परसातील कुक्कुट 302 तालुक्‍यांत
परसातील कुक्कुट 302 तालुक्‍यांत 
मुख्य बातम्या

परसातील कुक्कुट 302 तालुक्‍यांत

मारुती कंदले

मुंबई : परसातील कुक्कुटपालनास चालना देण्यासाठी राज्यातील 302 तालुक्‍यांत सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. 1) मंजुरी देण्यात आली. या योजनेतून लाभार्थ्यास 50 टक्के म्हणजे 5 लाख 13 हजार 750 रुपये अनुदान मिळणार आहे.

सध्या राज्यातील 16 जिल्ह्यांत शासकीय सघन कुक्कुट विकास प्रकल्प, चार ठिकाणी मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र आणि एका ठिकाणी बदक पैदास केंद्र कार्यरत आहे. तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर 14 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे 28 सघन कुक्कुट विकास गटांची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे प्रकल्प असणारे तालुके वगळून राज्यातील इतर 302 तालुक्‍यांमध्ये सघन कुक्कुट विकास गटांची स्थापना करण्यात येणार आहे. 2017-18 पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणाऱ्या प्रत्येक गटावर दोन हजार पक्ष्यांचा प्राथमिक समूह ठेवण्यासही मंजुरी देण्यात आली.

प्राथमिक समूहाचे संगोपन करण्यासाठी या योजनेंतर्गत राज्य शासनाकडून एक हजार चौरस फुटाच्या दोन पक्षिगृहांचे बांधकाम, स्टोअर रूम, पाण्याची टाकी, विद्युतीकरण, खाद्य व पाण्याची भांडी, ब्रुडर, इतर उपकरणे व लसीकरण, लघू अंडी उबवणूक यंत्र तसेच 400 उबवणुकीची अंडी, 20 आठवडे वयाचे अंड्यावरील 500 पक्षी, एकदिवसीय एक हजार मिश्र पिले, एकदिवशीय एक हजार पिलांसाठी 20 आठवडे कालावधीपर्यंत पक्षी खाद्यपुरवठा, पक्षी खाद्य ग्राईंडर आणि एग नेस्ट्‌स यांच्या खरेदीसाठी लाभार्थ्याला अनुदान मिळणार आहे.

दोन हजार अंड्यांवरील पक्ष्यांच्या प्राथमिक समूहाचे संगोपन करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या खरेदीसाठी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना राज्य शासनाचे 50 टक्के म्हणजे 5 लाख 13 हजार 750 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासह अनुदानासाठी आवश्‍यक असणाऱ्या एकूण 15 कोटी 58 लाख 33 हजार रुपये एवढ्या निधीस बैठकीत मान्यता देण्यात आली.

या योजनेंतर्गत संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या सहा सदस्यांच्या समितीमार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करणारे सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जनजाती क्षेत्र उपयोजनेतील लाभार्थी तसेच लघू अंडी उबवणूक यंत्र असणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला लाभार्थ्यांना विशेष प्राधान्य राहील.

या गटांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी तथा पशुपालक, महिला स्वयंसहाय्यता गट, सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच गावपातळीवरील छोट्या कुक्कुट व्यावसायिकांना परसातील कुक्कुटपालनासाठी सहजगत्या एकदिवसीय कुक्कुट पक्षी उपलब्ध होतील. उत्पादित अंडी व पक्ष्यांच्या विक्रीतून व्यावसायिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार असून त्यांच्यासाठी शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण होणार आहे. या योजनेमुळे दैनंदिन आहारात प्रथिनयुक्त आहाराचा समावेश होऊन कुपोषणावर मात होण्यास मदत होईल. भविष्यात कुक्कुट मांसास वाढती मागणी राहणार असून या योजनेमुळे मांसाची मागणी व पुरवठा यामधील तफावत दूर करणे शक्‍य होणार आहे.

विविध केंद्र पुरस्कृत, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजनांसाठी हे प्रकल्प मातृसंस्था म्हणून काम पाहू शकतील व त्यासाठी नव्याने गुंतवणूक करावी लागणार नाही. त्यामुळे या प्रकल्पांना विविध योजनांसाठी उबवणुकीची अंडी, एकदिवसीय पिले, तलंगा व नर वाटपासाठी अधिक वाव राहील. याव्यतिरिक्त लाभार्थ्यास नर कोंबडे, तलंगांची विक्री, रिकामी पोती, पोल्ट्री मॅन्युअर व 72 आठवड्यानंतरचे कल्ड पक्ष्यांची (पूर्ण वाढ झालेले) विक्री यामधून देखील उत्पन्न मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT