रत्नागिरी ः आंतरपीक म्हणून काळी मिरी लागवडीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते, हे कोकणातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. कोकणात सुमारे पन्नास हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर काळी मिरीची लागवड झाली आहे. कमी खर्च आणि चांगले उत्पन्न अशीच गणना या पिकाची होते, हे राजापूर तालुक्यातील नाटे येथील प्रयोगशील शेतकरी राजू पाध्ये यांनी दाखवून दिले आहे. कोकण किनारपट्टीतील हवामान काळी मिरी पिकाला अनुकूल आहे. काळी मिरीच्या वेलास आधाराची आवश्यकता असल्यामुळे नारळ, सुपारी झाडांवर मिरीचे वेल चढविले जातात. परसाबागेतील आंबा, फणसासारख्या कोणत्याही झाडावर वेल चढवून मिरी उत्पादन घेता येऊ शकते. काही शेतकऱ्यांनी सागासह काटा नसलेल्या शिवर झाडावरही मिरी वेल चढविलेले आहेत. परसबागेत घरातील सांडपाण्यावर ही रोपे जगवली जातात. घरगुती वापराला आवश्यक तेवढी काळी मिरी वापरून काही प्रमाणात बाजारातही विकली जात आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांत काळी मिरीची व्यावसायिक लागवड शेतकरी करू लागले आहेत; मात्र ते प्रमाण अत्यंत कमी आहे. नारळ सुपारीच्या बागा नसतील, परंतु पाण्याची सुविधा असेल, अशा ठिकाणी पानमळ्याच्या धर्तीवर पांगारा लागवड करून त्यावरही स्वतंत्रपणे मिरीची वेल लावून उत्पादन घेता येऊ शकते. राजापूर तालुक्यातील नाटे येथील शेतकरी राजू पाध्ये यांनी आंतरपीक म्हणून १९९५पासून काळी मिरीची लागवड केली आहे. सुपारी, नारळ किंवा बीन काट्याची शिवर यावर त्यांनी पन्नीयूर जातीच्या काळी मिरीचे वेल सोडले आहेत. त्यांनी २०१२ मध्ये २० गुंठे क्षेत्रातून त्यांनी आठ क्विंटल काळी मिरीचे उत्पन्न मिळविले होते. विक्रमी काळी मिरी उत्पादन घेतल्याबद्दल डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पालवी महोत्सवात त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
राज्य, परराज्यांत काळ्या मिरीला मागणी ‘‘कोकणातील शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून नारळ, सुपारीच्या बागेत काळ्या मिरीची लागवड करावी. योग्य व्यवस्थापनातून मिरीचे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत उत्पादन सुरू होते. गुजरातमध्ये लोणच्या साठी मिरीला मागणी आहे. मुंबईत घाटकोपर, भायखळा येथील व्यापाऱ्यांकडून मिरीला मागणी असते. ओली काळी मिरी २०० रुपये आणि वाळविलेली काळी मिरी ४०० रुपये किलोने विकली जाते,’’ अशी माहितीही राजू पाध्ये यांनी दिली.
बुश पेपर मिरीला संधी... काळी मिरी जवळपास ५ ते ६ मीटरपर्यंत उंच वाढते. मात्र बुश पेपर मिरीची उंची नियंत्रित ठेवून चांगले उत्पादन घेणे शक्य आहे. अन्य झाडांच्या आधाराने वाढणारी वेलवर्गीय मिरी धरल्यानंतर काढताना अडचणी येतात. बुश पेपर मिरीची काढणी सोपी जाते. शिवाय एकावर एक कुंड्या रचून लागवड केली असल्यामुळे जास्त रोपे लावता येतात. उत्पादनही अधिक मिळते. एक गुंठ्याला सरासरी १२ किलो उत्पादन मिळू शकते. -डॉ. वैभव शिंदे, वरीष्ठ शास्त्रज्ञ, नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.