जळगाव ः सरकी, सोयाबीनमधील तेजीमुळे पशुखाद्यनिर्मिती उद्योग पर्यायाने मक्याची उचल करीत आहे. देशात गेल्या हंगामाच्या तुलनेत रब्बीमध्ये निम्माच मका उपलब्ध झाला आहे. सध्या देशभरातील बाजारांमध्ये मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. पण पुढील महिनाभरात बाजारातील दर हमीभाव गाठतील, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
मार्चमध्ये बाजारात मक्याची आवक सुरू झाली आहे. कोविडमुळे बाजार व्यवस्था आक्रसलेली असताना मक्याचे दर इतर शेतीमालाच्या तुलनेत स्थिर राहिले. त्याची जागेवरून किंवा खेडा खरेदीदेखील जळगाव, नाशिक, धुळ्यातील शिरपूर भागात झाली. सध्या मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरातमधील अहमदाबाद, राज्यातील पुणे, नाशिक येथील बाजारात मका दर सध्या १४५० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. दर्जेदार मक्याला जागेवर किंवा खेडा खरेदीत १५६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. त्यात शेतकऱ्याचा हमाली, तोलाई, वाहतूक आदी खर्च वाचत आहे. पण केवळ शासकीय खरेदी राज्यात सुरू झालेली नसल्याने मक्याचे दर हमीभावाखाली असल्याचा मुद्दाही चर्चेत आहे. शासकीय खरेदीत मक्याला १८५० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. ही खरेदी सुरू झाली तर दरवाढ होईल, अशी अपेक्षा आहे. राज्यात सुमारे २५ हजार शेतकऱ्यांकडे मका आहे.
मक्याचे दर गेले दोन वर्षे ११०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल एवढेच राहिले. गेल्या वर्षी मेमध्ये इंदूर, पुणे, जळगावच्या बाजारांत मक्याला ९०० रुपये प्रतिक्विंटलचा किमान दर मिळाला. लष्करी अळी, वाढता खर्च यामुळे यंदा रब्बीमध्ये मका लागवड घटली. तर गेल्या खरिपात अतिपावसात मका कुठेही हवा तेवढा उपलब्ध झाला नाही. मका लागवडीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पंजाब, हरियाना आदी राज्यं आघाडीवर आहेत. यामुळे आवकेवरही परिणाम दिसत आहे. यात आगाप लागवडीच्या मक्याची मळणी मार्चमध्ये पूर्ण झाली. मार्च ते १५ मेपर्यंत मक्याची आवक सुरू होती. नंतर आवकेवर परिणाम झाला आहे. काहींनी यंदा मक्याची विक्री कोविडच्या समस्येत नुकसान वाढेल यामुळे १४०० ते १४५० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली. पण हे दर परवडणारे नाहीत. कारण मक्याला एकरी किमान १५ ते १७ हजार रुपये खर्च आला आहे. एकरी उत्पादन २० ते २५ क्विंटल एवढे आहे. यामुळे फारसा नफा मका उत्पादकांच्या हाती राहत नसल्याची स्थिती आहे. खर्चाच्या तुलनेत पीक परवडायला हवे. कारण पाच महिन्याचे हे पीक आहे. कापणी, मळणीचा एकरी खर्च ३१०० रुपये एवढा आहे. सध्याचे दर परवडणारे नसल्याने शेतकऱ्यांना किमान १९०० रुपये प्रतिक्विंटल दर अपेक्षित आहे. पण एवढा दर गेले दोन वर्षे शेतकऱ्यांना मिळालेला नाही. २०१८ मध्ये रब्बीमधील मक्याला कमाल २१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. यानंतर दर हवे तसे किंवा हमीभावाएवढे बाजारात राहिलेले नाहीत. राज्यात रब्बीमध्ये (२०२०-२१) मक्याची लागवड सुमारे पावणेपाच लाख हेक्टरवर झाली होती. ही लागवड साडेसात ते आठ लाख हेक्टर एवढी अपेक्षित होती. खानदेशात रब्बीमध्ये एक ते सव्वा लाख हेक्टरवर मका पीक असते. पण यंदा फक्त ४३७ हजार हेक्टरवर खानदेशात लागवड झाली होती. याचाच परिणाम मका उत्पादन व पुढे आवकेवर झाला आहे. पण दरवाढ हवी तशी नसल्याची स्थिती खानदेश किंवा प्रमुख बाजारांमध्ये आहे. सरकी, सोयाबीनच्या तेजीने मक्याला पसंती पशुखाद्यासाठी सोयाबीनचा भुसा किंवा सोयाबीन उपलब्ध होत नाही. त्याचा तुटवडा आहे. तर सरकीचे दर ३३०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. यामुळे सरकी व सोयाबीनला पर्याय म्हणून मका पशुखाद्यासाठी उपयोगात अधिक आणला जातो आहे. काही पशुखाद्य निर्माते थेट जागेवरून मक्याची खरेदी करीत आहेत. मका पुरेसा नसल्याने किंवा कच्चा माल नसल्याने हे कारखाने पूर्ण क्षमतेने चालविणे सध्या अडचणीचे ठरत आहे. पुढे ही स्थिती बिकट होईल, कारण सोयाबीन, सरकी व मकादेखील पुरेसा उपलब्ध होणार नाही. परदेशात उठाव परदेशात सुमारे १० लाख टन मका पुरवठ्याचे करार मध्यंतरी चीनसोबत झाले होते. चीनमध्ये निर्यात सुरू आहे. बांगलादेशातही पाठवणी होत आहे. परदेशात अन्नप्रक्रिया उद्योगातही कोविडनंतर मक्याचा उठाव वाढला आहे. कोलकाता व मुंबई येथील मोठे खरेदीदार दाक्षिणात्य भागासह मध्य भारतातून मक्याची उचल सध्या करीत आहेत. बांगलादेशात पश्चिम बंगालमधून रस्ते मार्गे मका पाठवणी सध्या सुरू आहे. कोविडबाबतचे निर्बंध शिथिल होत असल्याने ही पाठवणी पुढे वेगात सुरू होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. इंदोर बाजारातील अवकेची स्थिती (प्रतिदिन सरसरी क्विंटलमध्ये) मार्च : ९ हजार एप्रिल : २१ हजार मे : १३ हजार प्रतिक्रिया मक्याची निर्यात बांगलादेश, चीनमध्ये सुरू आहे. कोविडमध्ये मक्याचा खाद्यान्नातही वापर वाढला आहे. यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगात मागणी आहे. मुंबई, कोलकाता येथील मोठे खरेदीदार मक्यासंबंधी चौकशी करून मागणी नोंदवीत आहेत. जेवढा मका देशातील बाजारात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उपलब्ध झाला होता, त्याच्या निम्मादेखील यंदा बाजारात येताना दिसत नाही. स्टार्च कारखाने वेगात सुरू होत असल्याने उठाव वाढत आहे. पण दरवाढ आणखी २५ ते ३० दिवसानंतर दिसून येईल. - मांगीलाल जैन, व्यापारी, जळगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.