱ्यांबरोबरच कामगारांच्या आगमनाने रोजगारानिर्मितीमध्ये वाढ झाली आहे, तर तालुक्‍यातील अनेक ठिकाणी बेदाणानिर्मितीलाही सुरवात झाल्याचे चित्र आहे.

तालुक्‍यातील उगाव, वनसगाव, खडकमाळेगाव, सोनेवाडी, शिवडी, खेडे, नांदुर्डी, सारोळे, रानवड, पिंपळगाव, नैताळे यांसह गोदाकाठ भागात द्राक्षबागांचे मोठे क्षेत्र आहे. या गावांना द्राक्षमाल बाजारपेठेत पाठविण्यासाठी आवश्‍यक वाहतुकीच्या सोयी सुविधांसह व्यापाऱ्यांची उपलब्धता उगावला आहे. त्यामुळे सध्या उगाव परिसरातील सर्वच रस्ते वाहनांसह मजूरवर्गाच्या गर्दीने फुललेले दिसतात. परराज्यातील बनारस, कोलकता, पाटणा, गोरखपूर, बिलासपूर, अलाहाबाद, संभलपूर, महू आदी बाजारपेठेतील व्यापारी आणि त्यांचे कमिशन एजंट  दाखल होण्यास सुरवात झाली आहे.

द्राक्षमाल बाजारपेठेत पाठविण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था प्रामुख्याने उगाव आणि पिंपळगाव येथील वाहतूकदारांमार्फत होते आहे. द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेल्या निफाड तालुक्‍याने द्राक्षपंढरी म्हणून गेल्या दशकापासून देशासह परदेशातील बाजारपेठेतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

व्यापारी कामगारांचा असा चालतो दिनक्रम दररोज द्राक्ष उत्पादकांच्या बागेत जाण्यापूर्वी व्यापारी राहत असलेल्या खोलीवर मजुरांची लगबग साडेसहाला सुरू होते. त्या ठिकाणी    पॅंकर, शिबडीवाला, पिछेवाला आणि एक जीप, टेम्पो पिक-अप ही वाहने द्राक्ष उत्पादकांच्या बागेत ठरविलेला द्राक्षमाल आणण्यासाठी रवाना होतात. दिवसभर द्राक्षमाल पॅकिंग करून ते पिक-अप किंवा टेम्पोद्वारे ट्रान्स्पोर्टच्या कार्यालयापर्यंत आणून ट्रकमध्ये भरून पुढे तो देशाच्या विविध ठिकाणी असणाऱ्या बाजारपेठेकडे रवाना केला जातो.

द्राक्षव्यवहार केवळ विश्‍वासावर व्यापारी व द्राक्ष उत्पादक यांच्यादरम्यान द्राक्षमालाचे होणारे बाजारभावाचे व्यवहार केवळ विश्‍वासावर केले जातात. त्यास कायदेशीर आधार नसतो. तोंडी बोलीवर सुरवातीला रोखीचा, नंतर दोन-चार दिवसांच्या उधारीचा व्यवहार होत जातो. मात्र यातूनच व्यापाऱ्याच्या उधारीची रक्कम वाढत जाते. त्यामुळे दर वर्षी यातून द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीचे प्रकार घडतात.

पूरक व्यवसायाला चालना तालुक्‍यातील २५ हजार हेक्‍टरवर द्राक्ष हंगामाला सुरवात झाल्यामुळे या कालावधीत द्राक्षमाल बाजारपेठेसाठी रवाना करण्याकरिता आवश्‍यक खोकी, रद्दी, क्रेटेल, सिल्व्हर, गमटेप, दोरी यांसारख्या पूरक वस्तू विक्रेत्यांच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.

परराज्यांतून द्राक्ष उत्पादक भागात आलेल्या द्राक्ष व्यापाऱ्यांची स्थानिक ग्रामपंचायत व पोलिस ठाण्याला छायाचित्र, आधार कार्ड इत्यादी महत्त्वाच्या कागदपत्रांसह नोंद ठेवायला हवी. द्राक्ष उत्पादकांनी व्यापाऱ्यांशी रोखीनेच व्यवहार करावेत. कारण व्यापारी पलायनाचे प्रकार सतत होत असतात त्यामुळे सावधगिरी बाळगणे हिताचे आहे.  -छोटू पानगव्हाणे, अध्यक्ष, द्राक्ष संघर्ष समिती, उगाव  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT