अंजीर बाग एकदम ‘हेल्दी’ आहे...पवारांच्या प्रशस्तीने भारावले जगताप कुटुंबिये..! 
मुख्य बातम्या

अंजीर बाग एकदम ‘हेल्दी’ आहे...पवारांच्या प्रशस्तीने भारावले जगताप कुटुंबिये..!

संतोष शेंडकर 

सोमेश्‍वरनगर, जि. पुणे : ‘एकाही पानावर स्पॉट नाही आणि करपाही दिसत नाही. छाटणीची पद्धतही चांगली आहे. अंजीर बाग एकदम ‘हेल्दी’ आहे,’ अशा शब्दांत दस्तुरखुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अंजिराच्या बागेचे कौतुक केले आणि जगताप कुटुंबीय अक्षरशः भारावून गेले. पवार यांनी सव्वा तास या अंजीर बागेत घालविला. जगतापांचे अख्खे कुटुंब बागेत राबते याचे कौतुक करत अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा, असा वडीलकीचा सल्लाही दिला. 

निंबूतनजीक जगतापवस्ती (ता. बारामती) येथील दीपक विनायक जगताप यांनी डोंगर फोडून अंजिराची बाग केली आहे. चुका सुधारत सुधारत एक एकरावरील अंजीर आता साडेसहा एकर केली आहे. जगताप यांना सासवडमध्ये पवार यांच्याच हस्ते अखिल महाराष्ट्र अंजीररत्न पुरस्कार मिळाला होता. पुरंदर ही अंजिराची खाण असताना बारामती अंजीर आले कसे? असे कुतूहल पवार यांनी व्यक्त केले होते. जगतापांनी मग पवारांना अंजिराची भेट दिली होती. 

दरम्यान, रोहन सतीश उरसळ काही दिवसांपूर्वी या बागेची पवार यांना छायाचित्रे पाठविली होती. यामुळे ऐन दिवाळीच्या धामधुमीत पवार यांनी बंधू प्रतापराव पवार यांच्यासह अचानक जगताप यांच्या अंजीर बागेस भेट दिली आणि समाधानही व्यक्त केले. भेटीप्रसंगी पवार यांचे सहकारी बी. जी. काकडे, संभाजी होळकर, पुरुषोत्तम जगताप, राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, रोहन उरसळ, अभिजित काकडे, ऋषिकेष गायकवाड, महेश काकडे, कांचन निगडे उपस्थित होते. 

बागेच्या निरोगीपणाचे रहस्य पवार यांनी विचारल्यावर रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा समतोल करतो शिवाय जिवामृतही देतो अशी माहिती दीपक जगताप यांनी दिली. पवार यांच्या अंजीरच का लावलं? कसं वाढवलं? फळांची संख्या इतकी कशी मिळविली? विविध प्रश्‍नांवर जगताप यांनी, संत्रा, डाळिंब, मोसंबी, अंजीर या चारही फळांची एकरभर लागवड करून त्यात अंजीर चांगली करू शकतो, चुकांमधून शिकत गेलो. तसा अभ्यास केल्याचे जगताप यांनी सांगितले. एकेका फांदीवर तीस-चाळीस फळे पाहून पवार यांनी बाग हेल्दी असल्याचे प्रशस्तिपत्रक दिले. 

सायेब, तुमचं पाय लागलं; लई कमावलं...  ‘साहेबांशी कसं बोलायचं याचं जाम टेन्शन आलं होतं. पण साहेबांनी इतकं आपलंसं केलं, की सव्वा तास कसा गेला कळलंच नाही,’ अशा भावना दीपक जगताप यांनी व्यक्त केल्या. पवार यांनी ‘शेतात कसा आला’ असा प्रश्‍न केल्यावर जगताप यांनी ‘आईने गोडी लावली’ असे उत्तर दिले. यावर सुमन जगताप यांनी हात जोडून, ‘सायेब तुमचं पाय लागलं हेच आमचं भाग्य. तुम्ही आला लई कमावलं,’ अशा शब्दांत पवार यांचे आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan and Namo Yojana : 'पीएम किसान’चा १८ वा आणि ‘नमो’चा पाचवा हप्ता खात्यात जमा

Congress questions on Modi's visit : राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपवले, भाजपने काय केलं? काँग्रेसचा मोदींना सवाल

Organic Pesticide : जैविक कीटकनाशक ‘मेटाऱ्हायझियम’

Makhana Benefits : मखनाचे आरोग्यदायी फायदे

Rahul Gandhi : राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल, कोल्हापुरात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

SCROLL FOR NEXT